Thursday, 22 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      राज्यात खासगी वाहनांना आंतरजिल्हा प्रवास बंदी; २५ जणांच्या उपस्थितीत दोन तासात लग्न सोहळा उरकण्यास परवानगी.

·      नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात प्राणवायू टाकीला गळती; २४ रुग्णांचा मृत्यू.

·      अन्य राज्यांमधून ५०० मेट्रीक टन प्राणवायूचा पुरवठा करण्याची राज्याची केंद्र शासनाकडे मागणी.

·      सिरम इंस्टीट्यूटच्या कोव्हिशील्ड लसीच्या किमतीची घोषणा; राज्य सरकारला चारशे रुपये, तर खाजगी रुग्णालयांसाठी सहाशे रुपयांचा दर.

·      घरोघरी जाऊन लसीकरण करणं शक्य नसल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं स्पष्टीकरण.

·      राज्यात ६७ हजार ४६८ कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात १५८ जणांचा मृत्यू तर सात हजार ४६८ बाधित.

·      मोफत अन्नधान्य वितरण योजनेत कोणत्याही परिस्थितीत खराब अन्नधान्य वितरित होणार नाही याची काळजी घेण्याचे राज्य सरकारचे निर्देश.

आणि

·      प्रसिद्ध ऊर्दू शायर डॉ. फईम अहमद सिद्दीकी यांच निधन.

****

राज्यात खासगी वाहनांना आंतरजिल्हा प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं काल आणखी काही निर्बंधांची घोषणा केली. सबळ कारण असेक तरच खासगी वाहनांना आंतरजिल्हा वाहतूक करता येणार आहे. शिवाय खासगी आणि सरकारी वाहतूक ५० टक्के क्षमतेनच चालवावी लागणार आहे. लांब पल्याच्या रेल्वेगाड्या आणि बसमधून प्रवास करणाऱ्यांची स्थानिक प्रशासनाकडून तपासणी होईल, संबंधित व्यक्तीला १४ दिवस गृह विलगीकरणात रहावं लागेल. हे नियम मोडणाऱ्यांना दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे. सरकारी कार्यालयात जास्तीत जास्त पाच कर्मचारी किंवा १५ टक्के कर्मचाऱ्यांना हजर राहता येईल. अत्यावश्यक सेवेतल्या कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येईल. लग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगी देण्यात आली असून, लग्न सोहळा दोन तासांतच आटपावा लागेल, असं या आदेशात म्हटलं आहे. आज रात्री आठ वाजेपासून, एक मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

****

नाशिक इथं महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीला गळती लागली, त्यामुळे प्राणवायूचा दाब कमी होऊन, व्हेंटिलेटरवर असलेल्या २४ रुग्णांचा मृत्यू झाला. काल दुपारी या टाकीत द्रवरूप प्राणवायू भरला जात असताना, नोझल तुटल्यानं ही दुर्घटना घडली. या कोविड रुग्णालयात दीडशे रुग्ण दाखल होते, त्यापैकी काही रुग्णांना प्राणवायू दिला जात होता. या रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्नही झाला, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये, तर नाशिक महापालिकेनं प्रत्येकी पाच लाख रुपये अशी प्रत्येकी एकूण १० लाख रुपये मदत जाहीर केली असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, ही घटना विचलित करणारी असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतर रुग्णालयांत अशा प्रकारची घटना होऊ नये, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचं, ते म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक असल्याचं सांगून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी इतर रुग्णालयांतल्या प्राणवायू प्रकल्पांच्या तांत्रिक बाबींची पडताळणी केली जाईल, असं कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बोलत होते.

****

प्राणवायूची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून, सुमारे ५०० मेट्रीक टन प्राणवायूचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात सध्या एक हजार २५० मेट्रीक टन प्राणवायूचं उत्पादन होत असून, परराज्यातून सुमारे ३०० मेट्रीक प्राणवायू पुरवठा केला जातो आहे. राज्यात परळीसह सहा ठिकाणी प्राणवायू उत्पादन केलं जातं, मात्र त्याठिकाणी प्राणवायू भरण्याची सुविधा नसल्यानं, वाहतुक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी ५०० रुग्णखाटांची तात्पुरती रुग्णालयं उभारण्यासंदर्भात नियोजन केलं जात असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. हा निर्णय अंमलात आल्यावर राज्यात कोविड उपचारासाठी तीन हजार रुग्णखाटांची भर पडेल, असं ते म्हणाले.

****

सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया या लस निर्मिती कंपनीनं राज्य सरकार आणि देशातल्या खाजगी रुग्णालयासाठी, कोव्हिशील्ड या कोविड लसीच्या किमतीची घोषणा केली आहे. राज्य सरकारला या लसीच्या एका मात्रेसाठी चारशे रुपये, तर खाजगी रुग्णालयांना एका मात्रेसाठी, सहाशे रुपये दर असेल. सध्या चालू असलेल्या कोविड लसीकरण मोहीमेत केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत, सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता लस उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना, उत्पादित लसींपैकी ५० टक्के वाटा केंद्र सरकारला द्यावा लागणार असून, उर्वरित ५० टक्के साठ्यातून, राज्य सरकार आणि देशातल्या खाजगी रुग्णालयांना कोविड लस विकता येणार आहे.

****

घरोघरी जाऊन लसीकरण करणं शक्य नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही बाब स्पष्ट केली. लस घेतल्यानंतर काही जणांना त्रात होतो, घरी लस दिली तर अशा लोकांना लवकरात लवकर उपचार मिळणार नाहीत, त्याचबरोबर लाभार्थ्याला कमीत कमी ३० मिनिट निगराणीत ठेवताना अडचणी येतील, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. लसीला निश्चित केलेल्या तापमानात ठेवणं आवश्यक आहे, त्यामुळे घरोघरी जाताना हे तापमान कायम ठेवणं शक्य नाही, तसंच सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचंही पालन होणार नाही, असं मंत्रालयानं नमूद केलं आहे.

****

राज्यात काल ६७ हजार ४६८ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४० लाख २७ हजार ८२७ झाली आहे. काल ५६८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६१ हजार ९११ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे. काल ५४ हजार ९८५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३२ लाख ६८ हजार ४४९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक १५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ९५ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ४६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५८ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३४, लातूर २८, नांदेड २५, उस्मानाबाद २३, परभणी २१, जालना १७, तर हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी पाच रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार २०७ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ६६८, नांदेड एक हजार ३७२, बीड एक हजार ४७, जालना ७९६, उस्मानाबाद ७६७, परभणी ५१२, तर हिंगोली जिल्ह्यात १९९ रुग्ण आढळून आले. 

****

मोफत अन्नधान्य वितरण योजनेत कोणत्याही परिस्थितीत खराब अन्नधान्य वितरित होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री, छगन भुजबळ यांनी दिले आहेत. याबाबत तक्रारी आल्यास दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना, दैनंदिन क्षमतेच्या दीडपट जास्त थाळ्या वितरण करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या आहेत. दरम्यान, अन्नधान्यांची आणि आवश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी, असे प्रकार निदर्शनास आले तर कठोर कारवाई करावी असे निर्देशही, भुजबळ यांनी दिले.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय - घाटी इथं द्रवरुप प्राणवायू निर्मिती करणाऱ्या दोन टाक्या बसवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, खासदार इम्तियाज जलील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी या प्रकल्पाची काल पाहणी केली. या टाक्या सोमवारपासून कर्यान्वित होणार असून, यामुळे घाटीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात, कोविड रुग्णांसाठी प्राणवायू सुविधा असलेल्या, जवळपास २५० खाटा वाढवता येतील, अशी माहिती खासदार जलील यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी घाटी रुग्णालयातल्या या प्राणवायू टाकी परिसरात, वाहतुकीसाठी सुलभ असे बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

****

नांदेडच्या शासकीय कोविड सुश्रुषा केंद्रातल्या सुरक्षेसंबंधी आढावा घेऊन, सर्व संबंधित विभाग प्रमुखांना योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांनी दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या जागेत असलेल्या प्राणवायू टाकीची त्यांनी पाहणी करून आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयातली कोविड बाधित रुग्णसंख्या आणि प्राणवायूची गरज लक्षात घेऊन, या ठिकाणी नव्यानं वीस टन क्षमतेची प्राणवायू टाकी उभारणीच्या कामाचा आढावा, ईटनकर यांनी घेतला.

****

लातूर इथल्या विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत नव्यानं उभारण्यात आलेल्या प्राणवायू टाकीची सुरक्षा तातडीने तपासून घेण्याची सूचना, पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना केली होती, त्यानुसार सदरील टाकीची तज्ञांकडून तपासणी करून घेण्यात आली असून, ती सुरक्षित असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या प्राणवायू टाकीत काल टँकरने आलेला प्राणवायू भरून घेण्यात आला. त्यामुळे लातुरातल्या या सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाची आगामी काही दिवसांची प्राणवायू पुरवठ्याबाबतची चिंता कमी झाली आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात नियोजित प्राणवायू प्रकल्पाला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. दहा किलोलीटर क्षमतेचा हा प्रकल्प कालपासून सुरू करण्यात आला, या प्रकल्पाद्वारे सध्या ३५० रूग्णांना प्राणवायू पुरवला जाऊ शकतो.

****

जालना जिल्ह्यासाठी राज्यस्तरावरून कोवीशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीच्या, १२ हजार ९०० मात्रा काल प्राप्त झाल्या. जिल्ह्यातल्या १०२ लसीकरण केंद्रावर या मात्रा देण्याचं नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यातल्या एक लाख ४६ हजार ७१ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे.

दरम्यान, जालना शहरात संचारबंदीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना थांबवून, त्यांची जागेवरच अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. काल दिवसभरात बसस्थानक परिसरात ७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली, यामध्ये एकजण कोविड बाधित आढळून आला. सदर व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा कोविड रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा सानप यांनी दिली.

औरंगाबाद इथंही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या २४८ नागरिकांची काल अँटीजन चाचणी करण्यात आली, यात दोन नागरिक कोविड बाधित आढळून आले.

****

परभणी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांपैकी काही सेवा २५ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. यानुसार, बँका, किराणा दुकानं, भाजीपाला तसंच फळांची दुकानं, बेकरी - मिठाई आदी खाद्य दुकानंही, रविवारपर्यंत पूर्ण बंद राहतील.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुका - शहर कॉंग्रेस समितीनं रुग्णांच्या मदतीसाठी, ऑनलाईन कोविड सहाय्यता केंद्राची स्थापना केली आहे. तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी ही माहिती दिली. यासाठी ९४ २१ ५४ ११ ११ हा चोवीस तास कार्यरत संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

****

लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं महापालिकेच्या रुग्णालयासाठी, दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या. काल महापालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या उपस्थितीत या दोन्ही रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दहा द्रवरूप प्राणवायू खाटा उपलब्ध करून देण्याची मागणी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांना निवेदन दिलं आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक लोक शहरापर्यंत उपचार घेण्यासाठी येण्यास तयार होत नाहीत, यामुळे अशी सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात यावी, या मागणीवर कदम यांनी भर दिला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी, उस्मानाबाद शहरातल्या एक, कळंब शहरातल्या एक आणि उमरगा शहरातल्या तीन खासगी रुग्णालयांच्या इमारतींना, समर्पित कोविड सुश्रुषा केंद्राचा दर्जा दिला आहे. या खाजगी रुग्णालयातल्या १३५ पैकी ८५ खाटा, कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय उस्मानाबाद शहरातल्या दोन खासगी रुग्णालयांमधल्या रुग्णखाटांची संख्या वाढवण्यास, आणि वाशी इथल्या दोन खाजगी कोविड सुविधा केंद्रातल्या वाढीव रुग्णखाटांनाही, जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.

****

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर-सी.एम.आय.ए. च्या माध्यमातून, औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-घाटी रुग्णालयाला, कोविड निदानासंदर्भातील संयत्र देणगी स्वरूपात देण्यात आलं. या यंत्राच्या सहाय्याने आर.टी.पी.सी.आर. चाचण्या जलद तसंच अधिक प्रमाणात करता येतात. राम भोगले, राहुल धुत आणि एम.के. मोईनोद्दीन यांनी दिलेल्या देणगीतून हे यंत्र घेण्यात आले आहेत.

****

मराठवाड्यातले प्रसिद्ध ऊर्दू शायर डॉ.फईम अहमद सिद्दीकी यांच काल हृदयविकाराने निधन झालं, ते ७० वर्षे वयाचे होते. सिद्दिकी हे नांदेड मधल्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयात ऊर्दू भाषा विभागाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते. देशातील महत्त्वाच्या ऊर्दू कवींपैकी ते होते.

****

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३५ गावाच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. या गावात सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव ग्रामसेवक हे राहणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...