Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date: 22 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू,
उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी दुर्गापूजे निमित्त देशवासियांना
शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गापूजा म्हणजे न्यायाचा अन्यायावरील विजयाचं प्रतिक
असून, हा उत्सव मातृशक्तीबद्दल
अधिक
आदर निर्माण करणारा आहे,
असं मुर्मू यांनी म्हटलं आहे. तर दुर्गापूजा म्हणजे मातेच्या
अदम्य भावनांचं प्रतिक आहे, असं उपराष्ट्रपती धनखड
म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व नागरिकांना दुर्गापूजेच्या शुभेच्छा
दिल्या आहेत.
****
एकदिवसीय
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारतीय संघ आपले विजयी अभियान सुरू ठेवण्याच्या निर्धाराने
तुल्यबळ अशा न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हिमाचल प्रदेशमधील
धर्मशाला इथं हा सामना होत आहे. दोन्ही संघांचा हा पाचवा सामना
असून भारत आणि न्यूझीलंड या दोघांनीही आपले पहिले चारही सामने जिंकून प्रत्येकी आठ
गुण घेतलेले आहेत. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात
दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही विभागात भारतीय
खेळाडूंनी आतापर्यंत अत्यंत चांगली कामगिरी केली असून या सामन्यातही चांगली कामगिरी
करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू
हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असून त्याच्या जागी आज सूर्यकुमार यादव किंवा मोहम्मद
शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. धर्मशालाची खेळपट्टी फिरकीपटूंना
साथ देऊ शकते, त्यामुळे भारत तीन फिरकीपटूंना घेऊन मैदानात
उतरण्याची शक्यता आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात
राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे, असं राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये
पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आम्हाला
आनंदच होईल, असंही ते म्हणाले. तर
भाजप नेते निलेश राणे यांनी आपले सरकार मराठा आरक्षण देणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भात बैठका सुरू आहेत, असं पत्रकार
परिषदेत सांगितलं. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज जालना जिल्ह्यातल्या
अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात जरांगे पाटील
यांनी शासनाला दिलेली मुदत येत्या २४ तारखेला संपणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेत आहेत.
****
ललित
अधाने यांच्या कवितासंग्रहाचे आज छत्रपती संभाजीनगरमधील तापडिया नाट्यमंदीरमध्ये प्रकाशन
करण्यात आले. मही गोधडी छप्पन भोकी असं या कविता संग्रहाचे नाव
असून प्रसिद्धी अभिनेते, कवी किशोर कदम यांच्या हस्ते हा प्रकाशन
सोहळा झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव
ठाले पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
****
बारामती येथील खाजगी कंपनीचे विमान
रविवारी सकाळी सातच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्मनजिक लोखंडे वस्तीच्या
वरील बाजूस अपघातग्रस्त झाले व्हीटी आरव्हीटी टेक्नम या जातीचे दोन सीटर विमान
होते. विमान एका शेतात अचानक कोसळले. दोनच दिवसांपूर्वी याच रेड बर्ड कंपनीचे
विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झाले होते.
****
भावी पिढ्यांसाठी पाण्याचं संवर्धन करण्याबरोबरच अन्नाची नासाडी
रोखणं ही आजच्या युवा पिढीची जबाबदारी आहे, असं मत
कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केलं
आहे. जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने आज अन्नशास्त्र आणि
तंत्रज्ञान विभागाच्या वतीने वॉक फॉर वॉटर ही विशेष जनजागरण फेरी काढण्यात आली,
त्यावेळी ते बोलत होते.
****
ज्यांच्यावर सक्तवसुली
संचालनालय, इडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे गुन्हे आहेत, असेच भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत आहेत, अशी
टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
शेतमालाला
हमीभाव हा फक्त कागदी खेळ असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना
हमीभावाचा फायदा नाही, असं विरोधी पक्षनेते विजय
वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहारांशी बोलत होते.
****
कोविड
काळात मुंबई महानगरपालिकेत रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीत ५ कोटी ९६ लाख रुपयांच्या
आर्थिक अनियमितता प्रकरणी माईलान लॅबोरेट्रीज आणि मुंबई महानगरपालिकेच्या अज्ञात
अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
****
No comments:
Post a Comment