Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 October
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार
कटिबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार
· मराठा आरक्षणासाठी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण तसंच लोकप्रतिनिधींना
गावबंदी-आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील
· नवरात्रोत्सवात आज दुर्गाष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
· एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचं भारतासमोर २७४ धावांचं आव्हान
****
मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं
आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केला आहे. ते आज मुंबईज पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने
आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची क्युरेटीव्ह याचिका दाखल करून सुनावणी घेण्याचं
मान्य केलं,
ही दिलासादायक बाब आहे, मात्र मराठा समाजातल्या
तरुणांनी संयम ठेवावा,
असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं ते म्हणाले...
मराठा
समाज मागास आहे, हे अनेक वेळा आपण पाहिलंही आहे आणि त्याचे पुरावे देखील आहेत. या सगळ्या
फॅक्टस जे आहे, त्या सुप्रीम कोर्टासमोर नक्की आपले तज्ञ वकील प्रेझेंट करतील आणि त्यामधून
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी विंडो ओपन झालेली आहे. ही दिलासादायक बातमी
आहे. मराठवाड्यामध्ये कुणबी दाखला देण्यासंदर्भात मी जस्टीस शिंदे समिती गठीत केली.
त्याच्यावर खूप युद्धपातळीवर काम सुरु आहे. मराठा समाजातल्या माझ्या भावांनो, मी आपल्याला
आवाहन आणि विनंती करतो की, टोकाचं पाऊल उचलु नका, थोडा धीर धरा.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे
पाटील यांनी मात्र परवा २४ तारखेच्या आत मराठा समाज आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर
२५ ऑक्टोबरपासून पुन्हा कठोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी आज
दुपारी जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी इथं वार्ताहर परिषदेत आपली भूमिका
स्पष्ट केली. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मंत्री, आमदार, खासदार, तसंच
प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना अंतरवाली सराटीत गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा
जरांगे यांनी केली. आरक्षणासाठी कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं
आवाहन करुन जरांगे यांनी शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन मराठा समाजाला आरक्षण
मिळवून देईल,
असा विश्वासही जरांगे यांनी व्यक्त केला.
****
मराठा समाजानं स्वतंत्र आरक्षण
मागण्याऐवजी दहा टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी
राज्य सरकारची भूमिका आहे का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक
चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारनं आज प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये
प्रकाशित केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं ते आज नांदेड इथं बोलत होते. आर्थिक
दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देताना केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती करून त्या
आरक्षणाला संरक्षण दिलं. मराठा आरक्षणाला सुद्धा अशाच पद्धतीने घटनात्मक संरक्षण
द्यावं, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आणि
मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे, असं
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बारामती इथं
वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आपल्याला आनंदच होईल, असंही
पवार यांनी सांगितलं.
****
शेतमालाला हमीभाव हा फक्त कागदी खेळ
असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा होत नाही, असं
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत
होते. बाजारात दर कमी असतांना सरकारनं हमीभावानुसार शेतमाल खरेदी करून
शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत, असं वडेट्टीवार म्हणाले.
यंदा पाऊस नसल्यानं दुष्काळी स्थितीमुळे उत्पादनावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे
सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवावेत, असंही वडेट्टीवार
यांनी नमूद केलं.
****
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला घेऊन
मुंबई पोलिसांनी आज नाशिकमध्ये तपास केला. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून दोन
ऑक्टोबरला फरार झाला,
त्यानंतर त्याचा भाऊ भूषण पाटील हा नाशिक जवळ शिंदे गावाजवळ
एम डी पावडर निर्मितीचा कारखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर
पोलिसांनी हा कारखाना उध्वस्त केला होता.
****
आकाशवाणीवरून दर महिन्याला प्रसारीत
होणारा ‘मन की बात’
हा कार्यक्रम देशातल्या जनतेला आवडत असून यावर मोठ्या
प्रमाणावर संशोधन होत असल्याबद्दल आपल्याला आनंद होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ‘इग्नायटिंग
कलेक्टीव्ह गुडनेस’
या पुस्तकाचा त्यांनी समाजमाध्यमवर जाहिर केलेल्या आपल्या
संदेशात उल्लेख करतांना हे नमूद केलं आहे. मन की बात या कार्यक्रमातले व्यावहारीक
निष्कर्ष या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मन की
बात सामाजिक बदलाचं माध्यम बनलं असल्याचही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
नवरात्रोत्सवाचा आज आठवा दिवस अर्थात
दुर्गाष्टमी. यानिमित्त आज देशभरात मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणासह, उत्साहात-पारंपरिक
पद्धतीनं हा सण साजरा होत आहे. यादिवशी विधिवत महागौरी माता आणि कन्या पूजन तसंच
मंदिरांमध्ये होमहवन केलं जातं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती
जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना दुर्गाष्टमी
पूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात सर्वत्रच महाअष्टमीचा उत्साह
दिसून येत असून ठिकठिकाणी भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे.
महाष्टमी आणि महानवमीच्या संगमाच्या मुहुर्तावर आज संध्याकाळी राज्यभरात अनेक
ठिकाणी संधिपूजा केली जाणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये महाअष्टमी म्हणून
ओळखला जाणारा हा सण तिथला सर्वात मोठा उत्सव आहे. जम्मू-काश्मीर या केंद्र शासित
प्रदेशातही सर्वच क्षेत्रांतल्या मंदिरांमध्ये लाखो भाविकांनी देवीमातेचं दर्शन
घेतलं.
राजस्थानमध्ये दुर्गाष्टमीनिमीत्त
घरोघरी कन्यापूजन,
तसंच रामचरितमानस आणि दुर्गासप्तशतीचं पठण केलं जात आहे.
नवरात्रातील दांडीया-गरब्यासाठी काल, आज
आणि उद्या राज्यशासनानं रात्री १२वाजेपर्यंत परवानगी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आज
विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांना गौरवण्यात आलं. जागर आदिशक्तीचा-सन्मान स्त्री
कर्तुत्वाचा या उपक्रमांतर्गत तुळजापूर इथं आपल्या कार्यातून यशस्वी झालेल्या
नवदुर्गांना नवनिर्मिती अष्टभुजा प्रेरणा महिला सहकारी बहुउद्देशीय सामाजिक
संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आलं.
****
क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज
न्यूझीलंडनं भारतासमोर २७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला
इथं झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
घेतला. न्यूझीलंडचा संघ पन्नास षटकांत २७३ धावांवर सर्वबाद झाला.
उभय संघांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले
प्रत्येकी चार सामने जिंकून प्रत्येकी आठ गुण घेत क्रमवारीत पहिली दोन स्थानं
राखली आहेत. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असून
त्याच्या जागी सूर्यकुमार यादव, तसंच शार्दुल ठाकूर ऐवजी मोहम्मद शमीला
आजच्या सामन्यात खेळवण्यात येत आहे
****
बारामती इथं एका खाजगी कंपनीचं दोन आसनी
विमान कोसळलं. या अपघातात वैमानिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोनच
दिवसांपूर्वी याच खासगी कंपनीचं अन्य विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झालं
होतं. बारामती इथल्या विमान प्रशिक्षण संस्थेचा गेल्या काही दिवसातील हा पाचवा
अपघात असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथले प्राध्यापक
ललित अधाने पाटील लिखित माही गोधडी छप्पन भोकी या कविता संग्रहाचं आज ज्येष्ठ कवी
सौमित्र यांच्या हस्ते प्रकाशन झालं. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव
ठाले पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अधाने यांचा हा
कवितासंग्रह क्रांतीची भाषा बोलणारा असून शेतकऱ्यांची अस्वस्थता व्यक्त करणारा
असल्याचं मत अभ्यासक कैलास अंभुरे यांनी व्यक्त केलं.
****
खाजगीकरण-कंत्राटीकरण विरोधात बीड इथं
आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचं निवेदन मोर्चाच्या शिष्टमंडळानं निवासि उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब
यांना सादर केलं.
****
सोलापूर-तुळजापूर हा मार्ग २६ ते २९
ऑक्टोबर हे चार दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सोलापूरहून तुळजापूरला
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या भाविकांच्या
सोयीसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक
सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आलं असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी इटकळ, वैराग, बार्शी
हा पर्यायी मार्ग याकाळात वापरता येणार आहे.
****
राज्याचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान
असलेल्या पुणे जिल्ह्यातील जेजुरीचं खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं
आहे. गेल्या दीड महिन्यापासून हे मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलं
होतं.
****
No comments:
Post a Comment