Saturday, 4 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:04.05.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 May 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मे २०२४ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत संपली-आज छाननी

·      निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक-प्रचाराला वेग

·      बनावट प्रचार साहित्य प्रसारित केल्यास संबधितांवर कारवाईच्या पोलिस विभागाला सूचना

·      मतदानाच्या वाढीव टक्केवारीत आक्षेपार्ह काहीही नाही-मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्वाळा

आणि

·      अकोला जिल्ह्यात दोन कारच्या अपघातात सहा जण ठार  

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत काल संपली. या टप्यात राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले आहेत.

धुळे लोकसभा मतदारसंघात ४२ अर्ज दाखल झाले. दिंडोरी २९, नाशिक ५६, पालघर २६, भिवंडी ४८, कल्याण ४५, ठाणे ४३, उत्तर मुंबई ३२, उत्तर पश्चिम मुंबई ३३, उत्तर पूर्व मुंबई ४२, उत्तर मध्य मुंबई ४५, दक्षिण मध्य मुंबई ४१, तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ३० अर्ज दाखल झाले आहेत.

या सर्व मतदार संघात आज अर्जांची छाननी होणार असून, सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात मतदान २० मे रोजी होणार आहे.

****

काँग्रेसनं उत्तरप्रदेशमधल्या रायबरेली मतदार संघातून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर केली असून, काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अमेठीतून काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा निवडणूक लढवणार आहेत, त्यांनीही काल उमेदवारी अर्ज भरला.

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातली १० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या एकूण ९६ जागांसाठी एक हजार ७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या ११ लोकसभा मतदार संघातल्या २९८ उमेदवारांचा समावेश आहे. या टप्प्यासाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.

****

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी आता अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचार सभा, प्रचार फेऱ्या तसंच इतर पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वच उमेदवार, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची काल प्रचारसभा झाली. सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठीही शहा यांनी काल प्रचारसभा घेतली. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी काल घेतल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं.

****

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल पुण्यात जाहीर सभा झाली. गांधी यांनी या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षण मर्यादा हटवण्याच्या विषयावर बोलण्याचं आव्हान दिलं. निवडणूक रोखे आणि संविधान बदलच्या मुद्यावरून त्यांनी भाजपवर टीका केली. 

****

दरम्यान, भाजप संविधान बदलणार असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसनेच देशाचं संविधान ८० वेळा तोडल्याचा आरोप, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केला आहे. ते काल काल लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आणीबाणीच्या मुद्यावरून त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

****

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल कणकवलीत प्रचारसभा घेतली. तर आदित्य ठाकरे यांनी काल महाविकास आघाडीचे रायगडचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मुरूड इथं प्रचार सभा घेतली.

****

गंभीर आरोप असलेले नेते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना चालतात का, असा सवाल, काँग्रेस नेते तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

वंचित बहुन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचारार्थ काल जालन्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप तसंच काँग्रेस दोन्हीवर टीका केली.

****

लोकसभा निवडणुकीदरम्यान बनावट प्रचार साहित्य - डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून, तो समाज माध्यमं तसंच डिजिटल माध्यमांवरून प्रसारित केल्यास, संबधितांवर कारवाईच्या सूचना, प्रशासनाने पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीनं ही कारवाई करण्यात येणार आहे.

****

मतदान झाल्यानंतर काही दिवसांनी मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दिसून येतं, त्याबाबत संशय घेण्यासासारखं काहीही नाही, असा निर्वाळा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक मतदान केंद्रांवर दिवसअखेर किती मतदारांनी मतदान केलं, याची आकडेवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली जाते. ती आकडेवारी आणि जाहीर झालेली आकडेवारी समसमान असल्याचं चोक्कलिंगम यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात पक्ष किंवा उमेदवारांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या एकूण ४२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातल्या १५ तक्रारींवर कारवाई झाली असून, इतरांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत राज्यात ४६ लाख ७६ हजार लीटरपेक्षा जास्त मद्य, २२० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, सुमारे ५० कोटी रुपये रोख असा एकूण ५३० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचं प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

****

सर्व विद्यापीठं आणि राष्ट्रीय सेवा योजना राबवणाऱ्या सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सन २०२२-२३ पासून पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट स्किम - पी एफ एम एस प्रणाली नव्याने राबवण्यात आली. या नवीन प्रणालीमध्ये महाराष्ट्र शासनास ‘उपयोगिता प्रमाणपत्र’ सादर करणारं नांदेडचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ ठरलं आहे. त्यामुळे राज्य संपर्क अधिकारी डॉ. निलेश पाठक यांनी विद्यापीठाचं अभिनंदन  केलं आहे.

****

अकोला जिल्ह्यात काल दोन कारच्या समोरासमोर झालेल्या रस्ते अपघातात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा आणि तिच्या नऊ महिन्यांच्या बालिकेचा समावेश असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सरनाईक यांचे कुटुंबीय हे वाशिमला जात असताना, पातूर घाटात दोन वाहनं समोरासमोर धडकून हा अपघात झाला.

****

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात तारखेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत लातूर तसंच उस्मानाबाद मतदार संघाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदार संघाचा लातूर लोकसभा मतदार संघात समावेश आहे. या मतदार संघात निवडणूक ड्यूटी लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उद्या पाच तारखेला नांदेड जिल्हा प्रशासनाकडून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सात मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना परतण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

****

बीड लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असून, यात महिलांनी स्वविवेकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. त्या काल बीड इथं बोलत होत्या.

दरम्यान, बीड विधानसभा क्षेत्रात सहा, सात आणि आठ मे रोजी गृह मतदान होणार आहे. ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदार अशा एकूण ४९ मतदारांचं गृहमतदान नोंदवण्यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची पूर्वतयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल संवाद सेतू’ या उपक्रमात याबाबत माहिती दिली.

दरम्यान, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काल छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला, निवडणूक कामावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो यांच्या वतीनं ६ ते ८ मे दरम्यान छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर मतदार जनजागृतीसाठी चित्र-प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार यांनी ही माहिती दिली.

****

परभणी इथे मतदान यंत्रं ठेवलेल्या स्ट्राँग रूमला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी काल अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

****

नांदेड इथं पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ईसापूर प्रकल्पातून आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्यात पाणी आणण्यात येणार आहे. हे पाणी आज संध्याकाळपर्यंत उपलब्ध होईल. त्याद्वारे उत्तर नांदेडला सोमवारपासून पाणीपुरवठा करणं शक्य होणार आहे.

दरम्यान, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नायगाव आणि बिलोलीमध्ये तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल बैठक घेतली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

धाराशिव तालुक्यातल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर इथल्या थोर संत श्री गोरोबा काकांच्या वार्षिक पुण्यतिथी समाधी सोहळ्याला कालपासून सुरुवात झाली. येत्या ७ मे पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात भजन, कीर्तन, प्रवचन, पालखी मिरवणूक आणि गोपाळकाला अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या किराडपुरा भागात एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. सायंकाळचा स्वयंपाक सुरू असतांना हा स्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

परभणी इथलं जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येत आहे. सहा मे पासून १५ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात विविध प्रकारांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

****

No comments:

Text आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...