आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२१ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
देशभरात आज दहशतवाद विरोधी दिवस पाळण्यात येत आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिवस पाळला जातो. २१ मे १९९१ रोजी एलटीटीई या दहशतवादी संघाटनेनं तामिळनडुमधल्या श्रीपेरम्बुदूर इथं बॉम्बस्फोट घडवून राजीव गांधी यांची हत्या केली होती. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काल सरासरी ६० पूर्णांक शून्य नऊ टक्के मतदान झालं. सर्वाधिक ७४ पूर्णांक ६५ टक्के मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी सुमारे ५४ पूर्णांक २९ टक्के मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली. लडाखमध्ये ६९ पूर्णांक ६२, झारखंडमध्ये ६३ पूर्णांक शून्य सात, ओडिशा ६७ पूर्णांक ५९, उत्तर प्रदेश ५७ पूर्णांक ७९, बिहार ५४ पूर्णांक ८५, तर जम्मू काश्मिरमध्ये ५६ पूर्णांक ७३ टक्के मतदान झालं.
****
भारताच्या बँकिंग क्ष्रेत्रानं उल्लेखनीय झेप घेतल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. चालू आर्थिक वर्षात बँकिंग क्ष्रेत्रानं प्रथमच तीन लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर संदेश दिला आहे. सार्वजनिक आणि खासगी बँकांच्या निव्वळ नफ्यात ३९ टक्क्यांनी वाढ होऊन तो गेल्या वर्षीच्या दोन लाख २० हजार कोटी रुपयांच्या तुलनेत तीन लाख १० हजार कोटींवर पोहोचला आहे. यामुळे, शेतकरी, गरीब तसंच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना पतपुरवठा करणं बँकांना अधिक सुलभ होईल असं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
छत्तीसगडमध्ये काल झालेल्या एका रस्ते अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला. कबीरधाम जिल्ह्यातल्या बाहपनी गावाजवळ एका वाहनावरील ताबा सुटून ते खड्ड्यात पडल्यानं हा अपघात झाला.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार असल्याचं, मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment