Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 03
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
दिल्लीतील विवेक विहार परिसरातील एका इमारतीत आज पहाटे
लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत १५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं
आहे. या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चार
मजल्यांच्या या इमारतीत वातानुकुलीत यंत्र-‘एसी’चा स्फोट झाल्यानं ही आग लागली होती.
सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आगीवर पुर्णतः नियंत्रण मिळवण्यात आलं.
****
जबलपूर इथं नर्मदा नदीतील बर्गी धरणात नाव उलटून झालेल्या
दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १२ वर पोहचला आहे. काल सायंकाळी पाच वर्षीय दोन आणि आज
सकाळी एका मुलाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं.
****
छत्तीसगडच्या कांकेर-नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी
विस्फोटकांच्या स्फोटात तीन जवान हुतात्मा झाले तर एक जवान गंभीर जखमी झाला. जिल्हा
राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटके निकामी करण्याच्या
प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला.
****
मुंबईतील दहिसर - भाईंदर लिंक रोड प्रकल्पामध्ये काल एक
क्रेन कोसळून झालेल्या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची
नोंद करण्यात आली असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
****
पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा
निवडणुकांच्या मतांची मोजणी उद्या होणार आहे. आसाममधील १२६ जागांसाठी, केरळमधील १४० जागांसाठी आणि पुद्दुचेरीमधील ३० जागांसाठी
९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. तामिळनाडूतील २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी, तर पश्चिम बंगालमधील २९३ जागांसाठी २३ आणि २९ एप्रिल अशा
दोन टप्प्यांत मतदान पार पडले होते.
****
सध्या सुरु असलेल्या जनगणनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित
पवार यांनी सक्रीय सहभाग नोंदवून आपली स्व-गणना काल पूर्ण केली. यंदाची जनगणना ही केवळ
नोंदणी नसून शाळा, रुग्णालयं तसंच कल्याणकारी
योजनांची सुनिश्चिती करते, यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा, याकरीता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग
नोंदवावा, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
स्व-गणना प्रक्रिया येत्या १५ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नडसह तालुक्यातील नागद
आणि या परिसराला जोडून असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव वनपरीक्षेत्रात नुकतीच
बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना पार पडली. या दिवशी पाण्याचे स्त्रोत असलेल्या भागात
मचान बांधून पारंपरिक पद्धतीने सत्तर वन्यप्रेमींसह वन विभागाचे कर्मचारी गणनेत सहभागी
झाले. यात सर्वाधिक संख्येनं रानडुकरं आणि वानरं आढळली, तसंच ससे, नीलगायी, मोर, हरीण, सायाळ, कोल्हा, उदमांजर आणि चाळीसगाव वन परिक्षेत्रात दोन बिबटे आढळले.
****
धाराशीव जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गतिमान प्रशासन- आपत्कालीन
व्यवस्था बळकटीकरण योजनेत जिल्ह्यातील नव्या कार्यालयीन इमारती बांधकामासाठी शासन मान्यता
मिळाली आहे. यामध्ये तालुकानिहाय एकूण ३५ ग्राम महसूल अधिकारी आणि ११ मंडळ अधिकारी
कार्यालयांचा समावेश आहे. ह्या इमारतींचं ई-भूमिपूजन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या
हस्ते नुकतच करण्यात आलं. महसूल प्रशासनासाठी
स्थानिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाची अशी ही केंद्रे नागरिकांना विविध महसुली
सेवा सुलभ, गतिमान आणि परिणामकारकरित्या उपलब्ध
करून देण्यासह विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी याचा लाभ होणार आहे.
****
भंडारा जिल्ह्यात कमकासूर या तीनशे लोकवस्तीच्या गावात
आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे. पुनर्वसन होऊनही या गावात मूलभूत सोयी-सुविधांच्या
अभावामुळे ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी
तासनतास प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनानं पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याची मागणी
ग्रामस्थांकडून होत आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत
आहे. जिल्ह्यातली ३४ गावं आणि १६२ वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण
झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. संगमनेर, पारनेर आणि अहिल्यानगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण
अधिक असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
रायगड जिल्ह्यात, अनियंत्रितपणे माती आणि मुरूम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं यामुळे
तब्बल ३९२ गावांवर दरड कोसळण्याच्या धोका निर्माण झाला आहे. आमच्या वार्ताहरानं याबाबत
कळवलं आहे. दहा वर्षांपूर्वी दरडप्रवण गावांची संख्या १०३ होती. एकट्या महाड आणि पोलादपूर
तालुक्यात दरडप्रवण गावांची संख्या दोनशेच्यावर पोहचली आहे. २००५ मध्ये अनेक गावांवर
दरडी कोसळून तीनशेहून जास्त जण दगावले होते. या धर्तीवर पावसाळ्यात लोकांना सतर्क रहावं
लागेल, अशी स्थिती असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद इथं आज दुपारी साडेतीन
वाजता सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर यांच्यात सामना होईल, आजचा दुसरा सामना अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि पंजाब
किंग्ज यांच्यात सांयकाळी साडेसात वाजता होणार आहे. या स्पर्धेचा उत्तरार्ध सुरु झाला
असून कालच्या पराभवानंतर मुंबई इंडीयन्स स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली
आहे.
****
No comments:
Post a Comment