Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढीबाबत सुधारणा विधेयकाला संसदेची
मंजुरी
·
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर सव्वा पाच टक्क्यांवर कायम-येत्या आर्थिक वर्षाच्या
सुरुवातीला प्लास्टिक नोटा चलनात येण्याची शक्यता
·
एमपीएससीच्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
·
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची घनकचऱ्यासंदर्भात स्वतंत्र नियमावली
·
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंचा वरचष्मा
आणि
·
जायकवाडी धरणात पाण्याची आवक घटली;विसर्गातही कपात
****
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबतच्या सुधारणा विधेयकाला
संसदेने मंजुरी दिली आहे. विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत
काल हे विधेयक मांडलं, त्यावर झालेल्या चर्चेनंतर सदनानं हे विधेयक लोकसभेला परत केलं. लोकसभेने हे विधेयक
यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकात सरन्यायाधीशांशिवाय सर्वोच्च न्यायालयातल्या
न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवण्याची तरतूद आहे. या वर्षी मे महिन्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी यासंदर्भात अध्यादेश जारी केला होता.
**
बँकर्स बुक्स अँड एव्हिडन्स विधेयक-२०२६ काल लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच चर्चेविना
मंजूर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात
सादर केलं. बँक नोंदींशी संबंधित पुराव्यांसंबंधीचा कायदा सध्याच्या डिजिटल बँकिंग
क्षेत्राशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. यामुळे बँकिंग प्रणालीच्या सध्याच्या
गरजा पूर्ण करण्यासाठी कायदेशीर चौकटीचं आधुनिकीकरण होईल. बँक नोंदींच्या इलेक्ट्रॉनिक
किंवा डिजिटल प्रती न्यायालयात वैध आणि कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातील, अशी तरतुदही या विधेयकात आहे.
**
दरम्यान, जंतरमंतर आंदोलनावरच्या कारवाईसह
विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही बाधित झालं.
****
भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयने रेपो दर पाच पूर्णांक २५ टक्क्यांवर कायम ठेवला
आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी
काल ही माहिती दिली. १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या
सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. जागतिक परिस्थिती, एल निनो, भू-राजकीय कारणं यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किंमती
वाढून पुन्हा चलनवाढीचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे.
****
गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, पुणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, नाशिक आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये
६६ हजार ३४३ एकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातल्या ९७ सामंजस्य करारांतर्गत
सुमारे ७५ हजार २३४ एकर जमिनीची मागणी असून, त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण-म्हाडा स्तरावरील सर्व प्रलंबित
प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले
आहेत. त्या काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होत्या. शासन स्तरावरील
आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना
परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचनाही पवार यांनी
केली.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी
अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. आता येत्या सोमवारी १० ऑगस्टच्या रात्री ११ वाजून
५९ मिनिटापर्यंत अर्ज करता येणार आहे. तर १३ ऑगस्टच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत
ऑनलाइन परीक्षा शुल्क भरता येणार आहे.
दरम्यान, लोकसेवा आयोगाने मुंबईत शेरीफ
कार्यालयातल्या बेलिफ-लिपिक, या गट-क संवर्गातल्या पदांसाठीची परीक्षा येत्या सहा सप्टेंबर रोजी आयोजित केली
आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा
केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात स्वतंत्र आणि कडक
नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांनुसार, ज्या आस्थापनांकडून दररोज
शंभर किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो, अशा सर्व संस्थांना यापुढे स्वतःच कचऱ्यावर प्रक्रिया
करणं बंधनकारक राहणार आहे. सदर आस्थापनांनी ओला कचरा, सुका कचरा तसंच इतर प्रकारच्या कचऱ्याचं योग्य प्रकारे
वर्गीकरण करून त्यावर जागेवरच प्रक्रिया करणं अपेक्षित आहे. कचऱ्याचं शास्त्रीय दृष्ट्या
व्यवस्थापन करण्यासाठी कंपोस्टिंग युनिट, बायोगॅस प्लांट किंवा इतर प्रक्रिया यंत्रणा उभारणंही आवश्यक
असेल. मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणारे उपाहारगृहं, समारंभ स्थळं, मॉल्स, व्यापारी संकुलं, शैक्षणिक संस्था तसंच विविध उद्योग-आस्थापनांना हा नियम लागू होणार आहे.
****
आपापली विचारसरणी आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यामुळे
आपली चळवळ यशस्वी झाल्याचं कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी म्हटलं
आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सीजेपीची दोन दिवसीय बैठक सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर ते काल
पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या तरी सीजेपी दबाव गट म्हणून काम करणार असल्याची माहिती
दीपके यांनी दिली.
****
मृद आणि जलसंधारण विभागामार्फत जालना जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामं विहित मुदतीत
पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आहे. जालना इथं काल आढावा बैठकीत ते बोलत होते. भूसंपादनामुळे रखडलेल्या
प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासह घनसावंगी तालुक्यातील जांब तांडा साठवण
तलाव प्रकल्पाची स्थळ पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यास त्यांनी सांगितलं.
****
बालस्नेही महाराष्ट्र घडवण्यासाठी बालहक्क संरक्षणाशी संबंधित सर्व विभागांनी प्रभावी
समन्वयाने काम करण्याचं आवाहन राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय विष्णू
पुराणिक यांनी केलं आहे. काल आयोगाने बीड इथल्या एचआयव्ही बाधित बालकांच्या विशेष बालगृहाला
भेट देऊन सुविधांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बालहक्क संरक्षणाशी
संबंधित १८ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. त्यापैकी १० प्रकरणं यावेळी निकाली काढण्यात
आली.
****
लातूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक जुलै ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात ग्रामीण आणि
शहरी भागात एकूण २९१ शिबिरं घेण्यात आली, त्यातून २४ हजार ३८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
****
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन केंद्र सरकारने
तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केंद्रीय
जलशक्ति मंत्री सी. आर.पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातलं निवेदन त्यांनी काल
पाटील यांना सादर केलं.
****
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त बीड इथं रोटरी क्लबच्या वतीने काल
वारकरी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. या उपक्रमात २२६ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
करून मोफत औषधोपचारासह आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आलं.
****
परभणी महापालिकेत काल चार जणांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
महापौर सय्यद इकबाल यांनी सभागृहात ही घोषणा केली. उर्वरित दोन जागांबाबतचा निर्णय
पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा भगवंत देशमुख विशेष वाडःमय पुरस्कार पुणे इथल्या कल्पना
दुधाळ यांच्या जारवा या पुस्तकाला काल प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल
या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. संध्या देशमुख - मुळे उत्कृष्ठ ग्रंथालय पुरस्कार
रत्नागिरी इथल्या रत्नागिरी नगर जिल्हा वाचनालयाला, कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार वाशिमच्या गजानन फुसे
यांच्या, सरत नाही हंगाम एककल्ली या
कवितासंग्रहाला, कुमार देशमुख नाट्य पुरस्कार
मुंबईचे राजीव जोशी यांच्या संगीत त्यागपर्व या नाटकाला प्रदान करण्यात आले.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या सुमारे २२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा
विसर्ग सुरू आहे. धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे १९ हजार घनफूट, उजव्या कालव्यातून एक हजार, तर डाव्या कालव्यातून ७००
घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या १७ हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगाने पाण्याची आवक सुरू असून, पाणी साठा सुमारे ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
दक्षिण कोरियात आसान इथं सुरू
असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज, अस्मिता
चलिहा, मानसी सिंग, ईशाराणी बरुआ, श्रीयांशी वलिशेट्टी, अनमोल खर्ब, आणि तन्वी
शर्मा या महिला खेळाडूंनी पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत भारतीय खेळाडूंचं
आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment