Sunday, 2 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      ‘नशामुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियाना'चा आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ; देशभरात दहा हजार ठिकाणी ‘नशामुक्ती’ शपथविधी समारंभाचं आयोजन 

·      सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी 

·      लोकमान्य टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादानुसार देश मार्गक्रमण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन

·      करांचा अग्रीम म्हणून केंद्राकडून राज्याला सात हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी

·      लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन 

आणि

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी पटकावली सात सुवर्ण पदकं, एकूण ३९ पदकांसह भारताची चौथ्या स्थानावर झेप

****

'नशामुक्त भारत' आणि 'विकसित भारत २०४७' या संकल्पना साकार करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘नशामुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियाना'चा प्रारंभ करणार आहेत. देशातल्या तरुणांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लोकचळवळ उभी करावी असं आवाहन पंतप्रधान या उपक्रमाद्वारे करणार आहेत. जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि सातत्यपूर्ण लोकसहभागाला प्रोत्साहन देऊन, व्यसनमुक्त भारत घडवण्याच्या सामूहिक राष्ट्रीय मोहिमेसाठी तरुण नागरिकांना एकत्र आणणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्त आज देशभरात जवळपास दहा हजार ठिकाणी एकाच वेळी ‘नशामुक्ती’ शपथविधी समारंभ आयोजित केले जाणार आहेत.

****

सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. संसदेनं मंजूर केलेल्या या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालं असून, यामुळे परीक्षा प्रणाली अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळं, बनावट प्रवेशपत्रं, संगणक नेटवर्कशी छेडछाड, उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा १६ प्रकारच्या गैरप्रकारांचा आळा घालण्यासाठी या कायद्यात कठोर तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

****

लोकमान्य टिळकांनी रुजवलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर देश मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ शहा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना शहा म्हणाले,

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

दरम्यान, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य करण्यात डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं शहा यांनी नमूद केलं. डोभाल यांची दूरदृष्टी, धाडस आणि धोरणांमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचं ते म्हणाले.

डोभाल यांनी यावेळी बोलतांना, पुण्याशी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी जोडलेल्या असल्याचं सांगितलं. त्याच शहरात लोकमान्य टिळकांच्या नावाने सन्मानित होणं हा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सर्व राज्यांना एक लाख नऊ हजार कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार, महाराष्ट्राला सात हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे. हा निधी १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त देण्यात आला असून, त्यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाला मोठा आधार मिळणार आहे.

पूर निवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं राज्यांना दोन हजार ११७ कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला ५०० कोटी रुपयांचा निधी अग्रीम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे.

****

तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १९२ रुपये कपात केली असून, नवे दर कालपासून लागू झाले. यानुसार १९ किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत दोन हजार ६९० रुपये इतकी झाली आहे. पाच किलो वजनाच्या छोट्या सिलिंडरचे दरही ८०८ रुपये ५० वरुन कमीकरुन प्रतिसिलिंडर ७६२ रुपये करण्यात आले आहेत.

****

कॉकरोच जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची राज्य सरकारने चौकशी सुरू केली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. चुकीच्या कामासाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल, असं भोयर यांनी सांगितलं.

****

पीक वीमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना दहा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ जुलैअखेर राज्यभरातून ५३ लाख ७४ हजार ३९ पीकविमा अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ५० लाख २६ हजार ६८५ अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे, तर ३ लाख ४७ हजार ३५४ अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी काल टिळकांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम पार पडले.

छत्रपती संभाजीनगर इथं विश्व हिंदू परिषदेसह विविध संस्था संघटनांच्या वतीने टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.

****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना काल अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजाने चाललं पाहिजे, असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यावेळी म्हणाले.

बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्ण पाठपुरावा करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. महोत्सवानिमित्त समता सैनिक दलाने मानवंदना दिली. एक हजार महिलांच्या सहभागाने पंचशील फेटा रॅली काढण्यात आली.

नांदेड तसंच धाराशिव इथंही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणिसंग्रहालय मिटमिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून, परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. या पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि नैसर्गिक सावली मिळावी, यासाठी नर्सरीमधून थेट १० ते १२ फूट उंचीची १५० झाडं लावली जाणार आहेत. येत्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करणार असल्याचं येडगे यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यात देवणी इथं मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा काल करण्यात आला. यानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात दोन पुस्तकांचं प्रकाशन यावेळी झालं. ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुडसुरकर यांनी यावेळी बोलतांना ग्रामीण भागात साहित्य चळवळींची आवश्यकता असल्याचं नमूद केलं.

****

ग्लासगो इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत काल सात सुवर्ण पदकांची कमाई केली. जॅस्मिन बंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घंसास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांनी सुवर्ण पदलं पटकावली. तर मुष्टियोद्धा लवलीना बोर्गोहेन, जादुमणी सिंग आणि नरेंद्र बेरवाल यांनी रौप्य पदक जिंकलं.

पॅरा ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या शॉट पुट F75 गटात सोमन राणाने सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेत शुभम जुयालला रौप्य पदक मिळालं. तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेलने रौप्य, तर सेल्वा प्रभूने कांस्य पदक जिंकलं. पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगला, तर ज्युदो मध्ये उन्नती शर्माला कांस्य पदक मिळालं.

या स्पर्धेत भारताने एकूण ३९ पदकं जिंकून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. यामध्ये १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे.  

****

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं काल उघडीप दिली. मात्र पुढील चार दिवसांत मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पैठणच्या जायकवाडी धरणात ५७ हजार २६६ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असून, धरणाचा पाणीसाठा ८२ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ११००, तर डाव्या कालव्यातून ७०० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...