Sunday, 2 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 02 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

'नशामुक्त भारत' आणि 'विकसित भारत २०४७' या संकल्पना साकार करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘नशामुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियाना'चा प्रारंभ करणार आहेत. देशातल्या तरुणांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लोकचळवळ उभी करावी असं आवाहन पंतप्रधान या उपक्रमाद्वारे करणार आहेत. जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि सातत्यपूर्ण लोकसहभागाला प्रोत्साहन देऊन, व्यसनमुक्त भारत घडवण्याच्या सामूहिक राष्ट्रीय मोहिमेसाठी तरुण नागरिकांना एकत्र आणणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्त आज देशभरात जवळपास दहा हजार ठिकाणी एकाच वेळी ‘नशामुक्ती’ शपथविधी समारंभ आयोजित केले जाणार आहेत.

****

बीड इथल्या लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्याला बीड जिल्हा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाच प्रकरणाचा तपास सुरू असून आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, आरोपीच्या बीड आणि नांदेड इथल्या निवासस्थानांच्या झडतीतून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यात बनावट सोन्याच्या बिस्किटांचं आमिष दाखवून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला अहमदपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून बनावट सोन्याची चार बिस्किटे, एर्टिगा कार आणि चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वीजतारा आणि विद्युतमोटार चोरीच्या घटनेतील दोघा आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं या कारवाईतून चार गुन्ह्यांची उकल केली असून आरोपींकडून दीड लाखांहून जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील मानवत तालुक्याच्या मंगळूरचे नैनाजी काळे आणि शंकर काळे या दोन युवकांचा यात समावेश आहे.

मानवत तालुक्यातील ताडबोरगांव - कोल्हा शिवारात विद्युत खांबावरील ॲल्युमिनियम तार तसेच पाथरी, मानवत आणि सोनपेठ परिसरातील विद्युत मोटारींची साथीदारांसह चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. तपासादरम्यान त्यांच्या राहत्या घरातून चोरीतील वीजतार, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि काही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.

****

नांदेडच्या विष्णुपुरीतल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयात देहदानासंदर्भातील "अंगदान जीवन संजीवनी अभियान २०२६" अंतर्गत अवयवदान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. बधिरीकरणशास्त्र विभागातर्फे  अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. समाजात अवयवदानाविषयी जागरूकतेसह "अंगदान करा, जीवन वाचवा" आणि "एक अवयवदान -अनेक जीवनदान" हे हृदयस्पर्शी संदेश प्रभावीपणे समाजासमोर मांडण्यात आला.

****

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, महिला एकेरीचं अजिंक्यपद भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं आहे. तैवानच्या तैपेई इथं आयोजित या स्पर्धेत आज सकाळी साडेनऊ वाजता झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या नएंगुयेन थुय लिन्ह विरुद्ध सरळ दोन सेट २१-१६,२१-१६ अशी सरस कामगिरी करत हे यश मिळवलं.

****

ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांच्या समारोप समारंभात अहमदाबादकडे अधिकृतपणे राष्ट्रकुल खेळांचा ध्वज आणि यजमानपदाची मशाल सुपूर्द केली जाईल. या निमित्ताने अहमदाबाद २०३० च्या राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारेल. अहमदाबादमध्ये होणारे २०३० चे राष्ट्रकुल खेळ या बहु-क्रीडा स्पर्धेचे शताब्दी वर्ष साजरे करतील. राष्ट्रकुल खेळांची सुरुवात १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे झाली. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी ग्लासगो येथील खेळांना उपस्थित आहेत, जिथे अहमदाबादचे पुढील यजमान शहर म्हणून औपचारिकपणे घोषणा होणार आहे.

****

पैठणच्या जायकवाडी धरणात  पाण्याची आवक होत असून सकाळी ९ वाजेच्या आकडेवारीनुसार धरणाचा पाणीसाठा ८३ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे.

नांदेड शहरातला विष्णूपुरी प्रकल्पात ९२ टक्के जलसाठा झाला असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळोणा धरणही ओसंडून वाहू लागलं आहे.

****

सांगली जिल्ह्यात  जत तालुक्याच्या उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करजगी इथं   घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय - पोक्सो न्यायालय, सांगली यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिला.

सहा  फेब्रुवारी २०२५ रोजी करजगी इथली चार वर्षांची बालिका बेपत्ता झाल्यानंतर उमदी पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली. तपासादरम्यान गावातील एका घरात संशयास्पद परिस्थितीत लोखंडी पेटीत मुलीचा मृतदेह आढळून आला. तपासात आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचे उघड झाले.

या प्रकरणात उमदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या तेरा दिवसांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...