Thursday, 23 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

सर्व शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सुरक्षेसंबंधी उपाययोजना करण्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यावा, असं म्हटलं. राज्य सरकारनंही रुग्णालयांमध्ये पाच एप्रिलपर्यंत ५०० सुरक्षा रक्षक तर १३ एप्रिलपर्यंत आणखी ६०० सुरक्षा रक्षक तैनात करावेत, असे निर्देश न्यायालयानं दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ दिवसानंतर होणार आहे.  

****

सामान्य माणसाला आरोग्य सेवा देण्याकरता, रुग्णसेवेची घेतलेली शपथ स्मरून डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. डॉक्टरांच्या सामुहिक रजा आंदोलनाबाबत विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना संपूर्ण सुरक्षा देऊन त्यात सातत्याने सुधारणा करण्याची तयारी असल्याचं सांगितलं. या आंदोलनामुळे गरीबांना आरोग्य सेवा मिळत नसून, अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी एक दोन जणांच्या चुकांसाठी संपूर्ण समाजाला शिक्षा देणं चुकीचं असल्याचं नमूद केलं.

****

सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा लागू करण्यासाठी महाराष्ट्रासह दुष्काळग्रस्त नऊ राज्यांच्या मुख्य सचिवांना समन्स बजावलं आहे. दुष्काळग्रस्त राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्याची मागणी करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली आहे. यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले.

****

बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. याप्रकरणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह १३ आरोपी आहेत. या सर्वांना केवळ तांत्रिक कारणावरुन दोषमुक्त करता येणार नाही, असं न्यायालयानं आधीच्या सुनावणीत म्हटलं होतं.

****

क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा आज शहीद दिवस. त्यानिमित्त त्यांना देशभरात अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण केली आहे. त्यांच्या धैर्य आणि त्यागाला देश कधीही विसरणार नाही, असं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

लोकसभेतही भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना आज अभिवादन करण्यात आलं. ब्रिटीश संसदेवर हल्ल्याचा निषेध करत लोकसभेनं या हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

हातमाग धारकांना नवीन हातमाग घेण्यासाठी हातमाग संवर्धन सहायता योजना सरकारनं सुरू केली असल्याचं वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत सांगितलं. या अंतर्गत नवीन हातमागासाठी कारागीरांना फक्त १० टक्के रक्कम भरायची असून, ९० टक्के रक्कम सरकार भरणार आहे. लोकसभेत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. वीणकर तसंच शिल्पकारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सरकारनं विशेष योजना सुरू केली असून, येत्या एक एप्रिलपासून या प्रशिक्षणासाठीचं ७५ टक्के शुल्क सरकार भरणार असल्याची माहिती इराणी यांनी दिली.

संसदेत झालेल्या गोंधळाच्या बातम्या दैनिकातून छापल्या जातात, पण सकारात्मक चर्चेला बातम्यांमध्ये स्थान मिळत नाही, अशी तक्रार राज्यसभेत अनेक खासदारांनी सदस्यांनी केली. समाजवादी पक्षाचे खासदार नरेशचंद्र अग्रवाल यांनी या मुद्याकडे लक्ष वेधलं. संयुक्त जनता दलाचे खासदार शरद यादव, काँग्रेस पक्षाचे खासदार आनंद शर्मा यांनी या विषयावर मतं मांडली.

****

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदवी आणि प्रमाणपत्रांवर छायाचित्र आणि आधार क्रमांक अनिवार्य करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसीनं सर्व शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना दिले आहेत. तसंच विद्यार्थांच्या शैक्षणिक संस्थेचं नावही प्रमाणपत्रावर असावं, असं युजीसीनं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

****

केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत उद्या नांदेड इथं डिजीधन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात डॉ शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध बँका, व्यापारी कंपन्या, तसंच शासकीय विभाग सहभागी होणार आहेत.

****

काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी पक्षांतर शक्यतेच्या बातम्यांचं खंडन केलं आहे. आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या निराधार असल्याचं सांगितलं.

//****//

No comments: