आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२७ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
एअर
इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड
यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्याच्या घटनेचा उस्मानाबाद शहर शिवसेना आणि युवा सेनेच्या
वतीनं आज नळदुर्ग तसंच उमरगा इथं बंद पाळण्यात येणार आहे. काल शिवसेनेच्या वतीनं तुतोरी
इथं बंद पाळण्यात आला.
दरम्यान,
या मारहाण आणि विमानप्रवास बंदीसंदर्भात काही वक्तव्य न करण्याचे आदेश शिवसेनेच्या
वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याचं तसंच या कंपनीवर न्यायालयीन कारवाई करणार असल्याचं
खासदार रवींद्र गायकवाड यांनी काल वृत्तसंस्थेला सांगितलं.
****
पंतप्रधान
मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा लाभ घेऊन युवकांनी आपल्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं
आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूर इथं युथ एम्पॉवरमेट समिट
अंतर्गत प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करतांना ते
बोलत होते. युवकांनी नोकरी संदर्भात असलेली मानसिकता बदलण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी
केलं.
****
स्मार्ट सिटी अभियान तसंच अटल नवीकरण आणि अमृत या शहरी परिवर्तन
अभियानात समाविष्ट करण्यात आलेल्या देशातल्या ५०० शहरांपैकी ९४ शहरांचं मूल्यांकन करण्यात
आलं आहे. ५०० पैकी एकोणसाठ टक्के शहरं गुंतवणूक करण्यायोग्य आढळली असल्याचं शहरी विकास
मंत्री एम वैंकय्या नायडू यांनी काल सांगितलं.
****
शेतकरी
कर्जमुक्ती आंदोलनातर्फे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी काल औरंगाबाद इथं
वकिलांची एकदिवसीय परिषद झाली. दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा याला कंटाळून शेतकऱ्यांच्या
आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर आता तालुका ते विभागीय स्तरावरचे वकील टप्याटप्यानं रस्त्यावर
उतरणार असल्याचा निर्धार या परिषदेत करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना
कर्जमाफी देण्यासाठी टाळाटाळ करत असून सर्वांना पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावरच अन्याय
होत असल्याची टीका परिषदेत करण्यात आली.
//****//
No comments:
Post a Comment