Tuesday, 28 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      मानसिक आरोग्याविषयीचं विधेयक संसदेत मंजूर

·      कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचं नाही

·      शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय करता येईल?  सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात विजयासाठी भारताला आणखी ८७ धावांची गरज

****

मानसिक आरोग्याविषयीचं विधेयक काल संसदेत मंजूर करण्यात आलं. मानसिक रुग्णांच्या हक्कांचं संरक्षण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणं हा मानसिक आजार असून, त्यामुळे त्यांना भारतीय दंड संहितेनुसार गुन्हेगार ठरवता येणार नाही, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मानसिक आजार, आणि त्याबाबातची उपचार पद्धती, गुप्त ठेवण्याचा मानसिक रुग्णांचा हक्क असेल, स्त्री मानसिक रुग्णाचं तीन वर्षांपर्यंतचं लहान मूल तिच्या पासून वेगळं ठेवलं जाणार नाही, अशा विविध तरतूदी या विधेयकात आहेत. या कायद्याच्या तरतुदीचं उल्लंघन केल्यास, दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा या विधेयकात करण्यात आली आहे.

****

सरकारला आपल्या विविध कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचं करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र, बँक खात उघडण्यासाठी, तसंच यासारख्या अन्य योजनांसाठी, आधार कार्ड सक्तीचं करण्यापासून सरकारला रोखता येणार नाही, असंही न्यायालयानं नमूद केलं आहे. आधार कार्ड विरोधात दाखल याचिकांची सुनावणी करण्यासाठी, सात न्यायमूर्तींचा समावेश असलेलं पीठ स्थापन करणार असून, तात्काळ ही सुनावणी शक्य नसल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. भविष्यात आधार कार्ड हे एकमेव ओळखपत्र ठरण्याची शक्यता असून, आयकर विवरणपत्र भरताना देखील आधार कार्ड सक्तीचं ठरेल, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं होतं.

****

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय करता येईल, असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारलं आहे. यासंदर्भात या योजनेचा आराखडा  चार आठवड्यांच्या आत  सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान काल न्यायालयानं हे निर्देश दिले. केंद्रानं यासंदर्भात राज्य सरकारांनाही विचारणा करावी, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.

****

वस्तु आणि सेवा कर - जी एस टी संबंधित सर्व विधेयकं, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत सादर केले. नुकसान-भरपाई, केंद्रीय वस्तू सेवा कर, केंद्रशासीत वस्तू सेवा कर, आणि एकात्मिक वस्तू सेवा कर अशी ही विधेयकं आहेत. संसदेच्या मंजुरीनंतर प्रत्येक राज्य विधिमंडळात ही विधेयकं सादर होतील. येत्या एक जुलैपासून देशात वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याचं, जेटली यांनी सांगितलं आहे.

****

धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं, आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी काल लोकसभेत सांगितलं. राज्य सरकारनं प्रस्ताव दिला, तर त्यावर विचार केला जाईल, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील, भाजपचे चिंतामण वानगा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

****

बालमजुरीला आळा घालण्यासाठी मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात, जिल्हा दक्षता समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात असल्याचं, कामगार मंत्री  बंडारू दत्तात्रय यांनी  काल लोकसभेत सांगितलं. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. बाल कामगारांचं पुनर्वसन, प्राथमिक शिक्षण, तसंच सामाजिक आणि आार्थिक विकासासाठी, सरकार प्रयत्नरत असल्याचं कामगार मंत्र्यांनी सांगितलं. सरकार राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पही राबवणार असल्याची माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली.

****

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना सर्वच विमान कंपन्यांनी प्रवास सेवा देण्यास बंदी घातल्याप्रकरणी, शिवसेनेनं काल लोकसभेचं लक्ष वेधलं. याप्रकरणी सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि ही बंदी मागे घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेना खासदार आनंदराव अडसुळ यांनी केली.

दरम्यान, गायकवाड यांच्या समर्थनात काल शिवसेनेनं उस्मानाबाद इथं बंद पुकारला होता. गायकवाड यांना गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावर उद्धट वागणूक दिली, तसंच विमान कंपन्यांनी प्रवासी सेवा देण्यास नकार दिल्यानं, हा बंद पुकारण्यात आला होता. लोहारा आणि उमरगा तालुक्यात व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्यानं, बंदचा परिणाम जाणवल्याचं  आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य सरकार साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात मांजरी इथं, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते काल बोलत होते. साखर कारखान्यांच्या सह-वजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं, ते यावेळी म्हणाले. ऊस उत्पादनानंतरच्या व्यवस्थापनात संशोधनाची, तसंच या माध्यमातून पारदर्शी व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  राज्याची आर्थिक ताकद असणाऱ्या साखर उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असं मत इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षदिन, तसंच गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण विविध भाषिक लोक युगादि, चेती चाँद तसच संवर पाडवो म्हणून देखील साजरा करतात.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वच्छतेची प्रेरणा मिळावी यासाठी, जिल्ह्यातल्या ६२१ ग्रामपंचायतींमध्ये आजच्या गुढीपाडव्यानिमित्त स्वच्छतेची गुढी उभारण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्यावतीनं जिल्ह्यातल्या सहाशे एकविस ग्रामपंचायतींपैकी १२८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तर मार्चअखेर लोहारा तालुका हागणदारीमुक्त होत आहे. स्वच्छतेची व्याप्ती वाढवत घरोघरी शौचालय बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर व्हावा यासाठी मराठवाडा हागणदारीमुक्ती संग्राम या कार्यक्रमांतर्गंत सहाशे एकविस ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेची गुढी उभारण्यात येणार आहे. १०० टक्के हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींमधील सर्व कुटूंबांमधून लॉटरीपद्धतीनं ग्रामसभेत एका व्यक्तीची तसंच पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुक्यातून एका व्यक्तीची अशी निवड करून सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद निवड करणार आहे.

****

औरंगाबाद इथले ज्येष्ठ इतिहासतज्ञ अब्दुल हाई यांचं काल निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. सुफी संत साहित्याचे गाढे अभ्यासक असणारे अब्दुल हाई यांनी औरंगाबाद, खुलताबाद आणि जालना या शहरांच्या ऐतिहासिक महत्त्वांवर अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली आहेत. हिंदी, अरबी आणि फारसी भाषांवर हाई यांचं प्रभुत्त्व होतं. हाई यांनी स्थापन केलेल्या इतिहास संशोधन केंद्राच्या माध्यमातून असंख्य देशी तसंच विदेशी अभ्यासकांना मार्गदर्शन मिळालं आहे. त्यांच्या पार्थिवावर काल रात्री अंतिम संस्कार करण्यात आले.

****

ऑस्ट्रेलियाविरूद्ध धर्मशाला इथं सुरु असलेल्या, चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताला विजयासाठी आणखी ८७ धावांची गरज आहे. काल दिवसअखेर भारतीय संघानं दुसऱ्या डावात बिनबाद १९ धावा केल्या होत्या. लोकेश राहुल १३, तमुरली विजय सहा धावांवर खेळत आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १३७ धावांवर संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळाली होती. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत असून, एक सामना अनिर्णित राहिला आहे.

//****//

No comments: