Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
विधानसभेत
अर्थसंकल्प सादर होत असताना, गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षाचे १९ आमदार ३१ डिसेंबरपर्यंत
निलंबित
·
निवासी डॉक्टरांना महिनाअखेरपर्यंत पूर्ण सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन; डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा सरकारचा
दावा
·
सामाजिक
प्रसार माध्यमांमधलं अश्लील सामग्रीचं प्रसारण रोखण्यावर उपाय शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून एका समितीची स्थापना
आणि
· परभणी
आणि लातूर महानगरपालिकेची येत्या १९ एप्रिलला निवडणूक
****
विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना,
गदारोळ करणाऱ्या १९ आमदारांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या
शनिवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करत असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या
मागणीवरून या आमदारांनी गदारोळ केला होता. गोंधळ घालणे, फलक फडकावणे, घोषणाबाजी करणे,
सदनाबाहेर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, आदी कारवायांसंदर्भात विधीमंडळ कामकाजमंत्री
गिरीष बापट यांनी या आमदारांवर कारवाईचा प्रस्ताव दिला होता, तो मान्य करण्यात आला.
निलंबित आमदारांमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार, डी.पी. सावंत, विजय वडेट्टीवार यांच्यासह
दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव यांच्यासह नऊ आमदारांचा
समावेश आहे.
राज्य सरकारनं विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांना निलंबित केलं तरी,
आपण शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरू, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखेपाटील यांनी म्हटलं आहे.
निलंबनाची ही कारवाई योग्य असल्याचं, विधीमंडळ
कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकारनं विविध लेखाशीर्षांतर्गत सुमारे २९ हजार
कोटी रूपये तरतूद केली असून, शेतमालाचे बाजार भरवणं, शेतमालाला भाव देणं आदी उपायांना
सरकार प्राधान्य देत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, या १९ आमदारांचं निलंबन तात्काळ मागे घेण्याबाबत सरकारला
निर्देश द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काल राज्यपालांची
भेट घेऊन केली. विधान सभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परीषदेतले
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, दिलीप
वळसे पाटील आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
****
हमी भावानं
शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी राज्यभरात सुरु असलेली ३१६ तूर खरेदी केंद्र संपूर्ण
तूर खरेदी होईपर्यंत सुरुच ठेवणार असल्याची माहिती, पणनमंत्री
सुभाष देशमुख यांनी काल विधानसभेत दिली. आवश्यकतेनुसार या केंद्रांची संख्या
वाढवण्यात येईल तसंच हमी भावापेक्षा तुरीचे भाव वाढेपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरु राहतील,
असंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यभरातल्या शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांना या महिनाअखेरपर्यंत
पूर्ण सुरक्षा पुरवली जाईल, मात्र त्यांनी रजेवर राहण्याचा पवित्रा घेऊन, गोरगरीब रुग्णांना
आरोग्य सेवांपासून वंचित ठेऊ नये, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं
आहे. या संपाचा काल तिसरा दिवस होता, यामुळे राज्यभरातल्या १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या
रुग्णालयातली आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. नागपूर इथल्या ३७०, पुण्यातल्या २०० तर
सोलापुरातल्या ११४ निवासी डॉक्टरांना संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी निलंबित
केलं आहे. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित
दामले यांनी २०४ निवासी डॉक्टरांना काल रात्री आठ वाजेपर्यंत कामावर हजर
होण्याची नोटीस बजावली होती.
मात्र ते कामावर हजर न झाल्यामुळे त्यांना
सर्वांना निलंबित करण्याचे आदेश
काढण्यात आले.
दरम्यान, रजेवर
गेलेले निवासी डॉक्टर्स सेवेत
रुजू न झाल्यास, त्यांचं सहा महिन्यांचं वेतन कापण्याचा इशारा राज्य शासनानं दिला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं असल्याचा दावा सरकारनं
केला आहे.
****
डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांच्या
निषेधार्थ आज राज्यातल्या खासगी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. बीड
जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी काल एक दिवसाचा संप पुकारला
होता, तसंच मूक
मोर्चाही काढला होता. इंडियन मेडीकल असोसिएशन - आय.एम.ए.च्या
औरंगाबाद शाखेनंही आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे.
****
आगामी आर्थिक वर्षासाठीच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाला लोकसभेनं काल
मान्यता दिली. मूळ विधेयकात २९ सुधारणा, ३८ नवीन कलमं आणि दोन नवीन अनुसूचींच्या समावेशासह
सुधारित विधेयक काल सायंकाळी आवाजी मतदानानं मंजूर झालं. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी या अर्थसंकल्पात देशभरातल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी
केली. मात्र ती मान्य न झाल्यानं, विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
त्यापूर्वी अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली
यांनी, कृषी उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नसल्याचं, स्पष्ट केलं.
****
'नांदेड-
वर्धा' रेल्वे मार्गाचं
काम येत्या चार वर्षांत पूर्ण होईल, असं आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं.
वर्ध्याचे खासदार रामदास तडस, हिंगोलीचे
राजीव सातव, यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत यासंदर्भात
विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देतांना प्रभू यांनी हे आश्वासन दिलं. या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती दिली असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, अर्थात
सीबीएसईनं, इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या परीक्षांसाठी नवा आराखडा जारी केला आहे. नव्या आराखड्यानुसार आता
वर्षातून दोन परीक्षा होतील आणि त्यांचं मूल्यांकन नव्वद टक्के लेखी
परीक्षांवर आधारित असेल.
****
सामाजिक प्रसार माध्यमांमध्ये अश्लील
चित्रफिती आणि अन्य सामग्रीचं प्रसारण रोखण्यासाठी
उपाय शोधण्यासाठी सर्वोच्च
न्यायालयानं काल एका समितीची
स्थापना केली. यात
केंद्र सरकार आणि गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू, फेसबुक
या सारख्या इंटरनेट वापरणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. या समितीनं पंधरा दिवसात बैठक घेऊन
उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हंटलं आहे. हैदराबाद
इथल्या प्रज्वला या अशासकीय स्वयंसेवी संस्थेनं तत्कालीन सर न्यायाधीश एच.एल.दत्तू
यांना यासंदर्भात एक पत्र पाठवलं होतं, त्याद्वारे व्हॉट्स ॲप या सामाजिक प्रसार
माध्यमावर आलेले दोन अश्लील व्हीडीओ पाठवले होते. त्या पत्रालाच सर्वोच्च न्यायलयानं याचिका म्हणून स्वीकारलं
आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या
संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिका तसंच सांगली-मीरज-कुपवाड, जळगाव
आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केला. या सर्व ठिकाणी १९ एप्रिल रोजी मतदान होणार
असून, २१ एप्रिलला मतमोजणी केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना २७ मार्चपासून तीन एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता
येणार असून, सात एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
ज्येष्ठ विचारवंत आणि संपादक गोविंद
तळवलकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तळवलकर
यांच्या निधनानं पत्रकारितेतलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावलं, असं मुख्यमंत्र्यांनी
आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. तळवलकर यांचं परवा अमेरिकेत ह्युस्टन इथं निधन
झालं. ते ९२ वर्षांचे होते.
****
बीड जिल्हा परिषदेत बंडखोरांवर
कठोर कारवाईचे
संकेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ
नेते अजित पवार यांनी दिले आहेत. ते
काल मुंबईत बोलत होते. राष्ट्रवादी
काँग्रेसला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची गंभीर दखल घेत, पवार यांनी, पक्षविरोधी कारवाया सहन केल्या
जाणार नाहीत, असं नमूद केलं.
****
राज्य शासनाचे ‘आदिवासी समाजसेवक’ पुरस्कार
काल जाहीर झाले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये
औरंगाबादचे सुखदेव नवले, कळमनुरीचे भगवान देशमुख, राजूरचे बापुराव साळवे यांचा समावेश
आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या २७ मार्चला
नाशिक इथं समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
****
महावितरणनं वीजपुरवठा खंडित केल्यामुळे
गेल्या सहा दिवसांपासून औरंगाबाद शहरातल्या सेतु सुविधा
केंद्राचं कामकाज बंद पडलं
आहे. त्यामुळे
विविध प्रकारची प्रमाणपत्रांची गरज असणाऱ्या विद्यार्थी तसंच नागरिकांची गैरसोय होत
आहे. दोन महिन्यांपासून वीज बिल थकल्यामुळे महावितरणनं
या सुविधा केंद्रांचा वीज पुरवठा खंडीत
केला आहे.
//******//
No comments:
Post a Comment