Wednesday, 29 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      गहू आणि तूर डाळीवर दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

·      शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड विमान प्रवास बंदी प्रकरणी शिवसेनेचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल

·      राज्यातल्या शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान’ राबवण्यास प्रारंभ

आणि

·      औरंगाबाद इथं टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राचं उद्घाटन

****

केंद्र सरकारनं गहू आणि तूर डाळीवर दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या १७ मार्च २०१२ रोजीच्या अध्यादेशात दुरूस्ती करण्यात आली असून त्यानुसार हे आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल लोकसभेत सांगितलं. या निर्णयामुळं सध्या होत असलेल्या आयातीमधून जवळपास ८४० कोटी रूपयांचा महसूल सरकारला मिळण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातल्या बाजारपेठेत गहू आणि तूर डाळीच्या किंमतीत होत असलेल्या घसरणीवर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल, तसंच यंदाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला भावही मिळेल असं ते म्हणाले.

****

अल्पसंख्याक आयोगासह अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्ग आयोगातल्या रिक्त जागांच्या मुद्यावरून राज्यसभेचं कामकाज काल वारंवार तहकूब झालं. काँग्रेसच्या खासदारांनी हौद्यात उतरून वारंवार घोषणाबाजी केल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरात पाच वेळा तहकूब झालं.

****

विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड व्यतिरिक्त  शिधापत्रिका आणि वाहन परवाना यासारख्या ओळखपत्रांचा वापर करता येईल, असं केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. आधारकार्डाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आधार कार्ड महत्त्वाचं आहे, मात्र ते अनिवार्य नाही, असंही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

सध्या लोकपाल नियुक्त करणं शक्य नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित एका याचिकेत दाखल केलेल्या शपथपत्रात सरकारनं हे स्पष्ट केलं आहे. लोकपाल नियुक्तीसाठीच्या निवड समितीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचा समावेश आवश्यक आहे. मात्र, लोकसभेतल्या एकूण सदस्य संख्येच्या किमान दहा टक्के सदस्य निवडून येणं आवश्यक असणारी अट कोणताही पक्ष पूर्ण करत नसल्यानं, विरोधी पक्ष नेतेपद रिक्त आहे. या कारणानं लोकपाल नियुक्त करणं शक्य नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

****

वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात संमत होईल, अशी आशा केंद्र सरकारनं वर्तवली आहे. या विधेयकांवर आज संसदेत चर्चा अपेक्षित आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल खासदारांची बैठक घेऊन, नुकसान-भरपाई, केंद्रीय वस्तू सेवा कर, केंद्रशासीत वस्तू सेवा कर, आणि एकात्मिक वस्तू सेवा कर  या चारहीविधेय कांबाबत माहिती दिल्याचं, अनंतकुमार यांनी सांगितलं.

दरम्यान, वस्तू सेवा करासंदर्भात नागरिकांच्या समस्यांकडे लोकसभेत लक्ष वेधून घेण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत यासंदर्भात झालेल्या बैठकीत, पक्षानं शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही लोकसभेत लावून धरण्याचा निर्णय घेतला.

****

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमानप्रवास बंदी घालणाऱ्या विमान कंपन्याविरोधात शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव आपल्या विचाराधिन असल्याचं लोकसभेत सांगितलं.

दरम्यान, गायकवाड यांची मुंबई -दिल्ली तसंच हैदराबाद - दिल्ली विमान प्रवासाची दोन  तिकीटं एअर इंडियानं काल पुन्हा रद्द केली. गेल्या गुरुवारी पुणे दिल्ली विमान प्रवासानंतर उद्भवलेल्या वादातून गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर सर्वच विमान कंपन्यांनी गायकवाड यांना विमान प्रवास सेवा न देण्याचा निर्णय घेतला.

****

मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातल्या शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाला’ प्रारंभ केल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल दिली. आकाशवाणीवरून शेतकऱ्यांना संदेश प्रसारीत करून या अभियानाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा आणि घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न मिळावे हा या नियोजनाचा मुख्य हेतू आहे.

      या वर्षीपासून कृषी विकास आणि उत्पादन वाढीसाठी, तालुका हा विकास घटक मानून नियोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना खतं, जैविक द्रवरूप खतं आणि कीटकनाशकांचा पुरवठा करण्याच नियोजन केलं आहे. तसंच, कृषी यांत्रिकीकरण मोहीमेतंर्गत शेतकऱ्यांना कृषीयंत्र घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट या प्रवेशपूर्व परिक्षेसाठी आता नांदेडला केंद्र देण्यात आलं आहे. मराठवाड्यात औरंगाबादशिवाय अन्य ठिकाणीही परिक्षा केंद्र देण्याची मागणी यामुळे पूर्ण झाली आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद इथं काल टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राचं उद्घाटन झालं. शहराच्या छावणी परिसरातल्या टपाल कार्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी तसंच टपाल आणि पारपत्र कार्यालयाचे अधिकारी उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

अर्जदारांना या सेवेमुळे आठवडाभरात पासपोर्ट मिळू शकेल. त्या करता आवश्यक पोलिस पडताळणी अहवाल लवकरात लवकर मिळावा, यासाठी आपल्या निधीतून पोलिस ठाण्यांना अत्याधुनिक यंत्रणा देण्याची ग्वाही खासदार खैरे यांनी यावेळी दिली. टपाल कार्यालयात सुरू झालेलं हे राज्यातलं दुसरं तर मराठवाड्यातलं पहिलंच टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र आहे. 

****

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. शालिवाहन शके १९३९ ला काल प्रारंभ झाला. नागरिकांनी घरोघरी गुढ्या तोरणं उभारून नववर्षाचं स्वागत केलं. याचबरोबर पाडव्याच्या शुभमुहुर्तावर विविध वस्तु आणि मालमत्तेच्या खरेदीसाठी ही बाजारात मोठी गर्दी केली होती.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या यात्रा अनुदानात दीड कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा, संबंधित नगरसेवक, तत्कालिन मुख्याधिकारी, लेखापाल आणि ठेकेदार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेकेदाराच्या माध्यमातून यात्रा अनुदान रकमेतून साहित्य खरेदी केल्याचं दाखवत एक कोटी ६२ लाख रूपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  २०११-१२ या वर्षासाठी शासनाकडून १ कोटी ५० लाख रूपयांचं अनुदान नगरपालिकेला देण्यात आलं होतं. 

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात प्रसादालय सुरू करण्यात आलं आहे. नाथ संस्थानचे अध्यक्ष आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते या प्रसादालयाचं उद्घाटन काल करण्यात आलं. या प्रसादालयात दररोज दुपारी १२ ते ३ वाजे दरम्यान  भाविकांना नाममात्र दरात भोजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हरिकृपा सेवा समितीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे अन्नछत्र अखंड चालवण्यात येणार असल्याचं आमदार भुमरे यांनी सांगितलं.

****

ऑस्ट्रेलियाविरूद्धचा अंतिम क्रिकेट कसोटी सामना जिंकत भारतानं बॉर्डर गावसकर क्रिकेट चषक जिंकला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं झालेला अखेरचा सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही दोन- एक अशा फरकानं जिंकली आहे. भारताचा हा सलग सातवा कसोटी मालिका विजय आहे. या मालिकेत फलंदाजी तसंच गोलंदाजीत उत्तम कामगिरी करणारा रवींद्र जडेजा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला.

****

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि आमदारांचं निलंबन मागे घ्यावं या मागणीसाठी काँग्रेसतर्फे काल औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. खुलताबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही यात सहभागी झाले होते. कन्नड इथं माजी आमदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. सिल्लोड, खुल्ताबाद, पैठण, फुलंब्री इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

****

दिवंगत गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा गोविंद सन्मान पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांना काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. शाल, स्मृतीचिन्ह आणि अकरा हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते फटाले यांचा यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला.

दरम्यान, अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना तर युवा पुरस्कार मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांना आज दिला जाणार आहे. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते औरंगाबाद शहरातल्या महसूल प्रबोधिनी सभागृहात हे पुरस्कार वितरण होणार आहे.

****

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत औरंगाबाद तालुक्यातल्या नायगाव इथं सात हजार घरं बांधण्यात येणार आहेत. जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांच्या हस्ते काल या उपक्रमाला प्रारंभ झाला. याशिवाय जिल्ह्यात दहा हजार स्वच्छतागृह बांधण्याच्या तसंच शोषखड्डे तयार करण्याच्या कामालाही प्रारंभ करण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं उड्डाणपूलाच्या कामाचा शुभारंभ आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या हस्ते काल करण्यात आला. एका वर्षात हा उड्डाणपूल कार्यान्वीत होईल अशी अपेक्षा केंद्रे यांनी यावेळी व्यक्त केली.

//******//

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...