आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२६ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
विद्यापीठांची स्वायत्तता
संकुचित अर्थाने घेण्यात येत असून, त्यांना अधिक स्वातंत्र्य देऊन उदारमतवादाची पुनर्निर्मिती
करायला हवी, असं मत उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी व्यक्त केलं आहे. चंदीगड
इथं पंजाब विद्यापीठाच्या ६६व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विद्यापीठांनी
बौद्धिक स्वातंत्र्यासाठी अनुकूल असं वातावरण पुरवायला हवं असंही ते म्हणाले.
****
सीमा सुरक्षा अधिक सक्षम
करण्याच्या तसंच भारत आणि पाकिस्तान समवेतच्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याच्या दृष्टीनं
केंद्र सरकारनं एक आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी
म्हटलं आहे. मध्य प्रदेशातल्या तेकनपूर इथं सीमा सुरक्षा दल अकादमीत आयोजित एका कार्यक्रमात
ते बोलत होते. घुसखोरी रोखण्यासाठी तांत्रिक सहाय्यावर आधारित चार पथदर्शी प्रकल्पांना
मान्यता दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम
श्रृंखलेचा हा तिसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी
अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि राज्य हिंदी साहित्य
अकादमीच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणारे २०१५-१६ चे पुरस्कार उद्या मुंबई इथं
प्रदान केले जाणार आहेत. यावेळी महाराष्ट्र भारती अखिल भारतीय सम्मान जीवनगौरव हिंदी
सेवा पुरस्कार कोल्हापुरचे डॉ. सुनिलकुमार लवटे, तर डॉ.राम मनोहर त्रिपाठी अखिल भारतीय
सम्मान जीवन गौरव हिंदी सेवा पुरस्कार मुंबईच्या डॉ.सूर्यबाला यांना प्रदान करण्यात
येणार आहे. यासह अन्य पुरस्कारांचं वितरणही यावेळी केलं जाईल.
****
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितल्या रस्त्यांची कामं करताना
ना-हरकत प्रमाणपत्र
घेणं गरजेचं असतं. मात्र, त्याचा
विकासकामात अडथळा येत असेल तर त्यासंदर्भांत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल विधानसभेत
सांगितलं. लोणी भापकर ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य
बाबुराव पाचर्णे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्या अनुषंगानं त्या बोलत होत्या.
****
No comments:
Post a Comment