Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
भारतानं बॉर्डर गावसकर चषक जिंकला आहे. चार सामन्यांच्या
मालिकेत हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं झालेला अखेरचा सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला.
सामन्याच्या आज चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज लोकेश राहुल आणि मुरली विजयनं
कालच्या बिनबाद १९
धावसंख्येवरून पुढे खेळ सुरू केला. मुरली
विजय आठ धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. मात्र विराट कोहलीच्या गैरहजेरीत
कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्य राहणेच्या साथीनं लोकेश राहुलनं अर्धशतक झळकावत,
भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारतानं ही मालिकाही दोन एक अशा फरकानं जिंकली.
भारताचा हा सलग सातवा कसोटी मालिका विजय आहे.
या मालिकेत फलंदाजी तसंच गोलंदाजीत उत्तम कामगिरी करणारा रवींद्र
जडेजा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उमेश यादव, स्टीव्ह स्मिथ
यांना प्रायोजकांचा विशेष खेळाडू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला माजी क्रिकेटपटू सुनील
गावसकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीचा हॉल ऑफ फेम पुरस्कार आणि
एक दशलक्ष डॉलर्सचा धनादेश प्रदान करण्यात आला.
****
अल्पसंख्याक आयोगासह अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्ग आयोगातल्या
रिक्त जागांच्या मुद्यावरून राज्यसभेचं कामकाज आजही दुपारी साडे बारा वाजेपर्यंत तीन वेळा आणि
त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब
झालं.
लोकसभेत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देशवासियांना आज गुढीपाडवा,
उगादी, चेटीचंडसह नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
दिव्यांगांसाठी सार्वभौम ओळखपत्र तयार करणार असल्याचं सामाजिक
न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी
ही माहिती दिली. दिव्यांगांसाठीच्या सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी देशभरात
हे ओळखपत्र स्वीकार्य असेल, असं त्यांनी सांगितलं.
देशभरात अर्धसैनिक दलातल्या सैनिकांना अत्याधुनिक उपकरणं देण्यात
येत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ते लोकसभेत एका प्रश्नाच्या
उत्तरात बोलत होते.
****
जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात आज सकाळपासून दहशतवादी आणि
सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या भागात दहशतवादी असल्याच्या माहितीवरून सुरक्षा
जवानांनी इथं शोधमोहीम सुरू केली, त्यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार
सुरू केला, त्याला सुरक्षा जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे. या परिसरात सुरक्षा जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या
कारवाईत एक जण मारला गेला.
****
पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काल रात्री लागलेल्या
आगीत रासायनिक प्रयोग शाळेची दहा हजार चौरस फुट क्षेत्रफळावर उभी इमारत जळून खाक झाली.
सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी ही आग
आटोक्यात आणली. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.
****
शिर्डीच्या साईमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या चालण्यातून
वीज निर्मिती केली जाणार आहे. साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली.
या फ्लोअर तसंच सौर प्रकल्पाच्या माध्यमातून दहा मेगावॅट वीज निर्मिती होणार असल्याचं,
हावरे यांनी सांगितलं. मंदिरात वाहिलेल्या गुलाब फुलांपासून बचत गटांच्या माध्यमातून अगरबत्ती बनवली
जाणार असल्याची माहिती हावरे यांनी दिली. मंदिरात रोखरहित व्यवहारांसाठी साई वॉलेट
योजना सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांवर महाराष्ट्र चालत असून मानवता धर्म जिवंत ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायानं
केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आळंदी इथल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या
कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेसाठी राज्य शासनाच्यावतीनं
एक कोटी रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली. ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यावेळी उपस्थित होते. या संस्थेत मिळणारं,
विज्ञान आणि अध्यात्माची
सांगड घालणारं दर्जेदार शिक्षण समाजासाठी उपयुक्त
असल्याचं हजारे यांनी नमूद केलं.
****
राज्य शासनाचं सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि राज्य हिंदी साहित्य अकादमी
यांच्या संयुक्त विद्यमाने २०१५-२०१६ साठीचे विविध साहित्य पुरस्कार काल मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री
विनोद तावडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. लातूर इथले डॉ. अंबादास देशमुख यांना गजानन माधव
मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
लातूर इथं हिंदू नववर्षाचं
विविध सामाजिक संस्था, मंडळांनी मिरवणुका काढुन जल्लोषात स्वागत केलं. शहरातल्या दक्षिणेश्वर
प्रतिष्ठानच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात मराठी संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या मंगलध्वज
परिक्रमेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैद्यनाथ मंदिरापासुनही शोभा यात्रा काढण्यात
आली.
//*******//
No comments:
Post a Comment