Saturday, 25 March 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 25.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांनाही शाळेत माध्यान्ह भोजन दिलं जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. माध्यान्ह भोजनाच्या सुविधेतून कुठल्याही विद्यार्थ्याला वगळणार नाही, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत सांगितलं. माध्यान्ह आहार सुविधा मिळण्यासाठी केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार नसल्याचं काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी म्हटलं होतं, त्यावर जावडेकर यांनी हे स्पष्टीकरण दिलं. माध्यान्ह आहार योजनेला आधार क्रमांक जोडल्यापासून विद्यार्थांची गळती कमी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशभरामध्ये परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित एका समारंभात बोलत होते. देशामध्ये २०२५पर्यंत क्षयरोगामुळे एकही मृत्यू होता कामा नये, हे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार प्रतिबद्ध असल्याचं नड्डा यांनी यावेळी नमूद केलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएससी नं वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता आणि प्रवेश अर्थात नीट या परीक्षेसाठी आणखी २३ केंद्रं वाढविली आहेत. या केंद्रांसह एकूण १०३ केंद्रांवर सात मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ४१ टक्के विद्यार्थ्यांची वाढ झाली असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये बदल करायचा आहेत, ते विद्यार्थी २७ मार्चपर्यंत हा बदल करू शकत असल्याचं मंडळानं सूचित केलं आहे.

दरम्यान, नीटमध्ये पुढील वर्षापासून उर्दू माध्यमाचा समावेश करण्यास मान्यता देण्यात येईल, असं सरकारनं म्हटलं आहे. नीट परिक्षेत उर्दू माध्यमाचा समावेश करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावरील सुनावणी दरम्यान सरकारनं, नीट परिक्षेची प्रक्रिया सुरु झाल्यानं यावर्षी उर्दू माध्यमाचा समावेश करता येणार नसल्याचं सांगितलं.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं कोळसा खाण घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि उद्योजक नविन जिंदाल आणि इतर पाच जणांच्या विरोधात अतिरिक्त आरोपपत्र दाखल केलं आहे. विशेष सीबीआय न्यायालयानं या आरोपपत्राची दाखल घेत सर्व नव्या आरोपींना समन्स बजावले आहेत. या आरोपींमध्ये जिंदाल यांच्यासह त्यांचे सल्लागार आनंद गोयल, गुरगांव इथल्या ग्रीन इन्फ्राचे उपाध्यक्ष सिद्धार्थ माद्रा, मुंबईमधल्या एस्सार पावरचे कार्यकारी उपाध्यक्ष सुशील कुमार मारू यांचा समावेश आहे.

****

येत्या तीन महिन्यांत देशभरात नव्वद नविन पारपत्र कार्यालयं सुरु केली जाणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. आगामी काळात ई-पासपोर्ट देण्याचं नियोजनही केंद्र सरकारनं केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

काळा पैसा बाळगणाऱ्यांनी आपल्या बेहिशेबी रकमेचा तपशील ३१ मार्चपर्यंत जाहिर न केल्यास त्यांच्या बँक खात्यात जमा रकमेच्या १३७ टक्के कर वसूल केला जाऊ शकतो, असं प्राप्तीकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. प्राप्तीकर विभागानं यापूर्वीही याबाबत सूचना दिलेली असून, यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

****

भारत कच्चा मालाचा पुरवठादार देश म्हणून न राहता जगभरात उत्तम दर्जाचा रसायन उत्पादन पुरवणारा देश म्हणून उदयाला येईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केला. मुंबई इथं रसायन उद्योगाशी संबंधित परिषदेच्या पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कॉर्पोरेट करात पाच टक्के सूटही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नसून, रस्ते विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. ग्रामीण भागातले रस्ते जिल्हा परिषदेच्या ताब्यात असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळण्याकरता जिल्हा परिषदांनी विशिष्ट काळात ना-हरकत दाखला दिला नाही, तर तो मिळाला असं गृहित धरलं जाईल, असं मुंडे यांनी सांगितलं.

****

समर्थ रामदास स्वामींची जन्मभूमी असलेल्या जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात जांबसमर्थ गावाच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाकडून पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून उद्यान, नवीन रस्ते, तलावांचं सुशोभीकरण, सभागृह बांधकाम, पेयजल सुविधा, आदी कामं केली जाणार आहेत.

****

No comments: