Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 25 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय
स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिलची जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधानभवनात
झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी जमिनीची
कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तांतरित केली. इंदू मिलच्या जागेवर
जनतेच्या मनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचं काम लवकरच पूर्ण
होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. स्मारक उभारण्यासाठीची कारवाई राज्य शासनानं यापूर्वीच
सुरु केली असून, आता स्मारक उभारणीच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या शेतकऱ्याला
मंत्रालयात मारहाण झाल्याप्रकरणी आज विधानभवनात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी विधानसभेच्या
सकाळच्या कामकाजावर बहीष्कार टाकला होता. आमदारांच्या निलंबनावरुनही विरोधकांनी सभागृहाच्या
कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
विधान परिषदेतही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधकांनी
गदारोळ केला. मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर
करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी केली. यावरुन गदारोळ
वाढत गेल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
दोनशे कोटी रुपयांची उलाढाल असलेला मोह फुलांचा उद्योग
वनविभागाच्या ताब्यातून मुक्त करण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
आज विधानसभेत केली. यापुढे मोहफुलाच्या वाहतुकीवर वनविभागाचं नियमन राहणार नसून, राज्य
उत्पादन शुल्क विभाग याबाबतची कारवाई करेल, असं ते म्हणाले.
****
विधीमंडळ म्हणजे जनसामान्यांचे प्रश्न सोडविणारं सर्वोच्च
व्यासपीठ असल्याचं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केलं आहे. विधानमंडळात
आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. विधीमंडळात संमत झालेल्या कायद्यांमुळे जनतेला
दिलासा तर मिळतोच परंतु त्याचबरोबर राज्य विकासाच्या दिशेने पुढे जात असते, असं
मत त्यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र विधानमंडळानं उत्तम कामकाजाची परंपरा निर्माण केलेली
असून, ती यापुढेही पाळली जायला हवी असंही बागडे म्हणाले.
****
शेतकरी कर्ज मुक्तीसाठी विरोधी पक्षांनी येत्या २९ मार्चपासून
राज्यभरात संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या
सर्व आमदारांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
ही माहिती दिली. काल मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करत चव्हाण
यांनी, पोलिसांनी त्या शेतकऱ्याची तक्रार नोंदवून घेतली नसल्याची टीका केली.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा - नीटसाठी नांदेड आणि
लातूर इथं केंद्र सुरु करण्याची मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याकडे केली आहे. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चव्हाण यांनी ही मागणी केली.
या मागणीवर विचार करुन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपूरावा
करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ‘नीट’परीक्षेसाठी
देशभरात नवीन २३ परीक्षा केंद्र सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, यात
महाराष्ट्रातल्या अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर आणि सातारा या चार जिल्ह्यांचा
समावेश आहे, मात्र मराठवाड्यात औरंगाबाद वगळता एकही परिक्षा केंद्र
नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
बदलत्या काळाच्या ओघात माहिती आणि जनसंपर्क विभागानं गतिमान
संवादासाठी अद्ययावत कार्य पद्धती अवलंबून शासनाच्या सर्व जनहिताच्या योजना शेवटच्या
माणसापर्यंत गतीनं पोहोचवाव्यात, असं आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन
येरावार यांनी केलं आहे. मुंबई इथं आज झालेल्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या आढावा
बैठकीत ते बोलत होते. राज्यातले सर्व जिल्हा माहिती कार्यालये जिल्हा वार्षिक योजनेतून
आधुनिक सोयीसुविधांनी अद्ययावत केली जावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
दिले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’
या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा तिसावा
भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशाला इथं सुरु असलेल्या
चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात आजच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या
डावात ३०० धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण
केलेला कुलदीप यादवनं चार बळी घेतले. उमेश यादवनं दोन, तर भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन
अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
No comments:
Post a Comment