Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय करता येईल, असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्र
सरकारला विचारलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं
चार आठवडयांच्या आत योजना सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणी
दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. केंद्रानं यासंदर्भात राज्य सरकारांनाही विचारणा
करावी असंही न्यायालयानं सांगितलं आहे.
****
वस्तु आणि सेवा कर - जीएसटी संबंधित सर्व विधेयकं आज लोकसभेत
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केली. नुकसान-भरपाई, केंद्रीय वस्तू सेवा कर, केंद्रशासीत वस्तू सेवा कर
आणि एकात्मिक वस्तू सेवा कर अशी
ही विधेयकं आहेत. संसदेच्या
मंजुरीनंतर प्रत्येक राज्य विधिमंडळात ही विधेयकं सादर होतील. येत्या एक जुलैपासून देशात
वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं आहे.
****
अल्पसंख्याक आयोगासह अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्ग
आयोगातल्या रिक्त जागांच्या मुद्यावरून राज्यसभेचं कामकाज प्रथम तीन वेळा आणि नंतर
दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं.
****
धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून अद्याप
कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं, अनुसूचित जाती जमाती विकास मंत्री जुएल ओराम यांनी
लोकसभेत सांगितलं. राज्ससरकारनं प्रस्ताव दिला, तर त्यावर विचार केला जाईल, असं ते
म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील,
भाजपचे चिंतामण वानगा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
****
बालमजुरीला आळा घालण्यासाठी मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात
जिल्हा दक्षता समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात असल्याचं, कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितलं आहे. औरंगाबादचे
खासदार चंद्रकांत खैरे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
****
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना सर्वच विमानकंपन्यांनी
प्रवास सेवा देण्यास बंदी घातल्याप्रकरणाकडे शिवसेनेनं आज लोकसभेचं लक्ष वेधलं. याप्रकरणी
सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी, आणि ही बंदी मागे घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी
शिवसेना खासदार आनंदराव अडसुळ यांनी केली.
दरम्यान, गायकवाड यांच्या समर्थनात आज शिवसेनेनं उस्मानाबाद
बंद पुकारला आहे. गायकवाड यांना गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली
विमानतळावर उद्धट वागणूक देण्यात आली, तसंच विमान कंपन्यांनी प्रवासी सेवा देण्यास
नकार दिल्यानं हा बंद पुकारण्यात आला आहे. लोहारा आणि उमरगा तालुक्यात व्यापारी संघटनांनी
बंदला पाठिंबा दिल्यानं, बंदचा परिणाम जाणवत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बी एस-३ या प्रकारच्या वाहनांच्या विक्रीला
प्रतिबंध घालण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अशा वाहनांच्या प्रदुषणामुळे
होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांच्या नुकसानभरपाईपोटी वाहनमालकांकडून कर वसुली केली जाऊ
शकेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. कार्बन उत्सर्जित करणाऱ्या बी एस ४ इंजिनचा वापर
करणाऱ्या वाहनांसाठीचे नियम येत्या एक तारखेपासून लागू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर
वाहन निर्मात्या कंपन्यांकडून दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं या सूचना
दिल्या.
****
हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड या कंपनीनं एक हजार लढाऊ हेलिकॉप्टर्स
तसंच शंभरहून अधिक विमानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे अध्यक्ष
तसंच व्यवस्थापकीय संचालक टी सुवर्णा राजू यांनी
नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. हवाई दलाकडे दरवर्षी १६ याप्रमाणे येत्या आठ वर्षात १२३ तेजस विमानं सुपूर्द
करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे
****
नांदेडमधल्या प्रत्येक तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून
विविध विकास योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध
विकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं
आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार इथं ते बोलत होते. शासकीय अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख योजना पारदर्शकरित्या
राबवाव्यात असं सांगून, शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायही करण्याचं आवाहनही
जानकर यांनी यावेळी केलं.
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं परवा २९
तारखेपासून राज्यभरात काढल्या जात असलेल्या संघर्ष यात्रेचा भाग म्हणून आजपासून, औरंगाबाद
इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरु करण्यात येणार आहे. ३१ मार्च पर्यंत
शासनानं कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा यासंदर्भात
घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला
//****//
No comments:
Post a Comment