आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२३ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात
आज सुनावणी होणार आहे. याप्रकरणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,
मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह १३ आरोपी आहेत. या सर्वांना केवळ तांत्रिक
कारणावरुन दोषमुक्त करता येणार नाही, असं न्यायालयानं आधीच्या सुनावणी दरम्यान सांगितलं
होतं.
****
२०३० पर्यंत देशातल्या प्रत्येक घरात
नळाचं पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय पेयजल तथा स्वच्छता
मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. जागतिक जलदिनाच्या निमित्तानं नवी दिल्ली
इथं राष्ट्रीय जल गुणवत्ता मोहीमेचं उद्घाट्न काल तोमर यांच्या हस्ते झालं त्यावेळी
ते बोलत होते. २५ हजार कोटी रुपये खर्चाच्या या मोहिमेच्या माध्यमातून देशातल्या सुमारे
२८ हजार पाणीटंचाईग्रस्त ठिकाणी सुरक्षित पाणी उपलब्ध करुन दिलं जाईल अशी माहिती तोमर
यांनी दिली. यावेळी त्यांनी वॉटर ॲप चं उद्घाटन केलं.
****
माजी आमदार आणि खासदारांना देण्यात येणारं
निवृत्ती वेतन आणि प्रवास भत्ते रद्द करण्यात यावेत, असा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात
दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार, लोकसभा आणि राज्यसभेचे
सचिव आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांना नोटीस बजावून उत्तर देण्यास सांगितलं आहे.
एका अशासकीय स्वयंसेवी संस्थेनं ही याचिका दाखल केली असून, माजी आमदार -खासदारांना
मिळणाऱ्या लाभांबद्दल कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याचं, या याचिकेत म्हंटलं आहे.
****
ऑस्ट्रीया इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक
जागतिक हिवाळी स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १८ पदकं जिंकली आहेत. यात सहा सुवर्ण, चार
रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताकडून ८९ दिव्यांग खेळाडू या स्पर्धेत
सहभागी झाले आहेत.
//*****//
No comments:
Post a Comment