आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२९ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
विरोधी पक्षांनी नकारात्मक राजकारण करू नये, असं आवाहन
माहिती आणि प्रसारणमंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी केलं आहे. देशातली जनता अशा नकारात्मक
राजकारणानं त्रस्त झाली असून, संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालावं, अशी इच्छा करत असल्याचं
नायडू यांनी म्हटलं आहे. चर्चेसाठी सबळ मुद्दे नसल्यानं विरोधी पक्ष राज्यसभेचं कामकाज
चालू देत नसल्याचंही नायडू यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा अर्थात नीट ही परिक्षा
देणाऱ्या विद्यार्थ्यांना, परिक्षाकेंद्र बदलून घेण्यासाठी अजून चार दिवसां ची मुदतवाढ
देण्यात आली आहे. एमबीबीएस आणि बीडीएस या परिक्षांसाठी येत्या सात मे ला ही प्रवेश
परिक्षा होणार असून, ज्या विद्यार्थ्यांना आपले परिक्षा केंद्र बदलून घ्यायचे असेल,
त्यांना नीटच्या संकेतस्थळावरून ते येत्या ३१ तारखेपर्यंत बदलून घेता येईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं परिक्षा केंद्रांच्या
यादीत राज्यातल्या नांदेड या शहराचाही आता समावेश केला आहे.
****
महामार्गांलगत मद्यविक्रीला बंदी घालण्याच्या निर्णयाला
विरोध करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे. गेल्या वर्षी
डिसेंबरमध्ये, महामार्ग आणि राज्यमार्गांलगत पाचशे मीटर अंतरामध्ये मद्यविक्री करण्याला
बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता, याच्या विरोधात मद्य व्यावसायिकांनी याचिका
दाखल केली आहे.
****
राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असून काल राज्यातल्या
रायगड जिल्ह्यातल्या भीरा या गावी जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची
नोंद झाली. काल भीरा इथं ४६ पूर्णांक ५ अंश तापमानाची नोंद झाली. न्यूझीलंडजवळच्या
सामोआ इथं काल जगातलं सर्वाधिक म्हणजे ४९ पूर्णांक ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं.
या यादित अकोल्याचा अकरावा क्रमांक होता, तिथे ४३ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं
गेलं. मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसहून जास्त तापमानाची नोंद झाली.
//******//
No comments:
Post a Comment