Friday, 31 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

राष्ट्रीय आरोग्य धोरणाची अंमलबजावणी होत असून, रोगापासून निरोगाकडे जाण्याचं सरकारचं ध्येय असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. लोकसभेत यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना ते आज बोलत होते. या धोरणाअंतर्गत देशभरात लसीकरणाचं प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढवलं असून, विविध आजारांवरील लस उत्पादनही वाढवलं असल्याचं ते म्हणाले. मानसिक आजारांसंदर्भात देशभरात शंभर जिल्ह्यात सर्वेक्षण सुरु केलं असून, याद्वारे आजारांबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यसभेत काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी शून्यप्रहरात हानिकारक कीटकनाशक तसंच रासायनिक खतांच्या बेसुमार वापरावर नियंत्रण घालण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलण्याची मागणी केली.

लोकसभेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लष्करानं संपादित केलेल्या शेतजमिनींचा मोबदला अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात विद्यापीठ तसंच महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांना सहावा वेतन आयोगानुसार २००६ ते २०१० पर्यंतची थकबाकी त्वरित देण्यात यावी अशी मागणी भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांनी शून्यप्रहरात केली.

भाजपचे खासदार महंत शंभुप्रसाद यांनी काश्मीरात सैन्यदलाच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात निवेदन देताना, सैन्य दलामार्फत योग्य कारवाई सुरू असल्याचं सांगतानाच, काश्मीरातल्या तरुणांनी दहशतवादी भूलथापांना बळी पडू नये, तसंच शांतता राखण्याचं आवाहन केलं.

****

अयोध्येतल्या राम मंदिर प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सुब्रहमण्यम स्वामी ही याचिका दाखल केली होती. याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली होती. स्वामी यांची या खटल्यात काय भूमिका आहे, असंही न्यायालयानं विचारलं आहे.

****

राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या ५०० मीटर परिसरात मद्यविक्रीला बंदी घालणाऱ्या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. काल याबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान, राष्ट्रीय महामार्गासाठी हा निर्णय योग्य असला तरी बहुतांश ठिकाणी राज्य महामार्ग नागरी भागातून गेले असल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करणं शक्य नसल्याचं सांगत काही राज्यसरकारांनी ही याचिका दाखल केली आहे.

****

वैधमापनशास्र विभागानं महाराष्ट्रात सात पेट्रोलपंप जप्त करुन सहा वितरकांविरुद्ध खटले नोंदवले आहेत. पेट्रोलच्या मापात तूट करुन ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं तपासणीमध्ये आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली. राज्यातल्या सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत.

****

जलवाहिनी फोडून बेकायदेशिररित्या पाणी घेणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन फौजदारी कारवाई करण्यात येईल, सा  इशारा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. काल विधानसभेत हिंगोली जिल्ह्यातल्या दाटेगाव पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

****

संगणकातल्या प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीमुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यांमधून यू.पी.आयच्या माध्यमातून सुमारे २५ कोटी रूपये अवैधरित्या हस्तांतरित करण्यात आल्याचं राष्ट्रीय देयकं महामंडळाकडून काल सांगण्यात आलं. खात्यामध्ये पैसे नसतांनाही हे पैसे पाठवले गेले असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलं. सुमारे १९ बँकांमध्ये हे पैसे पाठवले गेले असून ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आणि या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ए.पी. होटा यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा जास्तीत-जास्त प्रचार-प्रसार करत स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असं हिंगोली जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी. आर. शिंदे यांनी म्हटलं आहे. जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना मेळाव्यात ते बोलत होते. हिंगोली जिल्ह्यातल्या एक हजार २६८ लाभार्थ्यांना मुद्रा बँक योजनेतंर्गत सुमारे २० कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

//********//

No comments: