आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२८ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
चैत्र
शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. शालिवाहन
शके १९३९ ला आज प्रारंभ झाला. नागरिकांनी घरोघरी गुढ्या तोरणं उभारून नववर्षाचं स्वागत
केलं. सातवाहन घराण्याचा राजा शालिवाहन याची राजधानी असलेल्या तत्कालिन प्रतिष्ठान
नगरी अर्थात पैठण शहरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. यानिमित्तानं शहरातून प्रभात
फेरी काढली जाते. खंडोबा चौकातून निघालेली ही मिरवणूक तीर्थस्तंभाजवळ विसर्जित होते.
दरम्यान,
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीचा बाह्यरूग्ण विभाग आज
गुढीपाडव्यानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहे, रुग्णालयाच्या वैद्यकीय
अधीक्षकांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
****
जलस्वराज्य
टप्पा दोन अंतर्गत, राज्यातल्या बारा जिल्ह्यातल्या निमशहरी, आणि टंचाईग्रस्त गावांना
शाश्वत आणि शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या
सुधारणा सहाय्य कक्षाचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दिलीप देशमुख यांनी काल दिली. नांदेड
जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत सरपंच
आणि ग्रामसेवकांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी
करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद
महानगरपालिका आणि
नगरसेवकांच्या परवानगीनं आरोग्य शिबीर लावल्याचं सांगून, सर्वसामान्य
नागरिकांना कथित आयुर्वेदिक औषधं देऊन फसवणूक करणाऱ्या, २०
बोगस डॉक्टरांच्या टोळीला काल औरंगाबाद
शहरातल्या चिकलठाणा परिसरात अटक करण्यात आली. पथकात केवळ बारावी उत्तीर्ण असलेल्या, महिला
सदस्य डॉक्टर असल्याचं भासवून नागरिकांकडून
पन्नास रुपये नोंदणी शुल्क तसंच औषधासाठी आणखी ५० रुपये घेत होत्या, यापैकी काही महिला फरार झाल्या, तर सहा
महिलांना पोलिसांनी अटक केली.
****
राजस्थानमधल्या अजमेर इथं, उर्ससाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं विशेष
गाड्या सोडण्यात येणार आहेत. नांदेड ते अजमेर ही विशेष गाडी, येत्या १ एप्रिल रोजी नांदेड इथून, काचीगुडा-अजमेर
ही विशेष रेल्वे गाडी काचीगुडा इथून ३१ मार्च रोजी, तर हैदराबाद ते अजमेर ही औरंगाबाद मार्गे
जाणारी विशेष रेल्वे गाडी हैदराबाद इथून ३१
मार्च रोजी सोडण्यात येणार आहे.
//****//
No comments:
Post a Comment