Friday, 31 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 31 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा - एनईईटी साठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा शिथील करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं या परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्ष निश्चित केली होती. त्याविरोधात दाखल याचिकेवर सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ही वयोमर्यादा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून निश्चित करण्याचे निर्देश देत, या वर्षी २५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले इच्छुकही परीक्षेला पात्र असतील, असं स्पष्ट केलं आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदतही न्यायालयानं पाच एप्रिलपर्यंत वाढवून दिली आहे.

****
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर केलं. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर सीमा शुल्क तसंच केंद्रीय उत्पादन शुल्क कायद्यानुसार वसूल करण्यात येणारा अधिभार या दुरुस्तीनंतर रद्द होणार आहे.

****
केंद्र सरकारनं एप्रिल ते जून या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरचे व्याजदर एक दशांश टक्क्यानं कमी केले आहेत. नवीन दरानुसार पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निधी आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर सात पूर्णांक नऊ दशांश टक्के, किसान विकास पत्रावर सात पूर्णांक सहा दशांश टक्के, तर सुकन्या समृध्दी योजनेवर आठ पूर्णांक चार दशांश टक्के दरानं व्याज मिळेल. एक ते पाच वर्ष कालावधीच्या ठेवींवर सहा पूर्णांक नऊ दशांत ते सात पूर्णांक सात दशांश टक्के व्याजदर राहील.

****
विधीमंडळाची दोन्ही सभागृह संविधानानं तयार केलेली सार्वभौम सभागृह आहेत. त्यामुळे आमदारांना सभागृहाचा अवमान करणारं मत मांडता येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी केलेल्या विधानावर विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी आक्षेप घेत घोषणाबाजी केली, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. सभागृहात सर्व सदस्यांचा सन्मान राखला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****
राज्य सहकारी बँकांमधील गैरव्यवहारांच्या जवळपास दोन हजार प्रकरणांची चौकशी वेळेत व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येईल, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोतराच्या तासात सांगितलं.

****
राज्याचा २०१७-२०१८ वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधासभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात विनियोजन विधेयक मांडलं. विरोधकांच्या गैरहजेरीमुळे ते एकमतानं मंजूर झालं.

****
मनोधैर्य योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीन लाख रुपयांची मदत दहा लाख रुपयांपर्यंत वाढवून देण्याचा प्रयत्न असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितलं. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असंही त्या म्हणाल्या.
राज्यात बिअर बार तसंच मद्य विक्री केंद्रांना महापुरुष, गडकिल्ले आणि देवदेवतांच्या नावाचे फलक लावण्यास प्रतिबंध करणारा कायदा, येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

****
राष्ट्रीय विधी आयोगाने शासनाकडे सादर केलेलं वकिल कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत मांडू नये या मागणीसाठी आज वकिलांनी सर्वत्र काम बंद आंदोलन केलं. औरंगाबाद इथं जवळपास सर्वच विधीज्ञांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. धुळे तसंच कोल्हापूर इथंही वकिलांनी कामबंद आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. बार कौन्सिलची निवडणूक लढवण्यासाठी किमान दहा वर्षांचा अनुभव असावा, वकीलांविरुध्द तक्रारींच्या चौकशीसाठी कौन्सिलच्या सदस्यांऐवजी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती आदी सुधारणा या विधेयकात सुचवल्या आहेत, त्यांना वकिलांचा विरोध आहे.

****
औरंगाबाद इथल्या सीटू कामगार संघटनेचे संस्थापक सदस्य कॉम्रेड छगन साबळे यांचं आज सकाळी औरंगाबाद इथं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. शहरातल्या रमानगर स्मशान भूमीत आज संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****
लातूर आणि रेणापूर तालुक्यात सिंचन तसंच पेयजल पुरवठ्यासाठी मांजरा प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग करण्याची मागणी आमदार त्र्यंबक भिसे लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

****
मराठवाड्यात आज नांदेड इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. परभणी इथं ४२ पूर्णांक तीन, औरंगाबाद तसंच बीड इथं ४१ अंश तर उस्मानाबाद इथं ३८ पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments: