Friday, 24 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 24 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

रुग्णांना ओलीस धरण्याची डॉक्टरांची भूमिका खपवून घेण्यासारखी नाही, सुरक्षेसह सर्व मागण्या मान्य करूनही डॉक्टर कामावर रूजू होणार नसतील तर, सरकार कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्यभरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमधून निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजा आंदोलनबाबत ते आज विधानसभेत बोलत होते.
या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आजही डॉक्टरांच्या संघटनेसोबत बैठक घेत, रुग्णांचे होत असलेले हाल  तसंच डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलत असल्यानं आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यावर निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून संप मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष अशोक तांबे यांनी सांगितलं.
रम्यान, रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभाग तसंच अपघात विभागात रुग्णांच्या किती नातेवाईकांना प्रवेश द्यावा, या संदर्भात पाहणी करून, अहवाल देण्यासाठी निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती केली असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
निवासी डॉक्टर संघटनेची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत सध्या बैठक सुरू असल्याचं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

****

कामावर रूजू न होणाऱ्या निवासी डॉक्टरांवर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत. काल झालेल्या सुनावणीत डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचे आदेश देऊनही, डॉक्टरांनी आंदोलन सुरू ठेवल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी खासगी डॉक्टरांनी आज बंद पाळल्याचं दिसून आलं. नांदेड, धुळे तसंच नाशिक शहरात खासगी डॉक्टरांनी आज दवाखाने बंद ठेवल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधानसभेत शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन केलं. यासंदर्भात केंद्राकडे मदत मागितली, असून कर्जमाफीसंबंधी केंद्र सरकारला योजना तयार करण्याची विनंती केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांचं वर्तन योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. अर्थसंकल्पाची प्रत जाळणं चुकीचं असून, यामुळे झालेल्या आमदारांच्या निलंबनाप्रकरणी चर्चेला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. 
विधान परिषदेत या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केल्यानं सलग बाराव्या दिवशी कामकाज होऊ शकलं नाही. कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. त्यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. 

****

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याकडून शिवसेनेनं स्पष्टीकरण मागितलं आहे. शिवसेना कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही, असं पक्षानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी विमान कंपनीची चूक असून, आपण कदापिही माफी मागणार नसल्याचं, गायकवाड यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
दरम्यान, एअर इंडियासह इतर चार खासगी विमान कंपन्यांनी, गायकवाड यांना आपल्या विमान सेवेचा लाभ घेता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. एअर इंडियानं गायकवाड यांचं आजचं आरक्षित दिल्ली पुणे विमान तिकीटही रद्द केलं आहे.

****

केंद्र शासनाच्या डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत आज नांदेड इथं डिजीधन मेळावा घेण्यात आला. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. या मेळाव्यात विविध बँका, व्यापारी कंपन्या, तसंच शासकीय विभाग सहभागी झाले आहेत.

****

औरंगाबाद रेल्वे स्थानकात बांधण्यात आलेल्या दोन स्वयंचलित जिन्यांचं उद्या लोकार्पण होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हैदराबाद इथून दूरदृष्य प्रणालीद्वारे या जिन्यांचं लोकार्पण होणार आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकात पूर्णपणे रोखरहित व्यवहारांनाही उद्यापासून प्रारंभ होईल. दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.  

****

मराठवाड्यात चालू आर्थिक वर्षात पीककर्ज वाटपात परभणी जिल्हा अग्रेसर ठरला आहे. परभणीचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. एक हजार ६३१ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट असताना, परभणी जिल्ह्यात एक हजार ६४९ कोटी रूपये पीककर्ज वाटप करण्यात आलं.

****

शाश्वत विकासासाठी अन्न तसंच राष्ट्रीय सुरक्षा आवश्यक असल्याचं, निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांनी म्हटलं आहे. “शिवकालीन शेती, जलव्यवस्थापन आणि वर्तमान संदर्भ” या विषयावर औरंगाबाद इथं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन दांगट यांच्याहस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते.

****

No comments: