Wednesday, 29 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

वस्तू आणि सेवा कर विधेयकावर लोकसभेत सध्या चर्चा सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वस्तू आणि सेवा कर संदर्भातली चार विधेयकं आज सदनासमोर मांडली. याअंतर्गत राज्यांना नुकसान भरपाई विधेयक, केंद्रीय वस्तू सेवा कर विधेयक, केंद्रशासीत वस्तू सेवा कर विधेयक तसंच एकात्मिक वस्तू सेवा कर विधेयक या चार विधेयकांवर चर्चा आणि त्यानंतर मतदान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपल्या खासदारांनी व्हीप जारी केलं आहे.

****

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत निर्धारित ४०० कौशल्य विकास केंद्रांपैकी १०० केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. कौशल्यविकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. लोकसभेत प्रश्नकाळात हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी यासंदर्भातल्या विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. पुढच्या महिनाभरात आणखी ४० तर येत्या सहा महिन्यात दोनशे पन्नास केंद्रं स्थापन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, रुडी यांनी सांगितलं.

****

देशभरात ११०० पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर शुद्धपेयजल विक्री यंत्र बसवली असून, या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना नाममात्र दरात शुद्ध पेयजल उपलब्ध करून दिलं जात असल्याचं, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. लोकसभेत प्रश्नकाळात लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, रेल्वेमंत्र्यांनी देशभरात सर्वच रेल्वे स्थानकांवर शुद्ध पेयजल विक्री यंत्र बसवली जात असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. ई केटरिंगच्या माध्यमातून प्रवाशांना आपल्या पसंतीचे प्रादेशिक पदार्थ रेल्वे प्रवासात उपलब्ध होतील. स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

****

विमुद्रीकरणानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पडून असलेल्या सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. रबी हंगामासाठी पीक कर्ज वितरणावर याचा नकारात्मक परिणाम झाल्याचं पवार यांनी सांगितलं.

****

डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे देशातल्या इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा, यांनी दिली आहे. भारतीय दूरसंचार प्राधिकरण- ट्रायनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात सुमारे चाळीस कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. येत्या तीन वर्षात ही संख्या त्र्याहत्तर कोटीवर जाईल, असा अंदाज असून, २०२० पर्यंत साठ कोटी ब्रॉड बँड जोडण्या दिल्या जाणार आहेत. भारतनेट प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतींना फायबर नेटनं जोडलं जात असल्याची माहितीही सिन्हा यांनी दिली.

****

काश्मीर खोऱ्यातली रेल्वेसेवा आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे. काल बडगाम जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांविरूद्ध सुरू असलेल्या सुरक्षा दलाच्या मोहिमेवर दगडफेक करणाऱ्या जमावावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात तीन तरूण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर, फुटीरतावाद्यांनी आज बंद पुकारला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेसेवा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीरमधील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत.

****

गोव्याचे महसूलमंत्री रोन खावंटे यांनी कार्यालयात उशीरा येणाऱ्या चौदा अधिकाऱ्यांना दोन दिवसांसाठी निलंबित केलं. खावंटे यांनी विविध शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेट देऊन पाहणी केल्यानंतर, ही कारवाई केली. जनतेला सेवा पुरवायची असल्यामुळे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येण्याची वेळ पाळलीच पाहिजे, असं खावंटे यांनी यावेळी नमूद केलं.

****

औरंगाबाद शहरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन आणि स्मारक उभारण्यासाठी राज्यशासनानं पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या वर्षी चार ऑक्टोबरला औरंगाबाद इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सिडकोनं सात हेक्टर जमीन महानगरपालिकेला हस्तांतरित केली आहे. आता या जागी स्मृतिवन आणि स्मारक उभारण्यात येणार आहे.

****

वाशीम जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या शेतकऱ्यांनी काल नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर काळी गुढी उभारून शासनाचा निषेध केला. नाफेडचं हे तूर खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//*******//


No comments: