आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
राज्यातल्या
कंत्राटी ग्रामसेवकांना तीन वर्ष सेवाकाळ आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १२ वर्षांचा
लाभ देण्यासाठी मुख्य सचिवांकडे पाठपुरावा करणार असून इतर मागण्यांसंदर्भात सकारात्मक
निर्णय घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. विधान
भवनात ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्या
बोलत होत्या. पदनिश्चितीबाबत आकृतीबंधाचे काम सुरु असून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी
यांची पदं संकलित करण्यात येत असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या औषध विक्री दुकानांमध्ये फार्मासिस्टचा तुटवडा जाणवत
असून त्यावर उपाययोजना म्हणून बी. फार्मच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ‘कमवा
शिका योजने’अंतर्गत या दुकानांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी दिली. औषध विक्री
दुकानांमध्ये प्रशिक्षीत फार्मासिस्ट असणं आवश्यक असून प्रशिक्षीत
फार्मासिस्ट नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल असंही बापट यांनी सांगितलं.
****
महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेतंर्गत
राज्यातली १५४ गावं तंटामुक्त गावं म्हणून घोषित करण्यात आली आहेत. २०१५-१६ या वर्षासाठीच्या या पुरस्कारांची घोषणा
राज्यशासनानं नुकतीच केली आहे. यापैकी
११ गावं विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत.
****
औरंगाबाद इथल्या छत्रपती शाहू महाराज
शिक्षण संस्थेच्या दंत महाविद्यालयातील दंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश
क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण
मंत्रालयानं या महाविद्यालयांना सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विषयात
तीन वरुन पाच एवढी विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार
अभियानांच्या कामांसाठी पुणे इथल्या ॲम्पासेट या खाजगी कंपनीकडून १८ लाख ५४ हजार रूपयांचा
निधी काल जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना सुपुर्द करण्यात आला. या निधीमधून हरंगूळ
इथं दोन सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामं केली जाणार आहेत.
//****//
No comments:
Post a Comment