Sunday, 26 March 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 26.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

आजचा २६ मार्च हा दिवस बांगलादेशाचा स्वातंत्र्यदिन आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील नागरिक बंधु-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या मालिकेच्या ३०व्या भागात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. बांगलादेशाच्या प्रगती आणि विकासाच्या वाटचालीत भारत एक समर्थ सहकारी आणि चांगला मित्र असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर बांगलादेश आणि आपल्यातला एक सामायिक वारसा असून, आपल्या प्रमाणेच बांगलादेशचं राष्ट्रगीतही टागोर यांचीच रचना असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

गुरुदेव टागोरांना १९१३ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला तसंच इंग्रजांनी त्यांना नाईटहूड हा किताबही दिला. त्याच काळात १९१९मध्ये जालियनवाला बागेत इंग्रजांनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात निर्घृण हत्या केली, तेव्हा रविंद्रनाथ टागोर त्या महापुरुषांपैकी होते, ज्यांनी या घटनेविरुद्ध आपला आवाज बुलंद केला, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. त्याच वेळी १२ वर्षाच्या एका मुलाच्या मनावर या घटनेचा विलक्षण परिणाम झाला होता. तो बालक म्हणजेच आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान असणारे शहीद भगतसिंग. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग तसंच त्यांचे सहकारी सुखदेव आणि राजगुरु यांना इंग्रजांनी फासावर चढवलं होतं. हे तीन वीर आजही आपल्यासाठी प्रेरणस्थान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलिदानाच्या गाथेला शब्दांचे अलंकार अपुरे पडतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

देशवासियांच्या मनात घाणीविषयी तिरस्कार निर्माण व्हायला हवा. एकदा घृणा निर्माण झाली, रोष निर्माण झाला की आपण अस्वच्छतेविरुद्ध काही ना काही करू. स्वच्छता ही गोष्ट चळवळीपेक्षा सवयीशी अधिक संबंधीत आहे असं पंतप्रधान म्हणाले.

आपण अन्नाची नासाडी करतो. अन्न वाया घालवलं नाही तर किती तरी गरीबांचं पोट त्यात भरू शकतं असं सांगत अन्नाची नासाडी हा समाजद्रोह आणि गरीबांवर अन्याय असल्याचं ते म्हणाले.

येत्या सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यन्त युनिवर्सल हेल्थ कव्हरेज, म्हणजे सर्वांसाठी आरोग्य हे ध्येय निश्चित केलं आहे. यंदा जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिप्रेशन म्हणजे उदासीनता यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. जगभरात पस्तीस कोटीपेक्षा अधिक लोक या मानसिक विकारानं पीडित आहेत. उदासीनता दाबून टाकण्याऐवजी प्रगट व्हा, मोकळे व्हा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

नोकरी करणाऱ्या स्त्रीयांना मिळणारी मातृत्व रजा आता २६ आठवडे दिली जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या महत्वपूर्ण निर्णयाचा फायदा सुमारे १८ लाख महिलांना होऊ शकतो असं ते म्हणाले. येत्या ५ एप्रिलला रामनवमी, ९ एप्रिलला महावीर जयंती तर १४ एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या सर्व महापुरुषांच्या जीवनापासून आपल्याला प्रेरणा मिळत राहो अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह अन्य राज्यांमध्ये साजरा होणाऱ्या नववर्ष दिनानिमित्त पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांच्या प्रमुखांना भोजनासाठी आमंत्रित केलं आहे. पुढील आठवड्यात अपेक्षित असलेल्या या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती शिवसेनेनं पीटीआयला दिली आहे.

****

सरकारी कर्मचाऱ्यानं घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयाला प्रत्येक वेळी भ्रष्ट व्यवहार मानलं जाऊ शकत नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं एका कार्यक्रमात बोलत होते. भ्रष्टाचार विरोधातील सुधारीत कायद्याअंतर्गत प्रामाणिक अधिकाऱ्यांना संरक्षण मिळेल, असं ते म्हणाले. सरकारी कर्मचारी, बँक आणि राजकीय नेते मिळून आर्थिक निर्णय घेत असल्यामुळे, आर्थिक उदारीकरण युगात भ्रष्टाचार विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं जेटली म्हणाले.  

****

निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी करणाऱ्या टोटलायजर यंत्राचा वापर करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. या यंत्रामुळे मतं एकत्रित करुन मोजली जात असल्यानं, कोणत्या गावातून किती मतं मिळाली याची माहिती मिळणार नाही. त्यामुळे सर्व गावांचा विकास होण्यास मदत होईल, असं हजारे म्हटलं आहे. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याचं ऐतिहासिक तसंच पर्यटन वैभव टिकवण्यासाठी युनीटी मल्टीकॉन या कंपनीकडे १० वर्षांसाठी किल्ल्याच्या देखभालीचं काम सोपवलं आहे. महाराष्ट्र वैभव संगोपन योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा किल्ला आता निश्चितच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनेल असा विश्वास पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अजित खंदारे यांनी व्यक्त केला आहे. 

****

No comments: