Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतल्या निवासी डॉक्टरांचं सामुहिक
रजा आंदोलन मागे
·
गुन्हा
सिद्धतेसाठी पोलीस दलात ‘ॲम्बिस’ ही प्रणाली वापरण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·
उस्मानाबादचे
खासदार रवींद्र गायकवाड यांना सेवा देण्याचा आघाडीच्या विमान कंपन्यांचा नकार
·
औरंगाबाद
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना
आणि
·
नांदेड
इथं आयोजित डिजीधन मेळाव्याला नागरिकांचा प्रतिसाद
****
राज्यभरातल्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयांतल्या निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून पुकारलेलं रजा आंदोलन काल मध्यरात्रीच्या सुमारास मागे
घेतलं. सुरक्षा व्यवस्थेत वाढ तसंच रुग्णांना
भेटायला येणाऱ्या नातलगांसाठी पास व्यवस्था लागू करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री
गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेऊन, निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले.
औरंगाबाद इथल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्यावतीनं डॉ रोहित
वळसे यांनी निवासी डॉक्टर कामावर रुजू झाल्याची माहिती दिली.
डॉक्टरांच्या सर्व मागण्या पूर्ण करत सरकारनं त्यांना
लेखी आश्वासन दिलं. प्रमुख दोन मागण्या ज्या होत्या सिक्यूरिटी गार्डस् ची संख्या वाढवण्याबाबत
आणि पास सिस्टिम या दोन मागण्यांची त्यांनी अंमलबजावणीही रात्री अकरा वाजेच्या दरम्यानपर्यंत
महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये करण्यात आली आहे. यासाठी या सर्व गोष्टी लक्षात
घेता आम्ही निवासी डॉक्टर रात्री साडे अकरापासून आमची सामुहिक रजा मागे घेत आहोत आणि
कामावर रूजू होत आहोत.
गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या या सामुहिक रजा आंदोलनादरम्यान
मुंबईतल्या शासकीय रुग्णालयात १८१ तर राज्यभरातल्या शासकीय रुग्णालयात ३७७ रुग्णांचा
मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या ५७ तर अंबाजोगाईच्या शासकीय
रुग्णालयातल्या १९ रुग्णांचा समावेश आहे.
डॉक्टरांच्या या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल विधानसभेत केलेल्या निवेदनात, सुरक्षेसह सर्व मागण्या मान्य करूनही
डॉक्टर कामावर रूजू होणार नसतील तर, सरकार कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा दिला होता.
भारतीय वैद्यकीय संघटनेनही काल मुख्यमंत्र्यांसोबत
झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेतला.
दरम्यान,
रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभाग तसंच
अपघात विभागात रुग्णांच्या किती नातेवाईकांना प्रवेश द्यावा, या संदर्भात
पाहणी करून, अहवाल देण्यासाठी निवृत्त पोलीस
महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती केली असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात
येईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी काल दिली.
****
गुन्हा सिद्धतेसाठी पोलीस दलात ऑटोमेटेड मल्टीमोडल बायोमॅट्रीक
आयडेंटिफीकेशन सिस्टम ‘ॲम्बिस’ ही प्रणाली वापरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या नवीन प्रणालीमुळे
आरोपीच्या बोटांचे ठसे तसंच छायाचित्रांची डिजिटल पध्दतीने साठवणूक केली जाईल, गुन्हेगारांचा
शोध तसंच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी ही प्रणाली सहायक ठरेल, असा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ही प्रणाली वापरणारं महाराष्ट्र
हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार कटिबद्ध
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधानसभेत शेतकरी कर्जमाफीसंदर्भात
काल केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केंद्राकडे मदत मागितली, असून कर्जमाफीसंबंधी
योजना तयार करण्याची केंद्र सरकारला विनंती केल्याचं सांगितलं.
अर्थसंकल्पात काही त्रुटी असल्यास सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी, विधीमंडळाचं कामकाज योग्यरित्या सुरू राहण्यासाठी विरोधी पक्षानं कामकाजात सहभाग घ्यावा, असं
आवाहन केलं.
अर्थसंकल्प सादर होत असताना, विरोधी
पक्षाच्या आमदारांचं वर्तन योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. अर्थसंकल्पाची प्रत जाळणं हा संवैधानिक दस्तावेजाचा अवमान असल्याचं त्यांनी नमूद केलं.
विधान परिषदेत शेतकरी कर्जमाफीच्या
मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केल्यानं कालही कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
****
महावितरण कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील प्रक्रिया आता ऑनलाईन
करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल
विधानसभेत दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या घाटशेंद्रा इथले शेतकरी
रामेश्वर भुसारे यांना २३ मार्च रोजी मंत्रालयात झालेल्या मारहाण प्रकरणी पूर्ण चौकशी
करून अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत
सांगितलं.
****
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा शुल्कात सवलत द्यावी अशी मागणी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या
प्रश्नांसंबंधी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
****
एअर इंडियासह देशातल्या आघाडीच्या चार
खासगी विमानसेवा कंपन्यांनी उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांना सेवा न देण्याचा
निर्णय घेतला आहे. गायकवाड यांनी परवा एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली होती,
त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियासह जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईसजेट, गो एअर या कंपन्यांनी
हा निर्णय घेतला. एअर इंडियानं गायकवाड यांचं कालचं दिल्ली पुणे प्रवासाचं तिकीटही
रद्द केलं.
दरम्यान, शिवसेनेनं मारहाणप्रकरणी गायकवाड
यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. गायकवाड यांनी मात्र, या प्रकरणी विमान कंपनीची
चूक असून, आपण कदापिही माफी मागणार नाही, असं म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
****
येत्या तीन महिन्यात देशभरात नव्वद नवीन पारपत्र
कार्यालयं सुरु केली जाणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. ते काल कोल्हापूर
इथं वार्ताहरांशी बोलत होते.
दरम्यान, औरंगाबाद इथल्या पासपोर्ट कार्यालयाचं येत्या मंगळवारी
गुढीपाडव्याला उद्धाटन होणार आहे. त्यानंतर इच्छुकांना संकेतस्थळावर नोंदणी करून, औरंगाबाद
कार्यालयाची मुलाखतीसाठी वेळ घेता येईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं
जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची
स्थापना झाली असून महानगर आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम
भापकर यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. या प्राधिकरणात औरंगाबाद जिल्ह्यातली
औरंगाबाद महापालिका, छावणी परिषद क्षेत्र, औरंगाबाद तालुका तसंच गंगापूर, पैठण, फुलंब्री
आणि खुलताबाद तालुक्यातल्या काही गावांचा समावेश आहे. या विकास प्राधिकरणामुळे शहराचा
विस्तार होणार आहे.
****
डिजीटल प्रदान अर्थात डिजीटल
पेमेंट प्रणालीमुळे राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास नांदेडचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत
आयोजित डिजीधन मेळाव्याच्या
उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत
होते. नांदेड जिल्हा प्रशासनानं ई गर्व्हनन्सद्वारे
लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केलं असल्याचं खोतकर म्हणाले. या मेळाव्यात विविध बँका, व्यापारी
कंपन्या, तसंच शासकीय विभाग सहभागी झाले आहेत. विद्यार्थी, तरुण, उद्योजक,
व्यापारी तसंच शेतकऱ्यांनी यावेळी डिजिटल व्यवहारांबाबत माहिती घेतली.
****
जालना इथल्या उर्मी संस्थेतर्फे दिला
जाणारा कविवर्य ना.धो.महानोर आणि उर्मी राज्य काव्य पुरस्कार, प्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल
वाघ आणि नांदेड इथल्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये,
स्मृतिचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
औरंगाबाद रेल्वे स्थानकात बांधण्यात
आलेल्या दोन स्वयंचलित जिन्यांचं आज लोकार्पण होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
यांच्या हस्ते हैदराबाद इथून दूरदृष्य प्रणालीद्वारे या जिन्यांचं लोकार्पण होईल. औरंगाबाद
रेल्वे स्थानकात पूर्णपणे रोखरहित व्यवहारांनाही उद्यापासून प्रारंभ होईल. दक्षिण मध्य
रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात काल औरंगाबाद विभागीय आयुक्त
कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात
आलं. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, तसंच लालबावटा शेतमजूर
संघटनेच्या नेतृत्वात शेतकरी तसंच ग्रामस्थांच्या
शिष्टमंडळानं विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांची भेट घेऊन, आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना सादर
केलं.
****
शाश्वत विकासासाठी अन्न
तसंच राष्ट्रीय सुरक्षा आवश्यक असल्याचं, निवृत्ती सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांनी म्हटलं आहे. "शिवकालीन
शेती, जलव्यवस्थापन आणि वर्तमान संदर्भ " या विषयावर
औरंगाबाद इथं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं
उद्घाटन दांगट यांच्याहस्ते काल
झालं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ
पत्रकार अमर हबीब, चंद्रकांत वानखेडे यांची काल या चर्चासत्रात व्याख्यानं झाली. मान्यवर
कृषीतज्ज्ञांच्या उपस्थितीत आज या चर्चासत्राचा समारोप होत आहे.
//****//
No comments:
Post a Comment