Sunday, 26 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.03.2017 06.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

ठळक बातम्या

·      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची जमीन राज्य शासनाकडे हस्तांतरित

·      विधानसभेच्या १९ आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक

·      शेतकरी कर्ज मुक्तीसाठी येत्या २९ मार्चपासून राज्यभरात संघर्ष यात्रा काढण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय

·      १ एप्रिलपर्यंत सर्व बॅंकाचं कामकाज सुरू ठेवण्याचे भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे आदेश 

आणि

·      मराठवाड्यात सात हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरूवात - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

****

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची जमीन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळानं काल राज्य शासनाकडे हस्तांतरित केली. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी जमिनीची कागदपत्रं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. स्मारक उभारण्यासाठीची आवश्यक कार्यवाही राज्य शासनानं यापूर्वीच सुरू केली असून, जागा हस्तांतरणामुळे स्मारक उभारणीच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं.

****

विधीमंडळाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी, विधानसभेच्या १९ आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं, विधीमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. अर्थसंकल्प सादर होत असताना गदारोळ करणं तसंच सदनाबाहेर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणं, या कारणासाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांना ३१ डिसेंबरपर्यंत निलंबित करण्याचे आदेश गेल्या बुधवारी काढण्यात आले होते. हे निलंबन रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती तसंच इतर गट नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती बापट यांनी दिली. दरम्यान, विधान परिषदेतल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यानं पत्रकारांना दिलेल्या  माहितीनुसार ज्या आमदारांनी अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्या, त्यांचं निलंबन चालू अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी, तर उर्वरित आमदारांचं निलंबन येत्या बुधवारी मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातले शेतकरी रामेश्वर भुसारे यांना गेल्या गुरूवारी मंत्रालयात झालेल्या मारहाणीचा मुद्दा काल विधान परिषदेत गाजला.

काल सकाळी वरिष्ठ सदनाचं कामकाज सुरू होताच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी या विषयावर स्थगन प्रस्तावाची सूचना देत, मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण होणं, हा सगळ्या शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं म्हटलं. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी ही लाजिरवाणी घटना असल्याचं नमूद केलं.

याप्रकरणी समिती स्थापन करून चौकशी सुरू असल्याचं सांगत गिरीश बापट यांनी, सरकार दोन दिवसात सदनासमोर अहवाल सादर करेल, अशी माहिती दिली. गुढीपाडव्याच्या सुटीनंतर येत्या बुधवारी कामकाज सुरू झाल्यावर अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.

****

शेतकरी कर्ज मुक्तीसाठी विरोधी पक्षांनी येत्या २९ मार्चपासून राज्यभरात संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या सर्व आमदारांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली. मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेचा चव्हाण यांनी निषेध केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नसल्याचं चव्हाण म्हणाले.

****

दोनशे कोटी रुपयांची उलाढाल असलेला मोह फुलांचा उद्योग वन विभागाच्या ताब्यातून मुक्त करण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत केली. यापुढे मोह फुलाच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. मोह फुलापासून शेतीपूरक व्यवसायही करता येतो असं सांगून मोह फुलांवरील कायदेशीर बंधनामुळं त्याचा व्यवसायासाठी वापर होत नव्हता असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

आजपासून येत्या १ एप्रिलपर्यंत सर्व सरकारी आणि काही खासगी बॅंकाचं कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. आर्थिक वर्षाअखेरीस नागरिकांना कर भरणा करणं तसंच अन्य सरकारी देणी देणं सुलभ व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे या व्यवहारांशी संबंधित विभागही या काळात दिवसभर सुरू राहणार आहेत.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीटसाठी नांदेड आणि लातूर इथं केंद्र सुरु करण्याची मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नीटपरीक्षेसाठी मराठवाड्यात औरंगाबाद वगळता एकही परीक्षा केंद्र नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा तिसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मराठवाड्यात सात हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाणार असल्याचं केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं काल हेडगेवार रूग्णालयातील अपघात कक्षाचं उद्घाटन केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व रस्त्यांचे सविस्तर माहिती अहवाल तयार करण्यात आले असल्याचं ते म्हणाले. सोलापूर -धुळे महामार्गाचं काम प्रगतीपथावर असून पैठण-औरंगाबाद हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना संत्री, मोसंबी, चिकू, द्राक्षे, आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, अंजीर यासह इतर फळं विकण्यासाठी देशातल्या विमानतळांवर फळांच्या स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याचं प्रस्तावित असल्याचं गडकरी म्हणाले.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून औरंगाबाद शहरातल्या हेडगेवार रूग्णालयास पाच कोटी रूपयांची अत्याधुनिक यंत्रसामुग्री देण्याची घोषणाही गडकरी यांनी केली.

****

औरंगाबाद रेल्वेस्थानकावर नव्यानं उभारण्यात आलेले तीन स्वयंचलित जिने काल राष्ट्राला अर्पण करण्यात आले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हैदराबाद इथून दूरदृष्य प्रणालीद्वारे या जिन्यांचं लोकार्पण केलं. खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देवयानी डोणगावकर, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डॉ ए के सिन्हा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात औरंगाबाद रेल्वे स्थानक रोखरहित व्यवहारांसाठी शंभर टक्के सक्षम असल्याची घोषणा करण्यात आली. 

****

विद्यार्थ्यांनी कृषी उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करावी असं आवाह, झाशी इथल्या राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पंजाब सिंग यांनी केलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. मराठवाडयातल्या पारंपरिक शेतीचं विज्ञानाधिष्ठीत शेतीत परिवर्तन करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कार्य करावं असंही पंजाब सिंग यावेळी म्हणाले. विद्यापीठाचे कुलगुरू बी व्यंकटेश्वरल्लू यांनी यावेळी केलेल्या भाषणात शेतकऱ्यांमध्ये उमेद जागृतीसाठी विद्यापीठ प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब इथले प्रगतीशील शेतकरी भैरवनाथ ठोंबरे यांना यावेळी कृषीरत्न ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. कृषी संशोधन कार्यात भरीव योगदान देणाऱ्या संशोधकांना राधाकिशन शांती मल्होत्रा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुमारे साडे पाच हजारावर विद्यार्थ्यांना यावेळी पदवी तसंच पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.

****

कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे. काल हे बदली आदेश जारी करण्यात आले. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

****

महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा काल मुंबई इथं आंतरराष्ट्रीय ज्युरिस्ट परिषदेत आंतरराष्ट्रीय लॉ अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. महिलांच्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी रहाटकर या महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, या शब्दात रीक्षकांनी रहाटकर यांचा गौरव केला.

****

वाढत्या वीज बिलाच्या तक्रारी सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल औरंगाबाद इथं झालेल्या जिल्हा विद्युतीकरण बैठकीत दिल्या. ग्रामीण भागातही वीजेची वाढती मागणी आणि वापर लक्षात घेता मागणीनुसार पुरवठा करावा, शहरासह ग्रामीण भागातील विद्युतीकरणाचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत असं सांगून, वीजचोरीवर लक्ष देण्याची गरज खैरे यांनी व्यक्त केली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं सुरु असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात ३०० धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाज कुलदीप यादवनं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या या सामन्यात चार बळी घेतले. उमेश यादवनं दोन, तर भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला.

****

No comments: