Wednesday, 22 March 2017

TEXT - AIR News Bulletin, Aurangabad 22.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२२ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं काल ह्युस्टन इथे  निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास होते. मराठीसह इंग्रजी भाषेतल्या स्तंभलेखनासाठी आणि अग्रलेखांसाठी तळवलकर यांचं नाव प्रसिद्ध होतं. महाराष्ट्राच्या तसंच राष्ट्रीय राजकारणाचे  ते सखोल अभ्यासक होते. त्यांचे अग्निकांड, इराक दहन, सत्तांतर, बदलता युरोप यासह इतर अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल “दुर्गा रतन” आणि  “बी.डी. गोयंका” या पुरस्कारांसह, रामशास्त्री पुरस्कार, न.चि. केळकर पुरस्कार, जीवनगौरव तसंच लोकमान्य टिळक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

****

एचआयव्ही आणि एडसग्रस्त व्यक्तिंच्या मानवाअधिकारांचं रक्षण सुनिश्चित करणारं विधेयक काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. एचआयव्ही आणि एडस् प्रतिबंध आणि नियंत्रण विधेयक २०१४, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सदनात मांडलं. या विधेयकानुसार या रोगांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तिंना भेदभावाची वागणूक देण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, त्यांच्या उपचारांबद्दल गोपनीयता बाळगणं, त्यांच्या हक्कांचं रक्षण करणं आणि त्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी यंत्रणा उभारणं, याला मंजुरी देण्यात आली आहे. अशा व्यक्तिंना उपचार नाकारणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूदही या विधेयकात आहे.

****

राज्य सामायिक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या एम.एच.टी.सीईटी २०१७ या अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता हे अर्ज उद्या, तेवीस तारखेपर्यंत भरता येतील, तर विलंब शुल्कासहित हे अर्ज येत्या तीस मार्चपर्यंत भरता येतील.

****

      आज जागतिक जलदिन आहे. शुद्ध पाण्याचं महत्व आणि पाण्याचा काळजीपूर्वक वापर, या बाबींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर पाळल्या जाणाऱ्या या जलदिनाची सुरूवात १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघानं केली. जगभरातल्या वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर केल्यास, जागतिक पाणी टंचाईवर मात करता येईल, असं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे.

****

पीक विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक देणं अनिवार्य करण्याचा निर्णय राज्यशासनानं घेतला आहे. पुढील खरीप हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांची सहकारी किंवा पब्लिक सेक्टर बँकांमध्ये खाती असून, त्यांनी ती खाती येत्या जूनपूर्वी आपाल्या आधारक्रमांकाशी संलग्न करून घेणं गरजेचं असल्याचं कृषी खात्याच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.

//****//






No comments: