Thursday, 23 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 23 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

विधानसभेत आज राज्याचा २०१७-१८ या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर करण्यात आला. सरकारनं निर्धारित वेळेपूर्वीच अर्थमंत्र्यांचं भाषण घेऊन अर्थसंकल्प मंजूर करून घेतला, विरोधकांसह सरकारचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनाही या चर्चेत सहभागी करून घेतलं नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. शिवसेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा आणि विजय औटी यांनीही यावर आक्षेप घेत, अर्थसंकल्पाच्या चर्चेत आपल्याला शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर मत मांडायचं होतं, असं सांगितलं.
दरम्यान, १९ आमदारांच्या निलंबन प्रकरणी विरोधकांनी आज विधानसभेतून सभात्याग केला.
विधान परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून गदारोळ केल्यानं आजही कामकाज होऊ शकलं नाही. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून कर्जमाफीसाठी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

निवासी डॉक्टर आपलं सामुहिक रजा आंदोलन मागे घेण्यास तयार आहेत, मात्र त्यांच्या सुरक्षेची हमी सरकारनं घ्यायला हवी असं निवासी डॉक्टरांची संघटना-मार्डनं म्हटलं आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान मार्डनं न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. उच्च न्यायालयानं डॉक्टरांना तत्काळ कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं आज निवासी डॉक्टरांनी सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी क्रांती चौकात निदर्शनं केली. मार्ड संघटनेसह, भारतीय वैद्यक संघटनेनही या निदर्शनांना पाठिंबा दिला.
      राज्यात निवासी डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं डॉक्टरांच्या सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी दिले. त्यांनी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहनही केलं.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय दंत महाविद्यालयाला सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे. विधानसभेत शासकीय दंत महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी मिळण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना महाजन बोलत होते. शासनाने २०१२-१३ या वर्षी नऊ कोटी रुपये निधी मंजूर केला होता, त्यापैकी फक्त तीन कोटी रूपये मिळाल्यानं कामं अपूर्ण असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

****

उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज विमानात जागेच्या वादावरून एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केली. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. या प्रकरणी विमानकंपनीनं पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, खासदार गायकवाड यांनी मारहाणीच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे, संबंधित अधिकाऱ्यानं गैरवर्तन केल्यानं आपण हे पाऊल उचललं. या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे आपण तक्रार करणार असून, कोणाचीही माफी मागणार नाही, असं गायकवाड यांनी म्हटल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.

****

भारतीय संविधानातील कायदे हे कुठल्याही धर्माला अनुसरून नव्हे, तर आधुनिकतेची कास धरणारे असल्याचं, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी आज म्हटलं आहे. औरंगाबाद इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्या वतीनं, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान’ या विषयावरील व्याख्यानात ते आज बोलत होते. भारतीय राज्यघटना ही न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारलेली असून, या मूल्यांचा अंगिकार करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा आज शहीद दिवस. देशभरातून त्यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ मार्चला आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा तिसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

No comments: