Thursday, 30 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत सुधार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंह यांनी म्हटलं आहे. आज लोकसभेत शून्यप्रहरात काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठवाडा विदर्भासह तेलंगणातल्या शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधत, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर कृषीमंत्री बोलत होते. सरकारनं, कृषी कर्जावरच्या व्याज दरात मोठ्या प्रमाणावर सूट दिली, तसंच राष्ट्रीय आपत्ती कोषाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत केली असल्याचं, राधामोहनसिंह यांनी सांगितलं. २००८ मध्ये तत्कालिन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं शेतकरी कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नव्हत्या, याकडेही कृषीमंत्र्यांनी लक्ष वेधलं. शेतकरी विकासासाठीच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

देशभरातले सर्व जुने जलविद्युत प्रकल्प अद्ययावत करणार असल्याचं, ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं ते बोलत होते. कोयना प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीची आवश्यकता तसंच कोयना जलविद्युत प्रकल्पाचा पुढचा टप्पा कार्यान्वीत होण्याबाबतचा प्रश्न राऊत यांनी विचारला होता.

****

राजस्थानातल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी राजस्थान सरकारमधल्या मंत्र्यांनं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज दहा मिनिटांसाठी तहकूब झालं. संयुक्त जनता दलाच्या खासदार कहकशां परवीन यांनी या वक्तव्याचा निषेध करत, संबंधित मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी या मागणीला पाठिंबा देत, सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यामुळे उपसभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी याबाबत बोलताना, संबंधित मंत्र्यांनी असं वक्तव्य केलं असेल, तर ते निंदनीय असल्याचं सांगत, सदनाच्या भावना राजस्थान सरकारकडे कळवल्या जातील, असं नमूद केलं.

****

मोठ्या रकमांच्या कर्जाची वसूली लवकरात लवकर व्हावी आणि थकबाकीदारांवर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेनं येत्या २० एप्रिलपासून राष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरु करण्याचा इशारा दिला आहे. बँकांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या नावाखाली बॅंकांचं खाजगीकरण करण्याचा सरकारचा विचार असल्याचा आरोपही संघटनेनं केला.  

      दरम्यान, बँकांमधल्या विविध व्यवहारांवर अधिक सेवा कर आणि इतर शुल्क लावण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयाला अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. 

****

त्तरप्रदेशमधल्या महोबा रेल्वे स्थानकानजिक जबलपूर - निजामुद्दीन दिल्ली महाकौशल एक्सप्रेस या रेल्वे गाडीचे आठ डबे रूळावरून घसरून झालेल्या अपघातात जखमींची संख्या ३६ झाली आहे. आज पहाटे दोन वाजता हा अपघात झाला. या अपघाताची चौकशी करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

****

उत्तरप्रदेश सरकारनं राज्यातल्या परीक्षा केंद्रांची पाहणी करुन नक्कल होत असलेली १४ परीक्षा केंद्रं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नक्कल करणाऱ्या एक हजार ५०० विद्यार्थ्यांनाही निलंबित करण्यात आलं असून, ५७ परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. 

****

राज्यातल्या नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. मुंबई इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालयं आणि उपजिल्हा रुग्णालयात विशेष उपचार केंद्र सुरू केली आहेत, अशा रुग्णांना तत्काळ मदत मिळावी यासाठी १-०-७-७ आणि १-०-८ या क्रमांकावर हेल्पलाईन सुरु केली असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

अशासकीय अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाचे वेतन मंजूर करण्यात आलं असून यासंबंधीचं पत्र औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने सर्व संबंधीत महाविद्यालयांना पाठवलं आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांचं वेतन मंजूर करण्यात यावं अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती.  

****

दिल्ली इथं सुरु असलेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल आज उप उपान्त्य फरीतले सामने खेळणार आहेत. काल झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सिंधूनं भारताच्याच अरुंधती पंटावनेला २१-१७, २१-६ असं पराभूत केलं. तर सायनानं चीनी तैपईच्या चिया सिन ली हिचा पराभव केला. उपउपान्त्य फेरीत सिंधूचा सामना जपानच्या साईना कुवाकामी हीच्याशी, तर सायनाचा सामना थायलंडच्या खेळाडूशी होणार आहे.

//******//

No comments: