Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
पिक
विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देणार; कर्ज कापून घेण्याचे आदेश रद्द
·
शेतकऱ्यांच्या
आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी योजनांच्या योग्य अंमलबजावणीची गरज - केंद्रीय कृषी
मंत्री
·
प्रादेशिक
विमान सेवेच्या उडान योजनेअंतर्गत ४५ नवीन मार्गांची घोषणा; नांदेड -मुंबई आणि नांदेड
-हैदराबाद मार्गाचा समावेश
आणि
·
गोदावरी
नदीच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकारचीच- मुंबई उच्च न्यायालय
****
रब्बी हंगामाच्या पीक विमा रकमेची संपूर्ण
रक्कम थेट शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल
सांगितलं. रब्बी हंगामाच्या पीकविमा रकमेतून ५० टक्के रक्कम कर्ज खात्यात वळती करण्याचे
आदेश जिल्हा बँक आणि सहनिबंधकांना यापूर्वी देण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाला
काल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांनी विरोध केला, त्यानंतर अर्थमंत्री
मुनगंटीवार यांनी हे आदेश मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या मनात
संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती, यासाठी आपण हा निर्णय मागे घेत असल्याचं मुनगंटीवार
यावेळी म्हणाले.
****
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधार
करण्यासाठी योजनांची योग्य अंमलबजावणी होण्याची गरज केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहनसिंह
यांनी व्यक्त केली आहे. काल लोकसभेत शून्यप्रहरात काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य
सिंधिया यांनी मराठवाडा, विदर्भासह तेलंगणातल्या शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीकडे
लक्ष वेधत, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर कृषी मंत्री बोलत होते.
सरकारनं, कृषी कर्जावरच्या व्याज दरात मोठ्या प्रमाणावर सूट दिली, तसंच राष्ट्रीय आपत्ती
कोषाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत केली असल्याचं, राधा मोहनसिंह यांनी सांगितलं.
२००८ मध्ये तत्कालिन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतरही
आत्महत्या कमी झाल्या नव्हत्या, याकडेही कृषीमंत्र्यांनी लक्ष वेधलं.
****
शेतकरी कर्जमुक्ती तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी म्हटलं आहे, सातवा वेतन आयोग लागू केल्यानं, सरकारी तिजोरीवर २१ हजार ५०० कोटी
रुपयांचा भार पडणार असल्याची माहिती त्यांनी काल विधान परिषदेत दिली. विविध योजनांचे
पैसे लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा होत असल्यानं, अडीच हजार कोटी रुपयांची बचत
होत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं उडान योजनेअंतर्गत प्रादेशिक
विमानसेवेच्या पहिल्या टप्प्याची काल घोषणा केली. यामध्ये एक तास अंतराच्या ४५ नवीन
विमान मार्गांवर अडीच हजार रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. विमानात उपलब्ध पहिल्या
निम्या जागांसाठीच ही सवलत लागू असून, इतर जागांसाठी नियमित मूल्य मोजावं लागणार आहे.
या योजनेत महाराष्ट्रातल्या नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद, नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे,
कोल्हापूर-मुंबई, जळगाव-मुंबई आणि सोलापूर-मुंबई या मार्गांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रातल्या
भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची बैठक घेऊन, अर्थसंकल्प तसंच जाहीरनाम्यातली आश्वासनं
पूर्ण करण्याचे निर्देश दिले. काही खासदारांच्या कामात पंतप्रधानांनी सुधारणा सुचवत,
सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. राज्यात स्वच्छता
मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते
मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते
पद्मविभूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. यावेळी लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष पी. ए.
संगमा, मध्य प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना मरणोत्तर पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं. तसंच विराट कोहली, अनुराधा पौडवाल, स्वामी निरंजनानंद सरस्वती,
शेफ संजीव कपूर, कैलाश खेर यांना पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
गायक के. जे. येसुदास, अध्यात्मासाठी सदगुरू जग्गी वासुदेव,
तर विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी उडिपी रामचंद्र राव यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
करण्यात आले.
****
हृदय रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात
येणारे स्टेंट, कॅथेटर, बलून या सारख्या उपकरणांसाठी रुग्णांकडून उत्पादन किमतीपेक्षा
अधिक किंमत वसूल करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश
बापट यांनी काल विधान परिषदेत दिला. याप्रकरणी दोषींना सात वर्ष कारावासाच्या शिक्षेची
तरतूद असल्याचं बापट यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या अनेक
शाळांमध्ये विद्यार्थीनींचं
लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना वारंवार घडत असून अशा
प्रकारचं
कृत्य करणारी कोणतीही व्यक्ती, शाळा, संस्था आढळल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असं
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अशा घटनांची तक्रार विद्यार्थी, पालकांनी, कोणाच्याही दडपणाखाली न येता शासनाच्या
संकेतस्थळावर, लोकप्रतिनिधी किंवा शिक्षण विभागाकडे
करावी असं सांगून त्यासाठी
लवकरच स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येईल, असं शिक्षणमंत्री म्हणाले.
****
शिधा वाटप व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यापुढे प्रत्येक शिधा
पत्रिकाधारकाला बायोमेट्रिक पद्धतीने शिधा वाटप केलं येणार असून
त्यासाठी लवकरच बायोमेट्रिक यंत्रणा राबवली जाणार असल्याची माहिती अन्न आणि
नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी काल विधानसभेत दिली. बोगस शिधापत्रिका प्रकरणी स्वस्त धान्य
दुकानावर कारवाईसंदर्भात विचारलेल्या
प्रश्नाला उत्तर देताना बापट बोलत होते.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातून
जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. ८ नोव्हेंबर
२०१६ रोजी केंद्र सरकारनं या नोटांवर बंदी घालून त्या चलनातून बाद केल्या होत्या.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या
संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना घर या संकल्पनेला गती
देण्यासाठी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी
कमीत कमी दोन प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले.
या योजनेचा आढावा घेण्यासाठी दूरदृष्य संवाद प्रणाली द्वारे त्यांनी काल राज्यातल्या
जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
****
अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसंदर्भातली
चर्चा यशस्वी झाल्यामुळे राज्यातल्या
अंगणवाडी सेविकांचा उद्यापासूनचा राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ आणि इतर
मागण्यासंदर्भात काल त्यांनी संघटनेसोबत चर्चा केली. येत्या दोन महिन्यात सर्व
अंगणवाडी सेविकांचं मानधन नियमित देण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
गोदावरी नदीतलं प्रदूषण रोखून संवर्धनाची
जबाबदारी राज्य सरकारची असून ती टाळता येणार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं
आहे. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारनं निधीची
अडचण असल्याचं न्यायालयात सांगितलं. यासंदर्भात निधी उपलब्ध करून देण्याची घटनात्मक
जबाबदारी ही राज्य सरकारची असून गोदावरी संवर्धनाबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी १८
एप्रिलपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती
मिळालीच पाहिजे या मुद्द्यावर शिवसेना ठाम
असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत शिवसेनेची बैठक
झाली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि लोकप्रतिनिधींना
देण्यात येणारा निधी यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची
भेट घेणार असल्याचं कदम यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुर्नगठन करण्याचं
आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षानं सत्तेवर येताच कर्जमाफी मिळणार नसल्याचा पवित्रा
घेतला असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांना
कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा काल बुटीबोरी इथं पोहोचली,
त्यावेळी आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. शेतकऱ्यांनी आम्हाला हिंमत द्यावी आम्ही
त्यांच्यासाठी लाठ्या काठ्या खाण्यास तयार असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले.
****
उस्मानाबादचे खासदार
रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी लादलेली प्रवासबंदी उठवण्यासंदर्भात शिवसेना
खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. ही प्रवास बंदी उठवण्यासाठी
लोकसभा अध्यक्षांनी आपला अधिकार वापरावा, अशी विनंती पक्षाच्या वतीनं करण्यात आली.
दरम्यान, खासदार
रवींद्र गायकवाड आणि सुनिल गायकवाड यांच्यातल्या नामसदृश्यामुळे लातूरचे खासदार सुनिल
गायकवाड यांना काल दिल्ली विमानतळावर अडवण्याची घटना घडली.
****
लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी
काल तिसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक दोन मध्ये एका उमेदवाराने अर्ज दाखल केला.
//*******//
No comments:
Post a Comment