आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
३० मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकरीसाठीची वयोमर्यादा विधवा, घटस्फोटित
महिला आणि विभक्त महिलांसाठी ३५ वर्षांपर्यंत
शिथिल करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी ही
वयोमर्यादा ४० वर्षे इतकी आहे. कर्मचारी, तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग
यांनी लोकसभेत ही माहिती दिली. “अ” आणि “ब” श्रेणीच्या नोकऱ्यांसाठीही वयोमर्यादेत
ही शिथिलता १९९० सालापासून दिली जाते, मात्र त्यात स्पर्धा परिक्षांद्वारे थेट घेतल्या जाणाऱ्या उमेदवारांचा समावेश नाही, असंही
त्यांनी स्पष्ट केलं.
****
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या घराची भरपाई, केंद्र
शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येते. या रकमेत वाढ करण्याचा किंवा या कुटुंबाला पंतप्रधान
आवास योजनेत समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येणार असल्याचं, मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काल विधानसभेत सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या पुरग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
****
नांदेड इथल्या श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातल्या क्ष-किरण
विभागाचं उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या रुग्णालयात तत्काळ
पोलिस चौकी चालू करण्याचे निर्देशही काकाणी यांनी यावेळी दिले.
****
परभणी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी
येत्या १९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. मात्र कोणत्याच पक्षानं या ठिकाणी आपली उमेदवारी
यादी जाहीर न केल्यानं अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारानं आपलं नामनिर्देशनपत्र
दाखल केलेलं नाही. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
या सर्वच पक्षांनी शहर विकास आघाडी स्थापन केल्यानं परभणी महानगरपालिका निवडणूकीसाठी
मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
राज्याचा अर्थसंकल्प २०१६-१७
अपेक्षापूर्ती संकल्प‘‘ या विषयावर उद्या, एकतीस
तारखेला औरंगाबाद इथं एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात सकाळी साडे अकरा वाजता आयोजित या चर्चासत्रात मराठवाड्यातले नामवंत अर्थशास्त्रज्ञ आपले
विचार मांडणार आहेत.
//****//
No comments:
Post a Comment