Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
राज्य विधीमंडळात गेल्या शनिवारी अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्प सादर करत असताना, गदारोळ करणाऱ्या १९ आमदारांना येत्या
३१ डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. गोंधळ घालणे, फलक फडकावणे, घोषणाबाजी करणे,
सदनाबाहेर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, आदि कारवायांसंदर्भात विधीमंडळ कामकाजमंत्री
गिरीष बापट यांनी या आमदारांवर कारवाईचा प्रस्ताव दिला होता, तो मान्य करण्यात आला.
निलंबित आमदारांमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार, डी.पी. सावंत, विजय वडेट्टीवार यांच्यासह
दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव यांच्यासह नऊ आमदारांचा
समावेश आहे.
****
सुरक्षेसह इतर मागण्यांसाठी
रजेवर गेलेल्या
सोलापूर शासकीय रुग्णालयातल्या
११४ निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. कामावर रूजू होण्याच्या
न्यायालयाच्या आदेशानंतरही हे डॉक्टर्स रजेवर असल्यानं ही कारवाई करण्यात आली. निवासी डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीविरोधात
पुकारलेल्या या सामुहिक रजा आंदोलनाचा
आज तिसरा दिवस आहे.
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले
कार्यरत दोनशे चार निवासी डॉक्टर कामावर हजर नसल्यानं, रुग्णव्यवस्थेवर परिणाम झाला
आहे. या सर्व डॉक्टरांना तत्काळ कामावर रुजू होण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याची
माहिती, रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठातांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
****
ज्येष्ठ संपादक गोविंद तळवलकर यांना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तळवलकर यांच्या निधनानं
पत्रकारितेतलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावलं, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात
म्हटलं आहे. तळवलकर यांचं काल अमेरिकेत ह्युस्टन इथं निधन
झालं.
****
वस्तू आणि सेवाकर येत्या १ जुलैपासून अंमलात येण्याबद्दल आपण
आशावादी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलं आहे. ते आज
नवी दिल्ली इथं तेविसाव्या कॉमनवेल्थ अंकेक्षक सर्वसाधारण परिषदेत बोलत होते. वस्तू
आणि सेवाकर लागू झाल्यानंतर करप्रणालीमध्ये मोठी सुधारणा होऊन, वस्तू आणि सेवा स्वस्त
होतील आणि करचुकवेगिरीला आळा बसेल, असंही जेटली यांनी नमूद केलं.
****
लोकसभेत आज अनेक खासदारांनी प्रश्नोत्तराच्या
तासात नांदेड वर्धा रेल्वे मार्गाचा मुद्दा उपस्थित केला. वर्ध्याचे खासदार रामदास
तडस, नांदेडचे खासदार राजीव सातव, यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी या रेल्वेमार्गासाठीचं
भूसंपादन तसंच कामकाजाबाबत प्रश्न विचारले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गासाठी
भूसंपादन प्रक्रियेला गती दिली असल्याचं सांगत यासाठी राज्यसरकारनं ४० टक्के वाटा उचलल्याची
माहिती दिली. येत्या चार वर्षांत हा रेल्वेमार्ग पूर्ण होण्याची खात्री रेल्वेमंत्र्यांनी
दिली.
रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी
रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात स्वयंचलित तिकीट यंत्र बसवली जात असून, दहा हजारावर
पी ओ एस मशीन बसवले असल्याचं प्रभू यांनी सांगितलं. खासदार सु्प्रिया सुळे यांनी यासंदर्भात
प्रश्न विचारला होता.
राज्यसभेत शून्य प्रहरात काँग्रेसचे
खासदार पी भट्टाचार्य यांनी दूरचित्रवाणी मालिकांमधून दाखवल्या जाणाऱ्या गुन्हेगारी
विषयावरील मालिंकांमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याकडे लक्ष वेधलं. सामाजिक सौहार्द
जपण्यासाठी सरकारनं यासंदर्भात कायदा करून, अशा मालिका बंद करणं आवश्यक असल्याचं भट्टाचार्य
म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या
तासात घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. गृहराज्यमंत्री
हंसराज अहीर यांनी यासंदर्भात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केल्याचं सांगितलं. महत्त्वाच्या
अनेक रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, रेल्वे पोलिस यंत्रणा अधिक सुसज्ज
केली जात असल्याचं सांगितलं. आयएसआयच्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय
सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचं, अहीर यांनी सांगितलं.
****
जागतिक जल दिन साजरा केला जात आहे. या निमित्त जलसंसाधन मंत्रालयातर्फे आज
नवी दिल्लीमध्ये ‘‘सांडपाणी
व्यवस्थापन‘‘ या
विषयावरच्या चर्चासत्राचं उद्घाटन जलसंसाधनमंत्री उमा भारती यांच्या हस्ते होत आहे.
दरम्यान, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी देशातल्या जनतेला केलं आहे. जनशक्तीनं ठरवलं तर जलशक्तीचं संरक्षण नक्की होऊ शकतं, असं पंतप्रधानांनी
आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारी कर्मचारी गट विमा योजनेअंतर्गत जमा झालेला निधी
योग्य वेळी आणि तातडीनं कर्मचाऱ्यांना वितरीत करण्यात यावा, अशी सूचना वित्तमंत्रालयानं
संबंधित खात्याला दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्याची तरतूद करण्याच्यादृष्टीनं १९८०
पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेची रक्कम कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या वेळी मिळते. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ही रक्कम
देण्यात येते.
//****//
No comments:
Post a Comment