Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 26 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
प्रत्येक नागरिकानं वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा, आपल्या जबाबदाऱ्या
प्रामाणिकपणे पार पाडण्याचा, आठवड्यातून एक दिवस पेट्रोल-डिझेल न वापरण्याचा संकल्प
केला, तर लहान वाटणाऱ्या अशा गोष्टींमधूनच नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होईल, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या मालिकेच्या
३०व्या भागात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते.
डिजिटल पेमेंट, डिजिधन आंदोलन यात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत आणि
हळू हळू रोख-विरहित व्यवहारांकडे वळत आहेत असं पंतप्रधान म्हणाले. आतापर्यंत सुमारे
दीड कोटी लोकांनी ‘भीम ॲप’ डाउनलोड केलं आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई
आपल्याला पुढे न्यायची असून या एका वर्षात अडीच हजार कोटी डिजिटल देवाण-घेवाण व्यवहार
करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आपण शाळेची फी, रेल्वे प्रवास, विमान
प्रवास, औषधं खरेदी अशा दैनंदिन व्यवहारात अंकेक्षित प्रणाली वापर करावा असं ते म्हणाले.
येत्या १४ एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या दिवशी
डिजिधन मेळाव्यांची सांगता होईल असं त्यांनी सांगितलं.
महात्मा गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहाचं हे शताब्दी वर्ष आहे. शंभर वर्षांपूर्वी
१० एप्रिल १९१७ रोजी, महात्मा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह केला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात,
ग़ांधी विचार, गांधी शैली यांचं प्रकट रूप या सत्याग्रहाच्या रुपात पहायला मिळालं, असं
ते म्हणाले.
चंपारण्य सत्याग्रह म्हणजे अशी घटना होती ज्यात महात्मा गांधीजींचं संघटन कौशल्य,
भारतीय समाजाची नाडी ओळखण्याची शक्ती, ब्रिटीश राजवटीविरुद्ध गरीबातल्या गरीब, अशिक्षित
व्यक्तीला संघर्ष करण्यासाठी संघटित करणं, प्रेरित करणं, लढण्यासाठी मैदानात आणणं,
या सगळ्या अद्भूत गुणांचं दर्शन घडतं असं पंतप्रधान म्हणाले.
भारतातल्या सामान्य माणसाच्या अपार शक्तीला स्वातंत्र्य आंदोलनाप्रमाणे स्वराज्याकडून
सुराज्याकडे या प्रवासासाठी वापरताना, सव्वाशे कोटी देशवासियांच्या संकल्पाची शक्ती,
परिश्रमाची पराकाष्ठा, सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय हा मूलमंत्र घेऊन, देशासाठी, समाजासाठी,
काहीतरी करून दाखवण्याचा निरंतर प्रयत्नच, स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या
महापुरुषांच्या स्वप्नांना साकार करेल असं पंतप्रधान म्हणाले.
सव्वाशे कोटी देशवसियांची बदल घडवण्याची इच्छा, प्रयत्न, यामुळेच नव्या भारताचा,
न्यू इंडीयाचा, पाया घातला जाणार आहे असं त्यांनी नमूद केलं. न्यू इंडीया हा सरकारी
कार्यक्रम किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा नसून सव्वाशे कोटी देशवासियांना
केलेलं आवाहन आहे असं त्यांनी सांगितलं.
लक्षावधी लोक निस्वार्थ भावनेनं, त्यांच्या व्यक्तिगत जबाबदाऱ्यांच्या पलिकडे
जाऊन, समाजासाठी, शोषितांसाठी, पिडीतांसाठी, गरीबांसाठी काही-ना-काही करताना दिसतात.
एखाद्या मूक सेवकाप्रमाणं जणू तपस्या करावी, साधना करावी, त्याप्रमाणे काम करतात. रुग्णांची
सेवा करतात, रक्तदानासाठी धावून जातात, भुकेल्या लोकांच्या पोटाची चिंता करतात अशा
लोकांमुळे आपला देश बहुरत्ना वसुंधरा आहे असं गौरदवोद्गार त्यांनी काढले.
सव्वाशे कोटी देशवासीयांनी जर संकल्प केला, त्यासाठी मार्ग तयार केला आणि एका
मागून एक पावलं उचलली, तर न्यू इण्डीया हे सव्व्वाशे कोटी देशवासियांचं स्वप्न आपल्या
डोळ्यासमोर साकार होऊ शकेल असं पंतप्रधान म्हणाले.
****
दुर्गम भागातल्या
लोकांना विविध सरकारी योजनांसह ऑनलाईन सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी रेल्वे विभाग
पाचशे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ‘रेलवायर साथी’ नावाच्या या
उपक्रमांतर्गत अंमलात येणाऱ्या या सुविधेमुळे ऑनलाईन बँक व्यवहार, विमा योजना, रेल्वे
आणि बससाठी तिकीट सुविधा तसंच मुक्त विद्यापीठांसह अन्य सेवा उपलब्ध होतील.
****
सर्व मोबाईल
फोन धारकांना लवकरच आधार कार्डनुसार ओळख पडताळणी करावी लागणार आहे, सर्व ग्राहकांची
ओळख पटवण्यासाठी ही प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश सरकारनं दूरसंचार कंपन्यांना दिले
आहेत. देशात सध्या सुमारे १०० कोटी हून अधिक मोबाईल फोन धारक आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशाला इथं सुरु असलेल्या
चौथ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दिवस
अखेर भारताच्या पहिल्या डावात सहा बाद २४८ धावा झाल्या. लोकेश राहुलनं ६०, चेतेश्वर
पुजारानं ५७ तर रविचंद्रन अश्विननं ३० धावा केल्या. रवींद्र जडेजा १६ आणि वृद्धीमान
साहा १० धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा
संघ ५२ धावांवर आघाडीवर आहे. रांची इथं झालेला तिसरा सामना अनिर्णित राहील्यानं, चार
सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत.
//****//
No comments:
Post a Comment