Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
वस्तु
आणि सेवा कर - जीएसटीशी संबंधित चार विधेयकं लोकसभेत मंजूर
·
प्रदूषणाशी
संबंधित भारत स्टेज - बीएस-३ मानक इंजिन असलेल्या वाहनांच्या नोंदणी आणि विक्रीवर सर्वोच्च
न्यायालयाची १ एप्रिलपासून बंदी
·
कांदा
उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळासमोर ठेवण्याचं
पणन मंत्र्यांचं विधानपरीषदेत आश्वासन
आणि
·
संकटात
सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय शांत बसणार नाही, - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
*****
वस्तु आणि सेवाकर - जीएसटीशी संबंधित
चार विधेयकं लोकसभेत तब्बल साडे आठ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर काल मंजूर करण्यात
आली. यामुळे येत्या १ जुलैपासून एक देश एक कर प्रणाली लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला
आहे. केंद्रीय जी एस टी, एकीकृत जी एस टी, केंद्रशासित प्रदेश जी एस टी, आणि राज्य
जी एस टी नुकसान भरपाई विधेयक अशी ही चार विधेयकं आहेत. विरोधी पक्षांनी या विधेयकांमध्ये
सूचवलेल्या सर्व दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या. ही विधेयकं धन विधेयकं असल्यामुळे त्यांना
राज्यसभेच्या संमतीची आवश्यकता नाही.
या विधेयकांवरच्या चर्चेला उत्तर देतांना
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जी एस टी कायद्याअंतर्गत केंद्र आणि राज्यांच्या कामांचं
विभाजन निश्चित झालं असून जी एस टी लागू झाल्यानंतर वस्तुंचे दर कमी होतील अशी ग्वाही
दिली. ही विधेयकं मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला
आहे.
दरम्यान, राज्यसभेत काँग्रेसचे सदस्य
दिग्विजय सिंग आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य सीताराम येचुरी यांनी वित्त विधेयक
२०१७ मध्ये दुरूस्त्या सूचवत ते लोकसभेकडे परत पाठवले.
****
देशभरात ११०० पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर
शुद्ध पेयजल विक्री यंत्र बसवली असून, या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना नाममात्र दरात
शुद्ध पेयजल उपलब्ध करून दिलं जात असल्याचं, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं.
लोकसभेत प्रश्नकाळात लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर
देताना, देशभरात सर्वच रेल्वे स्थानकांवर शुद्ध पेयजल विक्री यंत्र बसवली जात असल्याचं
रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. ई केटरिंगच्या माध्यमातून प्रवाशांना आपल्या पसंतीचे प्रादेशिक
पदार्थ रेल्वे प्रवासात उपलब्ध होतील. स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून ही सेवा पुरवली
जात असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
****
विमुद्रीकरणानंतर जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकांकडे पडून असलेल्या सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे खासदार शरद पवार यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. रबी हंगामासाठी
पीक कर्ज वितरणावर याचा नकारात्मक परिणाम झाल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत
देशभरात आतापर्यंत निर्धारित ४०० कौशल्य विकास केंद्रांपैकी १०० केंद्र स्थापन करण्यात
आली आहेत. कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. लोकसभेत
प्रश्नकाळात हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी यासंदर्भातल्या विचारलेल्या प्रश्नाच्या
उत्तरात ते बोलत होते. पुढच्या महिनाभरात आणखी ४० तर येत्या सहा महिन्यात दोनशे पन्नास
केंद्रं स्थापन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, रुडी यांनी सांगितलं.
****
राज्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेडची सर्व तूर खरेदी केंद्रं सुरू राहणार आहेत. सध्या सुरू असलेल्या एकशे अठरा तूर खरेदी केंद्रापैकी अठ्ठावन्न केंद्रं बंद
करण्याची सूचना नाफेडनं पणन महासंघाला केली होती. मात्र यंदा तुरीचं मोठ्या प्रमाणावर झालेलं उत्पादन पाहता,
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख
यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांना ही सर्व केंद्र सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार
राधामोहनसिंह यांनी ही केंद्रं सुरू
ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे.
****
प्रदूषणाशी संबंधित भारत स्टेज - बीएस-३
हे मानक इंजिन असलेल्या वाहनांच्या नोंदणी आणि विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण
निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. येत्या १ एप्रिलपासून ही बंदी लागू होणार आहे.
वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेनं बीएस-३ मानक वाहनांचा साठा असलेली वाहनं
विक्री करण्याची परवानगी एका याचिकेद्वारे न्यायालयाकडे मागितली होती. उत्पादक कंपन्यांच्या
फायद्यापेक्षा जनतेचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं सांगत न्यायालयानं त्यांची ही याचिका
फेटाळून लावली, या निर्णयामुळे आता देशात फक्त
बीएस-४ उत्सर्जन मानक असलेल्या वाहनांचीच विक्री करता येणार आहे. केंद्र सरकारनं १
जानेवारी २०१४ रोजीच या संबधीची अधिसूचना काढून, बीएस-४ मानक लागू करण्याचे निर्देश
दिले होते.
****
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात
येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येईल.
त्याचप्रमाणे कांदा निर्यात वाहतुकीसाठी दिली जाणारी पाच टक्के अनुदानाची मुदत वाढवून
मिळावी यासाठी केंद्र शासनाला तातडीनं प्रस्ताव पाठवण्यात येईल, असं सहकार आणि पणनमंत्री
सुभाष देशमुख यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातल्या
एका शेतकऱ्यानं दराअभावी कांद्याचे पीक पेटवून दिल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच्या
चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या रकमेतून,
जिल्ह्यातल्या ५ हजार ३०७ शेतकऱ्यांना या पीक विमा परताव्याची रक्कम अद्याप मिळालेली
नसल्यानं या शेतकऱ्यांना नुकसान
भरपाई देण्यासंदर्भात समिती गठित करुन चौकशी करण्यात येईल, असं कृषी
मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल विधानसभेत सांगितलं. विधानसभा सदस्य सुभाष साबणे
यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती
दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला
आहे. शेतकरी संघर्ष यात्रेला काल चंद्रपूर जिल्ह्यातून प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत
होते. चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात पळसगाव इथं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची
भेट घेऊन, ही यात्रा सुरू झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार, यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लीकन पार्टी कवाडे गट, समाजवादी पक्ष,
संयुक्त जनता दल, आदी पक्षांचे पदाधिकारी तसंच जवळपास ५२ विद्यमान आमदार या संघर्ष
यात्रेत सहभागी झाले आहेत.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
मोहन भागवत यांनी, आपण राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नसल्याचं, स्पष्ट केलं आहे. ते काल
नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. संघात येतानाच आपण इतर सर्व दरवाजे बंद केले आहेत,
त्यामुळे असा कोणताही प्रस्ताव येणार नाही, आला तरी, आपण तो मान्य करणार नाही, असं
भागवत यांनी यावेळी नमूद केलं.
****
उत्तरप्रदेशमधल्या
महोबा रेल्वे स्थानकानजिक जबलपूर - निजामुद्दीन दिल्ली महाकौशल एक्सप्रेस या रेल्वे
गाडीचे आठ यान रूळावरून घसरण्याची घटना आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये
नऊ प्रवासी जखमी झाल्याचं उत्तर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं सांगितलं.
****
पुणे शहरात लावण्यात आलेल्या सी सी
टी व्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हे सिद्ध होण्याचं
प्रमाण वाढलं आहे हे लक्षात घेऊन, औरंगाबाद, अमरावती आणि कल्याण या शहरांमध्ये सी सी
टी व्ही कॅमेरे लावण्याचा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल विधान सभेत सांगितलं. त्यासाठी ४४२ कोटी रुपंयांची तरतूद करण्यात आली असल्याचं,
ते म्हणाले. अर्थसंकल्पावरच्या विभागनिहाय चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
****
जुन्या पिढीतील पत्रकार अरविंद आत्माराम वैद्य यांच्या सहाव्या
स्मृतिदिनानिमित्त 'अरविंद वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्कारा'चं वितरण काल औरंगाबाद
इथं करण्यात आलं. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार
गोपाळ साक्रीकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पंचवीस हजार रूपये रोख,
शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कवी फ. मुं. शिंदे होते. या वर्षीपासून देण्यात येणारा युवा पत्रकारिता पुरस्कार गोपाळ
साक्रीकर यांच्या हस्ते मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांना प्रदान करण्यात आला. पाच
हजार रूपये रोख, शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
//********//
No comments:
Post a Comment