Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
सर्व देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा आणि प्रयत्नांमुळेच, नव भारताच्या निर्मितीचा
पाया घातला जाणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
·
डॉक्टरांच्या
संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं राज्यपालांचं आवाहन
· वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उद्योग तसंच व्यापारी जगतानं
तयार राहण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन
आणि
· ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावात ६ बाद
२४८ धावा
****
सर्व देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा आणि प्रयत्न,
यामुळेच न्यू इंडिया - नव भारताचा, पाया घातला जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात या या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधताना
काल ते बोलत होते. वैयक्तिक आयुष्यातून बाजूला होऊन समाजाकडे संवेदनशील नजरेनं बघायला
हवं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट, डिजिटल आंदोलनात, नागरिक, मोठ्या प्रमाणात सहभागी
झाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. डिजिटलायजेशनसाठीच्या भीम ॲपचा जास्तीत
जास्त प्रचार आणि वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. येत्या एक वर्षात अडीच हजार कोटी
डिजिटल देवाण घेवाण व्यवहार करण्याचा संकल्प करावा, शाळेची फी, रेल्वे प्रवास, विमानप्रवास,
औषध खरेदी अशा दैनंदिन व्यवहारात नागरिकांनी अंकेक्षित प्रणालीचा वापर करावा असं पंतप्रधान
म्हणाले. येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी
डिजिटल मेळाव्यांची सांगता होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचा विषय
‘नैराश्य’ आहे, हा असाध्य विकार नसून, मिळून मिसळून राहिल्यामुळे, मनातल्या भावना व्यक्त
केल्यामुळे या आजारावर मात करता येऊ शकते असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
****
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची
प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. पद्मविभूषण
डॉ. नागेश्वर रेड्डी यांना राज्यपालांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात
आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर डॉक्टरांच्या संघटनेनं
केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. या आंदोलनामुळे रूग्ण आणि
डॉक्टरांचे संबंध हा चर्चेचा विषय झाला असून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातलं नातं हे त्यांच्यातल्या
संवादावर आणि डॉक्टरांच्या उपचारांवर अवलंबून असतं असं राज्यपाल म्हणाले. डॉक्टरांनी
रुग्णांच्या प्रती संवेदनशीलता आणि ममत्व दाखविणं तसंच रुग्णांनीही डॉक्टरांविषयी विश्वास
दाखविणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
****
येत्या १ जुलैपासून देशात वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी
होणार असून, या कर प्रणालीच्या अनुषंगाने राज्यातल्या उद्योग – व्यापारी जगतानं तयारी
करावी, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल मुंबई इथं केलं. या कराच्या
अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या विविध उद्योग- व्यापार क्षेत्रातल्या संघटनांनी
जेटली यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. येत्या
आठवड्यात या कराच्या प्रारूप मसूद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर
केला जाईल, असं जेटली यांनी सांगितलं.
****
दुर्गम भागातल्या लोकांना विविध सरकारी योजनांसह ऑनलाईन सेवांचा
लाभ मिळवून देण्यासाठी रेल्वे विभाग पाचशे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार
आहे. ‘रेलवायर साथी’ नावाच्या या उपक्रमांतर्गत अंमलात येणाऱ्या या सुविधेमुळे ऑनलाईन
बँक व्यवहार, विमा योजना, रेल्वे आणि बससाठी तिकीट सुविधा तसंच मुक्त विद्यापीठांसह
अन्य सेवा उपलब्ध होतील.
****
निवडणूक
प्रक्रियेत मतमोजणी करणाऱ्या टोटलायजर यंत्राचा वापर करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
या यंत्रामुळे मतं एकत्रित करुन मोजली जात असल्यानं, कोणत्या गावातून किती मतं मिळाली
याची माहिती मिळणार नाही. त्यामुळे सर्व गावांचा विकास होण्यास मदत होईल, असं हजारे
म्हटलं आहे.
****
धुळे जिल्ह्यात काल झालेल्या दोन दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू
झाला. सुरत - नागपूर महामार्गावर मुकटी नावाच्या गावाजवळ काल सकाळी साडेआठच्या सुमारास
झालेल्या ट्रक आणि सुमोमध्ये झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. महामार्गावरच्या एका
नदीवरच्या पूलावर पडलेल्या खड्ड्यातून ट्रक काढताना तो सुमोवर आदळल्यानं हा अपघात घडला.
दोन्ही वाहने ५० फूट खोल पूलाखाली कोसळली. सुमोमध्ये ११ जण होते, ते सर्वजण पारोळ्याला
नातेवाईकांकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तासभर
रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. दुसऱ्या
एका घटनेत धुळे शहरातल्या मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदिल परिसरात परवा मध्यरात्रीनंतर
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. या
आगीवर एका खतासानंतर नियंत्रण मिळवण्यात मनपा पथकाला यश आले. तोपर्यंत घरात अडकलेल्या
पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या
संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
सध्याच्या लोकशाहीत सरकार, पोलीस आणि
न्याययंत्रणा यांचं एकमत झाल्यामुळे आता न्यायालयात फक्त निकाल लागतो न्याय मिळत नाही,
असं मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. अमन समिती आणि
बापू -सुधा काळदाते प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय राज्यघटनेसमोरील
आव्हाने’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. राजकारणात घराणेशाही सुरू असून
सामान्यांना कोणतेच स्वातंत्र्य मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी काळात सर्व
नैसर्गिक संपत्ती ही मूठभर लोकांच्या हातात जाईल, असं भाकितही त्यांनी यावेळी व्यक्त
केलं.
****
औरंगाबादख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रूग्णालयात डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडू नयेत, यासाठी ३० पोलिसांचं कायमस्वरूपी
संरक्षण देण्यात आलं आहे. रूग्णालय प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची काल बैठक
झाली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला, तसंच रुग्णालयात कुठे पोलीस
यंत्रणा तैनात करावयाची याचा निर्णय घेण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याचं ऐतिहासिक तसंच
पर्यटन वैभव टिकवण्यासाठी युनीटी मल्टीकॉन या कंपनीकडे १० वर्षांसाठी किल्ल्याच्या
देखभालीचं काम सोपवलं आहे. महाराष्ट्र वैभव संगोपन योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात
आला आहे. त्यामुळे हा किल्ला आता निश्चितच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनेल, असा
विश्वास पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अजित खंदारे यांनी व्यक्त केला आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशाला
इथं सुरु असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दिवसअखेर भारतानं
पहिल्या डावात सहा बाद २४८ धावा केल्या. लोकेश राहुलनं ६०, चेतेश्वर पुजारानं ५७ तर
रविचंद्रन अश्विननं ३० धावा केल्या. रवींद्र जडेजा १६ आणि वृद्धीमान साहा १० धावांवर
खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात आला. सध्या ऑस्ट्रेलियाचा
संघ ५२ धावांनी आघाडीवर आहे. रांची इथं झालेला तिसरा सामना अनिर्णित राहील्यानं, चार
सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत.
****
लातूर महानगर पालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक
निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून भारतीय जनता पक्ष, काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी मेळावे, संभाव्य उमेदवाराच्या
मुलाखतीसह निवडणूक कामांना चांगलाच वेग दिला आला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या
आज आणि उद्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत एक
मेळावाही घेण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातल्या आघाडीचा निर्णय
पक्षश्रेष्ठी मुंबईत घेणार असल्याचं पक्षाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकात
म्हटलं आहे.
भाजपाने महिला मेळावे घेऊन एका अर्थानं
प्रचारास प्रारंभ केला आहे. त्याचबरोबर पक्ष संघटनेतल्या रचने प्रमाणे मंडळनिहाय कार्यकर्ते
आणि इच्छुकांचे मेळावे घेतले जात आहेत. अपक्षांची शहर विकास आघाडी करण्याचा प्रयत्न
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, मराठवाडा जनता पक्षाचे प्रा. संग्राम मोरे यांनी
सुरु केला आहे.
//******//
No comments:
Post a Comment