Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी
डॉक्टरांचं सामुहिक रजा आंदोलन आज पाचव्या दिवशी सुरूच आहे. आज दुपारी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत डॉक्टरांच्या संघटनेची बैठक होत असून, या बैठकीतून
तोडगा निघण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी रुग्णालयांमध्ये दोन टप्प्यात अकराशे
सुरक्षा रक्षक नेमण्याचं आश्वासन दिलं, मात्र ही व्यवस्था फक्त मुंबई, औरंगाबाद, नागपूर
सह मोजक्याच वैद्यकीय महाविद्यालयांसाठी असून, उर्वरित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये
सुरक्षेबाबत सरकारकडून काहीही सांगण्यात आलं नसल्याचं, डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.
सरकारनं सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षक
तैनात करावेत, हल्लेखोरांवर डॉक्टर सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, आदी
मागण्या निवासी डॉक्टरांकडून करण्यात येत आहेत.
दरम्यान, औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घाटी
रुग्णालयात आरोग्य सेवेवर या आंदोलनाचा फारसा परिणाम झाला नसल्याचं, रुग्णालय व्यवस्थापनाकडून
सांगण्यात आलं आहे. वरिष्ठ डॉक्टरांसह इतर पर्यायी व्यवस्था केल्यामुळे तातडीच्या वैद्यकीय
उपचारांसह, महत्त्वाच्या शस्त्रक्रिया तसंच बाह्यरुग्ण विभागही सुरू असल्याचं, रुग्णालय
व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं.
****
राज्यात पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित
सदस्यांपैकी सात टक्के सदस्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं निदर्शनास आलं आहे.
असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स
आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी, विजयी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण
केलं, त्यातून ही माहिती समोर आली. यापैकी पाच टक्के उमेदवारांविरुद्ध हत्या, हत्येचा
प्रयत्न, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ
टक्के, शिवसेनेचे आठ टक्के, भारतीय जनता पक्षाचे पाच टक्के आणि काँग्रेसचे चार टक्के
उमेदवार, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं या संस्थांनी जारी केलेल्या अहवालात नमूद
आहे.
****
राज्यातल्या विविध पर्यटनस्थळांची माहिती एकाच क्लिकवर मिळावी
म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून ‘टूरिझम मोबाईल ॲप’ तयार करण्यात
आलं आहे.
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मंत्रालयात या ॲपचं लोकार्पण करण्यात
आलं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं विकसित केलेल्या या मोबाईल
ॲपमध्ये पर्यटकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना संबंधित पर्यटन स्थळाजवळील हॉटेल्स,
रिसॉर्ट, हॉलिडे पॅकेजची माहिती, पर्यटनस्थळांची माहिती, ई-गाईडची सुविधा, नकाशा याबाबतची
सर्व माहिती मिळणार आहे.
****
मुंबई पुणे द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरील
पथकरात एक एप्रिलपासून अठरा टक्क्यांनी वाढ होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने
२००४ मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात १८ टक्के वाढ करण्याचा
निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही वाढ करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
अजमेर इथं होणाऱ्या उर्ससाठी दक्षिण
मध्य रेल्वे हैदराबाद-अजमेर, काचीगुडा-अजमेर, नांदेड-अजमेर या तीन विशेष रेल्वे गाड्या
सोडणार आहे.
हैदराबाद-अजमेर-हैदराबाद ही गाडी ३१
मार्चला दुपारी सव्वा तीनला हैदराबाद इथून सुटेल. ही गाडी नांदेड, औरंगाबाद, जळगाव,
भुसावळ यामार्गे दोन एप्रिलला पहाटे सव्वा पाच वाजता अजमेरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात
ही गाडी अजमेरहून सहा एप्रिलला सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी निघून सात एप्रिलला
रात्री सव्वाअकरा वाजता हैदराबादला पोहोचेल.
काचीगुडा-अजमेर-काचीगुडा ही गाडी ३१
मार्चला काचीगुड्याहून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी निघेल आणि दोन एप्रिलला सकाळी
सात वाजून पंचवीस मिनिटांनी अजमेरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पाच एप्रिलला
रात्री सात वाजून पंचवीस मिनिटांनी निघून काचीगुडा इथं सात एप्रिलला सकाळी साडे सात
वाजता पोहोचेल.
नांदेड-अजमेर-नांदेड ही गाडी एक एप्रिलला
दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी निघून अजमेरला दोन एप्रिलला रात्री दहा वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी सहा एप्रिलला रात्री सात वाजून वीस मिनिटांनी निघेल आणि
सात एप्रिलला रात्री पावणे अकरा वाजता नांदेडला पोहोचेल. या दोन्ही गाड्या नांदेड,
पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव मार्गे धावतील.
****
देशातल्या चार आघाडीच्या खासगी विमानसेवा
कंपन्यांनी उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांना सेवा न देण्याचा निर्णय घेतला
आहे. गायकवाड यांनी काल एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली होती, त्या पार्श्वभूमीवर
जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईसजेट, गो एअर या कंपन्यांनी हा निर्णय घेतला. गायकवाड यांना
या कंपन्यांच्या विमानातून यापुढे प्रवास करता येणार नाही, असं या कंपन्यांनी सांगितल्याचं,
पीटीआयचं वृत्त आहे.
//******//
No comments:
Post a Comment