Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 1 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
ठाणे
पोलिसांनी चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या एक कोटी २९ लाख रुपये
मूल्याच्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून,
त्यांच्याकडून एक हजार रुपयांच्या नऊ हजार ९०० नोटा तर पाचशे रुपयांच्या सहा हजार नोटा
हस्तगत करण्यात आल्या. गेल्या चार दिवसांत ठाणे शहरातून सुमारे दोन कोटी २५ लाख रुपयांच्या
बाद नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
****
माजी
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून
आज शपथ घेतली. लोकायुक्त एम.एल.टहलियानी यांनी क्षत्रिय यांना आयुक्तपदाची शपथ दिली.
या राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाचा कालावधी ५ वर्षांचा असणार आहे.
****
माजी
मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवन परिसरातल्या त्यांच्या
पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी केंद्रीय मंत्री शरद
पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी उपसभापती माणिकराव ठाकरे,
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
संरक्षण
संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओच्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या सुपरसॉनिक लक्ष्यवेधी
क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली. ओडिशा किनारपट्टीजवळ अब्दुल कलाम बेटावर आज सकाळी
सव्वा दहा वाजता ही चाचणी घेण्यात आली. हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र शत्रूच्या, कमी
उंचीवरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा वेध घेण्यास सक्षम आहे. अशा प्रकारचं तंत्रज्ञान
विकसित करणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे.
****
विना
अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत आजपासून शहाऐंशी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जागतिक
बाजारपेठेत पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारनं स्पष्ट
केलं आहे. अनुदानित सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.
****
स्वच्छ
भारत अभियानाअंतर्गत असलेल्या, ‘स्वच्छ शक्ति सप्ताहाचा’ हरियाणातल्या गुरगाव इथे आज
केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. स्वच्छतेविषयी जनजागृती
करण्याच्या उद्देशानं आजपासून येत्या आठ तारखेपर्यंत हा सप्ताह साजरा करण्यात येणार
आहे.
****
देशातल्या
लोकांच्या आरोग्यस्थितीमध्ये गेल्या दशकात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्याचं आरोग्यमंत्रालयानं
केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार,
आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीच्या सुविधा वाढल्यानं तसंच व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहिमा
पार पाडल्यानं नवजात मृत्यूदरात घट झाली आहे. हा दर प्रति एक हजार सत्तावन्न वरून एक्केचाळीस
वर आला आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात देगलूर तालुक्यातल्या शहापूर इथं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय आरोग्य शिबीराचा
आज समारोप झाला. या शिबिरात, गरोदर मातांनी घ्यावयाची काळजी, या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांची
व्याख्यानं, जनजागृती रॅली, तसंच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
परभणी
शहराच्या कारेगाव रोड भागात महापालिकेच्या वतीनं जलवाहिनीच्या कामाला महापौर संगीता
वडकर यांच्या उपस्थितीत आजपासून प्रारंभ झाला. हे काम पूर्ण झाल्यानंतर तीनशे घरांना
पाणीपुरवठा होणार असून, शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत
जलवाहिनी टाकण्यात येईल, असं वडकर यांनी यावेळी सांगितलं.
****
अहमदपूर
इथले डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा शतकपूर्ती वाढदिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात
आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते डॉ.शिवलिंग शिवाचार्य
महाराजांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लातूरचे खासदार सुनील गायकवाड, पशूसंवर्धन मंत्री
महादेव जानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
आमदार
प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबियांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध
करण्यासाठी उस्मानाबाद इथं माजी सैनिक संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी
परिचारक यांच्या राजीनाम्याची मागणी करत, कारवाईची मागणी केली आहे. या मागणीचं निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र
शासनाच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं दिला जाणारा ‘राज्य युवा पुरस्कार’,
यावर्षी पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण संस्थेला जाहीर झाला आहे. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह
आणि रोख रक्कम, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संस्थेला हा पुरस्कार राज्यपाल सी.विद्यासागर
राव यांच्या हस्ते मुंबईमध्ये एका विशेष समारंभात प्रदान केला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment