Monday, 15 May 2017


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ मे २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

कामगार कल्याण विभागातले २० कोटी रुपये कुठे गेले, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं संबंधित विभागाला केली आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, या संदर्भात महालेखापाल आणि नियंत्रक परीक्षकांनाही माहिती नाही, ही बाब आकलना पलीकडील असल्याचं म्हटलं आहे. या निधीचा शोध घेण्याचे निर्देश न्यायालयानं कॅगला दिले आहेत.

*****

मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि ‘जमात-उद-दावा’ या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा जिहादच्या नावाखाली दहशतवादी कारवाया करत असल्याचं पाकिस्ताननं कबूल केलं आहे.  न्यायिक पुनर्विचार मंडळासमोर एका सुनवाणी दरम्यान पाकिस्ताननं ही कबुली दिली. सईद आणि त्याच्या चार साथीदारांना जिहादच्या नावाखाली दहशतवादी कारवाया करणं आणि दहशतवाद पसरवणं, यासंदर्भात नजरकैदेत ठेवलं असल्याचं पाकिस्तान सरकारनं तीन सदस्यीय मंडळाला सांगितलं. या प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

****


रेल्वे प्रवास आनंदी आणि मनोरंजक व्हावा, यासाठी रेल्वेनं प्रवाशांसाठी नवी सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवासी आता रेल्वे प्रवासादरम्यान, आपल्या लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य उपकरणांवर लोकप्रिय चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि इतर कार्यक्रम पाहू शकतील, मात्र यासाठी प्रवाशांना अतिरिक्त शुल्क मोजावं लागेल. राजधानी, शताब्दी, दुरंतो आणि हमसफर गाड्यांमध्ये ही सुविधा सर्वप्रथम सुरू केली जाणार असून, त्यानंतर ही सेवा अन्य गाड्यांमध्ये सुरू केली जाणार आहे.

//*******//




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...