Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date- 15
May 2017
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १५
मे २०१७ सकाळी ६.५०
****
·
नैऋत्य
मोसमी पाऊस अंदमानमध्ये दाखल
·
पारंपारिक विज्ञानाला आधुनिकतेची जोड देण्याची
आवश्यकता - संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे
·
देशभरातल्या
नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकार रस्त्यांचं जाळं विकसित करणार
आणि
·
सहाव्या अखिल
भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं
लातूरमध्ये आयोजन
****
नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानच्या दक्षिण
भागात दाखल झाला आहे. हवामान विभागानं काल दुपारी ही माहिती दिली. दरवर्षी मोसमी पाऊस
१७ मे रोजी अंदमानात दाखल होतो, यंदा मात्र तीन दिवस आधीच मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे.
मात्र तो केरळमध्ये कधी दाखल हे आताच सांगता येणार नसल्याचं, हवामान खात्यानं म्हटलं
आहे. पुढच्या काही दिवसांत अंदमानचा उर्वरित भाग, निकोबार बेटं आणि बंगालच्या उपसागरात
मोसमी पावसाच्या आगमनासाठी अनुकुल स्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
पारंपारिक विज्ञानाला आधुनिकतेची
जोड देण्याची आवश्यकता असून, देशातल्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात झोकून देऊन
काम करण्याची गरज, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केली
आहे. राज्य शासन, विज्ञान भारती, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या
वतीनं पुण्यात आयोजित पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाच्या समारोप सत्रात ते
काल बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोप सत्राला उपस्थित होते.
भारतीय पारंपारिक विज्ञान हे शाश्वत विकासावर आधारित असल्यानं, त्याचा
आधुनिक विज्ञानासोबत सुयोग्य संगमच जगाला विकासाचा नवा शाश्वत प्रकाश दाखवेल, असा
विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या संमेलनाच्या धर्तीवर राज्यात
दरवर्षी महाराष्ट्र विज्ञान संमेलनाचं आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
****
केंद्र सरकारनं देशभरात सामुदायिक रेडिओ
केंद्र स्थापन करण्यासाठी देण्यात येणारं अनुदान ५० टक्क्यांवरुन ७५ टक्के इतकं वाढवलं
आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये यासाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी चेन्नई इथं ही माहिती दिली. विविध
विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांना सामुदायिक रेडिओ केंद्रं स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन
देणार असल्याचं नायडू म्हणाले.
****
दिव्यांग बालकांसाठी विशेष वसतीगृह
बांधण्याची मागणी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केंद्रीय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे केली आहे. बाल संगोपन
संस्था दिव्यांग मुलांची योग्य काळजी घेण्यास सक्षम नसल्याचं गांधी यांनी याबाबतच्या
पत्रात म्हटलं आहे. स्थानिक बाल कल्याण समित्यांच्या देखरेखीखाली, प्रत्येक राज्यात
असं वसतीगृह उभारण्यात यावं, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एका पेक्षा जास्त वसतीगृहांची
आवश्यकता असल्याचंही गांधी यांनी नमूद केलं आहे.
****
जगाभरातल्या हजारो संगणक प्रणालींवर
झालेल्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सायबर सुरक्षा संघटना - सीईआरटीनं
भारतीय रिझर्व्ह बँक, शेयर बाजार आणि राष्ट्रीय आर्थिक महामंडळासह प्रमुख संस्थांना
सायबर सुरक्षेसंबंधी उपाय सुचवले आहेत. या हल्ल्यामुळे जगभरातल्या हजारो संगणक प्रणाली
ठप्प झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनंही या संदर्भात एक मार्गदर्शिका जारी केली आहे.
****
देशभरातल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये
केंद्र सरकार अकरा हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचं जाळं विकसित करणार आहे. प्रधानमंत्री
ग्रामसडक योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे. याअंतर्गत सुमारे साडे पाच हजार
किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची तसंच १२६ पुलांची बांधणी वा दुरुस्ती होणं अपेक्षित
आहे. महाराष्ट्रासह सर्वच नक्षलग्रस्त राज्यात ही योजना राबवली जाणार आहे.
****
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण
जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय
न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याबाबतच्या
मुद्द्याला यावेळी प्राधान्य दिलं जाईल.
****
मुंबईतल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा
आरोपी दाऊद इब्राहीम आणि २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यांच्या
भारतात प्रत्यार्पणासंदर्भात कोणतीही सूचना मिळाली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं
म्हटलं आहे. दाऊद इब्राहीम आणि हाफीज सईदला भारतात आणण्यासाठी सरकारनं काय प्रयत्न
केले, यासंदर्भातील एक प्रश्न माहितीच्या अधिकारात विचारण्यात आला आहे. त्यावर मंत्रालयानं
ही बाब स्पष्ट केली. दरम्यान, हाफीज सईदला पाकिस्तानात स्थानबद्ध केल्याचं वृत्त आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं सहावं अखिल भारतीय
मराठी संत साहित्य संमेलन लातूर इथं आयोजित करण्यात आलं आहे. परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल
पाटील यांनी काल ही माहिती दिली. येत्या २९ ते ३१ मे या कालावधीत लातूर इथं मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या प्रांगणात
हे संमेलन होणार
आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड करण्यात आली असून, स्वागताध्यक्षपदी लातूर जिल्ह्याचे
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाच्या
प्रचार प्रसारासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात
येणार आहे.
****
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती
काल मराठवाड्यात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्तानं वाहनफेरी, पदयात्रा,
साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांसह अनेक कार्यक्रमातून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात
आलं.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या
संचालक मंडळासाठी काल ९६ पूर्णांक ५४ टक्के मतदान झालं. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी एकूण ४२ उमेदवार
रिंगणात होते. या
निवडणुकीत ग्रामविकास मंत्री पंकजा
मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनल आणि विधानपरिषदेतले विरोधी
पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनल यांच्यात ही मुख्य
लढत होत आहे. मतमोजणी आज होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर देवस्थानचा
विकास करण्यासाठी या वर्षासाठी ७८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत होणारी
कामं जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरीत आराखडे सादर करावे असे निर्देश
नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
****
लातूरच्या महापौर आणि उप महापौर पदासाठी
येत्या १९ तारखेला महापालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम
भापकर यांनी या बाबतचा आदेश जारी केला. लातूर मनपाच्या निवडणुकीत भाजपानं ३६, काँग्रेसनं
३३ तर राष्ट्रवादीनं एक जागा जिंकली होती. विद्यमान सदस्यांचा कालावधी २० मे रोजी संपत
आहे.
****
मराठवाड्यातून हज यात्रेला जाणाऱ्या
भाविकांसाठी काल औरंगाबाद शहरात शिबीर घेण्यात आलं. यात्रेतले विविध धार्मिक विधी तसंच
इतर तपशीलांबाबत यावेळी माहिती देण्यात आली. दुसरं प्रशिक्षण शिबीर येत्या २१ तारखेला
होणार आहे.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात
बर्दापूर इथल्या श्री गुरू महालिंग स्वामी मठाचे मठाधिपती महालिंग गुरू चन्नबसव शिवाचार्य
महाराज यांचं काल पहाटे निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. काल दुपारी मठ परिसरात त्यांच्या
पार्थिव देहावर समाधी संस्कार करण्यात आले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रादेशिक पातळीवर संघटनात्मक
बदल करण्यात येत असल्याचं, पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. या बदलांचा भाग म्हणून, पक्षाच्या
युवक प्रदेशाध्यक्षपदी संग्राम कोते पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरही
बदल होणार असल्याचं, पक्षाच्या उस्मानाबाद शाखेकडून सांगण्यात
****
मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी घरगुती वादातून
विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ते ३५ वर्षांचे होते. तापकीर
यांनी आत्महत्या करत असल्याचं शनिवारी रात्री फेसबुकवरून जाहीर करुन, पुण्यात एका हॉटेलच्या
खोलीत विष घेतल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. काल सकाळी अकरा वाजेदरम्यान,
हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. तापकीर यांनी ‘ढोल ताशे’ या मराठी चित्रपटाची
निर्मिती केली होती.
****
रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी
सहकारी संस्थांचं योगदान मोलाचं आहे, असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव
जानकर यांनी म्हटलं आहे, ते काल नांदेड इथं गोदावरी अर्बन मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या
धर्माबाद शाखेचं उद्घाटन करताना बोलत होते. पारदर्शक काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या
पाठिशी राज्यशासन सक्षमपणे उभं राहील, अशी ग्वाही जानकर यांनी दिली.
****
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७
ची कामं ३० जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिले
आहेत. नाशिक इथं आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
//******//
No comments:
Post a Comment