Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 May 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मे
२०१८ सकाळी ६.५० मि.
*****
Ø स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या
सहा जागांसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण
Ø राष्ट्रीय अन्न
सुरक्षा योजनेंतर्गत राज्यात नवीन ९९ लाख शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य घेता येणार
Ø आय एन एस व्ही
तारिणी या नौदलाच्या जहाजाची पृथ्वी प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण
Ø औरंगाबाद इथल्या
प्राध्यापक मनिषा वाघमारे यांची सर्वोच्च एव्हरेस्ट शिखराला गवसणी
आणि
Ø देशातल्या शैक्षणिक चळवळी संघटीत
केल्या पाहिजेत - उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांचं मत
*****
स्थानिक
स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठीची
मतदान प्रक्रिया काल शांततेत पूर्ण झाली. या पैकी नाशिक इथं शंभर टक्के, अमरावती इथं ९९ पूर्णांक ८० शतांश, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
साठी ९९ पूर्णांक ७२ शतांश, तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघात ९९ पूर्णांक
५७ शतांश टक्के मतदान झालं. उस्मानाबाद-लातूर-बीड
मतदारसंघातून बीड जिल्ह्यात ९९ पूर्णांक ९०
शतांश, तर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात
१०० टक्के मतदान झालं. तर परभणी हिंगोली मतदार संघात हिंगोली
जिल्ह्यात ९८ पूर्णांक सोळा शतांश, तर परभणी जिल्ह्यात ९९ पूर्णांक ६० शतांश टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. येत्या गुरुवारी २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
****
परदेशी उद्योजकांची गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रालाच
पहिली पसंती मिळत असून, अशा उद्योजकांना राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल चीन देशातल्या सिचुआन प्रांतातल्या उद्योजकांच्या
शिष्टमंडळानं, महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या उद्देशानं, भेट घेतली, त्यावेळी ते बोलत
होते. भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असल्यानं, इथे माहिती
तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक, उद्योग, वाहतूक, रस्ते-महामार्ग बांधकाम, पर्यटन, कला, ऊर्जा
आदी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचं, या शिष्टमंडळानं सांगितलं.
दरम्यान, या शिष्टमंडळानं काल, विधानसभेचे
अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसंच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचीही भेट घेऊन चर्चा केली.
****
राज्यातल्या समृद्धी महामार्गासह, विविध प्रकल्पांच्या
प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला. समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदी योजनेतून,
७७ टक्के भूसंपादन झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग,
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग, ही कामं ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिल्या.
****
सरकारनं, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी, विधानसभेतले
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या
किंमती कमी झाल्या नाहीत तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
****
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यात आता
नवीन ९९ लाख शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य घेता येणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा
मंत्री गिरीश बापट यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नवीन पात्र लाभार्थ्यांची
निवड करण्यासाठी, ग्रामीण तसंच शहरी भागातल्या, कुटुंबांच्या कमाल वार्षिक उत्पन्नाच्या
मर्यादेनुसार, ३० एप्रिल २०१८ पर्यंतच्या पात्र शिधापत्रिकांचा विचार करण्यात येणार
असल्याचं बापट यांनी सांगितलं.
****
राज्यातली प्रमुख फळ पिकं आणि इतर पिकांवरील कीड
रोगांच्या व्यवस्थापनासाठी एकत्रित क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय राज्यशासनानं
घेतला आहे. त्यानुसार चालू वर्षापासून सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा या पिकांसह
आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा आणि चिक्कू या प्रमुख फळ पिकांवरील क्रॉपसॅप -
एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण आणि सल्ला योजनेसाठी ४१ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर
करण्यात आला आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी काल
देशभरात दहशतवाद विरोधी आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळण्यात आली. यानिमित्त सर्व
शासकीय आस्थापनांमध्ये दहशतवाद विरोधी आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.
मंत्रालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीव गांधी यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना दहशतवाद
आणि हिंसाचार विरोधी शपथ दिली.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त
डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी, बीड
जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी, तर
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी उपस्थित
अधिकारी, कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ दिली.
****
भारतानं ब्राम्होस सुपरसॉनिक क्रूझ
क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओडीशातल्या चंडीपूर बेटावरुन काल सकाळी १०
वाजून ४० मिनीटांनी या भारतीय-रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
या यशस्वी चाचणीबद्दल, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण संशोधन विकास
संस्था ब्राम्होस गटाचं अभिनंदन केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
आय एन एस व्ही तारिणी या नौदलाच्या
जहाजातून पृथ्वी प्रदक्षिणेवर गेलेल्या, सहा महिला नौदल अधिकाऱ्यांची मोहीम यशस्वीरित्या
पूर्ण झाली, काल हे जहाज गोव्यात दाखल झालं. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी
या महिला अधिकाऱ्यांचं स्वागत केलं. या महिलांनी २१ हजार ६०६ समुद्री मैल अंतर पार
केलं. सप्टेंबर २०१७ मध्ये गोव्यातूनच या मोहिमेला प्रारंभ झाला होता.
****
औरंगाबाद इथल्या महिला महाविद्यालयातल्या प्राध्यापक
मनिषा वाघमारे यांनी काल जगातलं सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलं. काल सकाळी आठ वाजून
दहा मिनिटांनी त्यांनी एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली. गेल्या
वर्षी खराब हवामानामुळे त्यांना मोहीम अर्धवट सोडून माघारी परतावं लागलं होतं.
****
देशातल्या
शैक्षणिक चळवळी संघटीत केल्या पाहिजेत, असं मत उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी
व्यक्त केलं आहे. काल नांदेड इथं अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेच्या दुसऱ्या
आंबेडकरी विचारवेध संमेलनात ते बोलत होते. चळवळीतले कार्यकर्ते राजेश जुनगरे, आणि राहुल
कापसे यांचा यावेळी स्मृतीचिन्ह, आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
****
औरंगाबाद इथं झालेली दंगल राजकीय आणि आर्थिक हितसंबंधातून
प्रेरित असल्याचं, विधीज्ञ इरफान इंजिनिअर यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी
बोलत होते. सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी ॲण्ड सेक्युलॅरिझम आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष
यांच्या वतीनं, दंगलीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे
संचालक म्हणून ते बोलत होते. या हिंसाचारानंतरही शहरात धार्मिक तेढ किंवा द्वेष भावना
नसल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. दंगलखोरांना कथित सहकार्य करणाऱ्या पोलिसांवर
कारवाई करण्याची मागणीही या समितीनं केली आहे.
दरम्यान, औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख
प्रदिप जैस्वाल यांना काल अटक करण्यात आली, न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन
कोठडी सुनावली आहे. औरंगाबाद दंगलीनंतर अटक केलेल्या संशयीतांना सोडण्याची मागणी करत,
जैस्वाल आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याच्या आरोपावरून, काल
ही कारवाई करण्यात आली.
****
गावांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या
ग्रामपंचायतींची कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश, जालना जिल्ह्याचे
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. मंठा तालुक्यात विडोळी इथं विविध विकास
कामांचा प्रारंभ करताना ते काल बोलत होते. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या
प्रमाणात निधी मंजूर करण्यात येत असल्याचं, लोणीकर यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात माजगुजारी तलावातला गाळ काढून दुरुस्ती
कामासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून अर्थसहाय्य करण्यात येईल, असं पर्यावरण मंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी सांगितलं आहे. काल नांदेड इथं जिल्हा नियोजन
समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या मार्च २०१८ अखेर झालेल्या खर्चालाही
मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध बाबींचा कदम यांनी
सर्वंकष आढावा घेतला.
****
जालना जिल्ह्यात दुधाळ जनावरं वाटप योजने अंतर्गत
पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणांनी गतीनं काम करण्याचे निर्देश
पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुधाळ जनावरं वाटप प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत
होते. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास, संपूर्ण राज्यात याच धर्तीवर प्रकल्प राबवण्यात येणार
असल्याचंही खोतकर यांनी यावेळी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment