Thursday, 24 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 May 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४  मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø  नक्षलग्रस्त भागांत चार हजार बहात्तर मोबाईल टॉवर्स उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय 

Ø  महाराष्ट्रातल्या आमदारांच्या पथकावर काश्मीरमध्ये हल्ला; सर्वजण सुखरुप

Ø  औरंगाबाद दंगल प्रकरणी तपासासाठी अतिरिक्त महासंचालक बिपीन बिहारी यांची नियुक्ती

आणि

Ø  विधान परिषद निवडणुकीतल्या सहा पैकी पाच जागांची आज मतमोजणी; उस्मानाबाद-लातूर-बीड मतदार संघाची मतमोजणी पुढे ढकलली

*****



 देशातल्या नक्षलग्रस्त भागांमध्ये चार हजार बहात्तर मोबाईल टॉवर्स उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापैकी एकशे छत्तीस टॉवर्स महाराष्ट्रात उभारले जातील. या योजनेच्या दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यात असे दोन हजार ३२९ टॉवर्स उभारण्यात आले होते. दरम्यान, मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत, कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीसंदर्भातल्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासंबंधीच्या अध्यादेशाला मंजूरी दिली. देशातलं पहिलं राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मणिपूर इथं स्थापन करण्याबाबतच्या अध्यादेशालाही  मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.

****

 जनता दल सेक्युलर पक्षाचे एच.डी.कुमारस्वामी यांनी काल कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे जी.परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

****

 काश्मीरमध्ये दौऱ्यावर गेलेल्या महाराष्ट्रातल्या आमदारांच्या पथकावर काल दहशतवादी हल्ला झाला, सुदैवानं या हल्ल्यात सर्व आमदार सुखरुप आहेत. काल दुपारी अनंतनाग इथं आमदारांच्या वाहनांच्या ताफ्यावर हातगोळा फेकण्यात आला. पंचायती राज समितीच्या अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या या आमदारांमध्ये औरंगाबादचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा समावेश आहे.

****

 औरंगाबाद दंगल प्रकरणाचा तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि एमआयएम पक्षांच्या आमदारांच्या एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली होती. दंगलीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येईल अशी ग्वाही या शिष्टमंडळाला दिल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. ७२ तासांत औरंगाबादला पोलिस आयुक्त देणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

 कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आमदारपदाचा, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा काल राजीनामा दिला. पक्षांतर्गत स्थानिक राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. डावखरे यांनी, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदारपदाचा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. डावखरे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे.

 दरम्यान, डावखरे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

****

 जिल्हा पातळीवरील सर्व महिला समुपदेशन केंद्र सुरु राहण्यासाठी जिल्हा परिषदांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिल्या आहेत. आयोगाशी संबंधित जिल्हास्तरावरील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची, काल मुंबईत बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. काही जिल्हा परिषदांनी निधीचं कारण पुढे करून समुपदेशन केंद्र बंद केल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत, निधीची कमतरता भासल्यास आयोग शासनाकडे पाठपुरावा करेल असं रहाटकर यांनी सांगितलं.

****



शासकीय निवासस्थान सोडण्यापूर्वी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वीजबिलाची कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. निवासस्थान उपलब्ध करून देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे हे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असेल, यासंदर्भातलं परिपत्रक राज्य शासनानं जारी केलं आहे.



****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा पैकी पाच जागांसाठीची मतमोजणी आज होणार आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी निवडणूक आयोगानं पुढे ढकलली आहे. उर्वरित पाच जागांसाठीची मतमोजणी आज होणार आहे. गेल्या सोमवारी २१ तारखेला या जागांसाठी मतदान झालं होतं. परभणी हिंगोली मतदार संघात ९९ पूर्णांक ६० दशांश टक्के मतदान झालं होतं, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असून, दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

****



मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी अठरा कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. सुमारे सातशे किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या बांधकामासाठी १६ टप्पे निर्धारित करण्यात आले आहेत, यापैकी १३ टप्प्यांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरु असून, उर्वरित तीन टप्प्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दोन आठवड्यात या कामाला सुरुवात होईल, असं रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सांगितलं. दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या, ४६ हजार कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गामुळे, मुंबई ते नागपूर अंतर अठरा तासांवरून, आठ तासांवर येण्याची शक्यता आहे.

****



महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळानं दर्जेदार शेती उत्पादनांसाठी पर्याय उपलब्ध करावेत अशा सूचना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिल्या आहेत. महामंडळाच्या संचालक मंडळाची काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. फुंडकर यांनी यावेळी महामंडळाच्या कामांचा आढावा घेतला.

****

 मागच्या वर्षी परवानाधारक कृषीसाहित्य कंपन्यांकडून पुरवठा झालेलं बियाणं, खतं, औषधं इत्यादी साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचं किंवा बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागला होता, या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, याची शासनानं काळजी घ्यावी, असं आवाहन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, निकृष्ट दर्जाची उत्पादनं विकणाऱ्या कृषी कंपन्यांवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

****



पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि वाढती महागाई याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी दुचाकीच्या आत्महत्येचा देखावा करण्यात आला.



पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं काल उस्मानाबाद इथं आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढीमुळे महागाईचा दर वाढत असल्याबद्दल यावेळी केंद्र सरकारवर टीका करण्यात आली.



दरम्यान, पेट्रोल - डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

****



जालना जिल्ह्यात जाफराबाद, घनसावंगी, मंठा आणि बदनापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी काल निवडणूक झाली. यामध्ये जाफराबादच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कविता वाकडे, मंठा नगराध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन राठोड आणि घनसावंगीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. बदनापूरच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे प्रदीप साबळे दहा मतं मिळवून विजयी झाले. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रिती साबळे यांचा तीन मतांनी पराभव केला.





परभणी जिल्ह्यातही पालम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध झाली. नगराध्यक्षपदी घनदाट मित्रमंडळाच्या अनिता हत्तीअंबीरे यांची तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे बाबासाहेब रोकडे यांची निवड झाली.

****



यंदाच्या उन्हाळ्यात अद्याप एकाही पाणी टँकरची गरज न भासल्यामुळे, उस्मानाबाद जिल्हा टँकरमुक्त ठरला आहे. लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्येही याबाबतीत मोठी सुधारणा दिसून येत असून, तिथे अगदी नाममात्र प्रमाणात टँकर्स सुरू आहेत.

****



  बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यामध्ये गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रात वाहनांना प्रवेशबंदी करणारा आदेश लागू करण्यात आला आहे. यानुसार गेवराई तालुक्यातल्या संगमजळगाव, आगरनांदुर, रेवकीदेवकी आणि हिंगणगाव,या गावातल्या नदीपात्रात येत्या दहा जूनपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

****



 परभणी जिल्ह्यात काल सकाळी एका अपघातात दोनजण ठार झाले. जिंतूर-जालना रस्त्यावर रुग्णवाहिका आणि ॲपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या बिडकीन इथं आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सट्टेबाजांकडील जवळपास ९३हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.

*****

***

No comments: