Saturday, 26 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.05.2018 06.50AM


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 May 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मे २०१ सकाळी .५० मि.

*****

Ø  राज्यात वृक्ष लागवडीसाठी हरित सेनेची नोंदणी करण्यात मराठवाडा अग्रेसर

Ø  औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण कंपनीची अभय योजना जाहीर

Ø  नैऋत्य मोसमी पाऊस काल अंदमानात दाखल

Ø  सीबीएसईचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार

 आणि

Ø दूध उत्पादक संघर्ष समितीचा एक जून रोजी राज्यभरात आंदोलनाचा इशारा. 

*****



राज्यात वृक्ष लागवडीसाठी हरित सेनेची नोंदणी करण्यात मराठवाडा अग्रेसर ठरला आहे. या नोंदणीत लातूर जिल्हा राज्यात अग्रस्थानी असून जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख १५ हजार जणांनी हरित सेनेचं सदस्यत्व घेतलं आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात चार लाख एक हजार, तर बीड जिल्ह्यात तीन लाख ५५ हजार जणांनी हरित सेनेत नोंदणी केली आहे. राज्यात हरित सेनेत आतापर्यंत  ५० लाख १२ हजार स्वयंसेवकांची फौज सज्ज झाली आहे.

****



 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची मुदत पाच जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.



 दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी समझोता योजनेत कर्जाची परतफेड करण्यासाठी ३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीककर्जासह, इमुपालन, शेडनेट, पॉली हाऊससाठी एक एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेलं, आणि ३० जून २०१६ रोजी हे कर्ज थकीत असलेल्या, शेतकऱ्यांनाही या योजनेअंतर्गत आपल्या कर्जाची परतफेड करता येईल.



 पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना २०१८-१९ साठी ई-ठिबक तुषार संच बसवण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

****



 दरम्यान, खरीप २०१८ हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकरी बांधवांनी २४ जुलैपूर्वी सहभागी व्हावं, असं आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सुर्यफूल, कापूस आणि कांदा ही पीकं अधिसूचित करण्यात आली आहेत.

****



 वीज देयक अदा न केल्यामुळे, कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. एक जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या योजनेत, औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरचं व्याज तसंच विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल. वीज देयकाची प्रकरणं न्यायप्रविष्ट असलेल्या ग्राहकांनाही या योजनेखा सशर्त लाभ घेता येईल, असं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे.

****



 रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करून शिवसेना जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते काल रत्नागिरी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस हा प्रकल्प राज्यात इतर ठिकाणी किंवा गुजरातमध्ये घेऊन जायला तयार असल्याचं सांगत आहेत, ती सुद्धा जनतेची दिशाभूलच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****



 नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं ३५ सट्टेबाजांना काल अटक करण्यात आली. कल्याण आणि मुंबईत सट्टा चालवणाऱ्या या टोळीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या नाशिक पथकानं छापा टाकून अटक केली. या सर्वांकडून मोबाईल फोन, कागदपत्रं, हेडफोन, लॅपटॉप आणि रोख रक्कम ही जप्त करण्यात आली.

****



 नैऋत्य मोसमी पाऊस काल अंदमानात दाखल झाला. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटांच्या काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला असून, पुढचे दोन दिवस मोसमी पावसाची आणखी आगेकूच होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****



पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २७ मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मनुष्यबळ विकास खात्याचे सचिव अनिल स्वरुप यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला यंदा १२ लाख विद्यार्थी बसले होते. या वर्षी परीक्षेत अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी फुटल्यामुळे या विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात आली होती.

****



 दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं दूध दर प्रश्नी एक जून रोजी राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात, कळस इथं, दूध उत्पादकांच्या वतीनं काल रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. राज्यभर होणाऱ्या या आंदोलनात दूध उत्पादक मोठ्या संख्येनं सहभागी होतील असा विश्वास आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. दुधाला किमान २७ रुपये प्रतिलीटर दर मिळावा आणि शेतमालाला दीड पट भावाची हमी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे.

****



 हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या मुख्य पात्राला धक्का न लावता लोकसहभागातून या नदीचे पुनरूज्जीवन केलं जाणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर



कयाधू नदीला मिळणाऱ्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही जलचळवळ राबवली जाणार आहे.  यासाठीच्या जलदिंडीला काल प्रारंभ झाला. ही जलदिंडी येत्या चार जूनपर्यंत हिंगोली, सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यातल्या २० गावांमधून प्रवास करेल, अशी माहिती उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी दिली. सुमारे ८४ किलोमीटर लांबीच्या या नदीवर दोन लाख ४२ हजार १५२ लोकसंख्येला पाणी पुरवठा तसंच एक लाख १३ हजार १०० हेक्टर शेतजमिनीचं सिंचन अवलंबून आहे. नदीच्या माथ्याकडे, वाशिम जिल्ह्यातल्या आगरवाडी-कंडरवाडी पासून कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे.                      

                               - रमेश कदम, आकाशवाणी वार्ताहर हिंगोली



****



 लातूर जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानांतर्गत आयोजित स्वावलंबन यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरातून, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरुवात झाली. या अभियानात जलयोद्ध्यांची नोंदणी करण्यात आली असून, पाणी पातळी वाढवण्यासाठी शोषखड्डे तयार करणं, पाण्याचं पुनर्भरण, प्रभागाची स्वच्छता आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****



 परभणी जिल्ह्यात, पावसाळ्यात संभाव्य आपत्तीस सामोरं जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी दिले आहेत. परभणी इथं काल मान्सून २०१८ पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. आपत्कालीन उपाययोजनांची पूर्वतयारी करणं, शोध आणि बचाव मोहिमेसाठी लागणारी सर्व संपर्क यादी अद्ययावत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

****



 २०१७-१८ या वर्षात एच.आय.व्ही.चाचणीचं उद्दिष्ट १९४ टक्के पूर्ण करून हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या कालावधीत झालेल्या तपासणीत जिल्ह्यात एच.आय.व्ही.चे ३ हजार ७९९ रूग्ण आढळले.

****



 केंद्र सरकारला आज ४ वर्ष पूर्ण होत आहेत. सरकारनं निवडणूकपूर्व दिलेली आश्वासनं या चार वर्षात पूर्ण केली नसल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज नांदेड इथं मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. केला आहे. आमदार डी पी सावंत यांनी काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत, ही माहिती दिली.

****



 बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तसंच पीकविम्याची रक्कम तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल उस्मानाबाद जिल्ह्यात ईट इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे भूम जातेगाव मार्गावरची वाहतुक विस्कळीत झाली होती.

****



 बीड जिल्ह्यात पाटोदा, शिरुर आणि वडवणी नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांसाठी काल निवडणूक घेण्यात आली. पाटोदा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी सुरेश धस गटाच्या अनिता नारायणकर, शिरुर नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहिदास गाडेकर तर वडवणी नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपच्या मंगल मुंडे यांची निवड झाली.

****



 जालना शहरात मंठा चौफुली भागातली बारा दुकानं काल दुपारी लागलेल्या आगीत भस्मसात झाली. अग्निशामत दलाच्या तीन बंबांनी सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. 

*****

***

No comments: