Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मे
२०१८
दुपारी १.०० वा.
****
प्रधानमंत्री उज्जवला
योजनेमुळे गरीब, वंचित, दलित आणि आदिवासी समुदायातल्या नागरिकांचं जीवनमान सुधारल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज ‘नमो अॅप’ च्या माध्यमातून उज्ज्वला
योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. सामाजिक सक्षमीकरणामध्ये ही योजना महत्वाची भुमिका
बजावत असल्याचं ते म्हणाले. गेल्या चार वर्षात दहा कोटी घरांना स्वयंपाकाच्या गॅसची
जोडणी दिली असून, एलपीजी पंचायतीच्या माध्यमातून सुरक्षा उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात
येत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या
लष्कराच्या जवानांवर आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला, यात लष्कराचे दोन जवान जखमी
झाले. जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं, मात्र दहशतवाद्यांना पळून जाण्यात
यश आलं.
दरम्यान, काल रात्री पुलवामा जिल्ह्यातल्या काकापुरा
भागात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाले, तर एका
नागरिकाचा मृत्यू झाला. रात्री दहा वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या
शिबिरावर हल्ला केला, त्यानंतर ही चकमक झाली.
****
पालघर आणि भंडारा - गोंदिया
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत
आहे. पालघरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत
दहा पूर्णांक २७ टक्के, तर
भंडारा-गोंदिया मध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत १४ टक्के मतदान झालं. पालघरमध्ये अनेक ठिकाणी इव्हीएम मशिन बंद पडत असून, मतदार ताटकळत उभे आहेत. मशिन
दुरुस्त करण्याचं काम सुरु आहे, मात्र हे मशिन दुरुस्त होऊ शकलं नाही, तर कागदावर मतदान
घेऊन ते सील करणार असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
पालघरमध्ये
भाजपाकडून राजेंद्र गावीत, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून
दामोदर शिंगडा आणि बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भंडारा
- गोंदिया मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे, भाजपाचे
हेमंत पटले यांच्यात थेट लढत आहे. या मतदारसंघात नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच
मतदानाची वेळ आहे. येत्या ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तरप्रदेशातल्या कैराना
आणि नागालँड लोकसभा मतदारसंघामध्येही
आज मतदान होत आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरात सुरक्षा स्थितीत
सुधारणा झाली असल्याचं केंद्रीय गृह खात्यानं म्हटलं आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्या
गटांवर कडक कारवाई आणि सातत्यानं चर्चा करत असल्यामुळं हे शक्य झालं असल्याचं, भाजप
प्रणित लोकशाही आघाडी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गृह खात्यानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत नमूद केलं आहे.
****
पोलिसांचा
खबऱ्या असल्याच्या संशयातून
छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यातल्या एका ४५ वर्षीय
ग्रामस्थाची नक्षलवाद्यांनी हत्या केली. पुनापल्ली गावाजवळ शेतात काम करत असताना
या ग्रामस्थावर नक्षलवाद्यांच्या गटानं धारदार शस्त्रांसह हल्ला केला. या
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा
तिथं या व्यक्तीवर खबरी असल्याचा संशय व्यक्त करणारं पत्रक मिळालं.
****
पंजाब
नॅशनल बँक घोटाळ्यातला आरोपी हीरे व्यापारी निरव मोदीची सात हजार कोटी रुपयांची मालमत्ता
तातडीनं जप्त करण्याची परवानगी मिळावी, यासाठी सक्तवसुली संचलनालयानं मुंबईतल्या
विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पीएनबी घोटाळ्यात आरोपी नीरव
मोदी आणि त्याच्या सहकार्यांवर सक्तवसुली संचालनालयानं २४ मे
रोजी आरोपपत्र दाखल केलं आहे. न्यायालयाकडून त्याची आज दखल घेतली जाईल, अशी
अपेक्षा आहे. यावेळी मोदीची मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रक्रिया तातडीनं सुरु
करण्याची परवानगी देण्याची विनंती संचालनालय करणार आहे.
****
बुलडाणा जिल्हयात जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज
अर्थसहाय्य योजनेत अंतिम निवड झालेल्या लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज वितरीत करण्यासाठी
सात जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १९ मे होती, मात्र या मुदतीत बँकेकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता करून
प्रत्यक्ष कर्ज वाटप होण्यास पुरेसा अवधी न मिळाल्यानं बऱ्याच लाभार्थ्यांना कर्ज वितरण
होऊ शकलं नाही, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली.
****
कोकण पदवीधर मतदार संघातून शेकापच्या चित्रलेखा पाटील
यांची उमेदवारी निश्चित समजली जात असून, राष्ट्रवादी कॉग्रेस त्यांना पाठिंबा देईल
अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात कॉंग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दुसरीकडे भाजपच्या वतीनं निरंजन डावखरे यांचं नाव नक्की झाल्याचं बोललं जातं आहे. शिवाय
शिवसेनाही या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार असून, कोकण पदवीधर मतदार संघात तिरंगी
लढत होईल अशी शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment