आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आपल्या इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांच्या दौऱ्याच्या
पहिल्या टप्प्यात काल संध्याकाळी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथे पोहोचले. लष्करी
मान वंदनेसह त्यांचं तिथे स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांनी आज इंडोनिशियाचे राष्ट्रपती
जोको विडोडो यांची भेट घेतली.
****
माजी केंद्रीय
मंत्री पी चिदंबरम यांनी, एअरसेल मॅक्सेल मनी लाँडरिंग प्रकरणी अटकेपासून सुरक्षेची
मागणी करणारी याचिका दिल्ली न्यायालयात दाखल केली आहे. यावर, सक्त वसुली संचालनालयानं आपलं या बाबतचं म्हणणं
येत्या पाच जून पर्यंत सादर करावं आणि तोपर्यंत चिदंबरम यांच्यावर दंडात्मक कारवाई
करू नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
राष्ट्रीयीकृत
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे
सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं आज आणि उद्या,
काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलना मुळे सरकारी बँकांचे व्यवहार या दोन दिवसात
बंद राहतील, मात्र, ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएममध्ये पुरेशी रोकड ठेवली
असल्याचं बँक युनियननं कळवलं आहे.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी
एक वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र
एज्युकेशन डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळासह इतरही सहा संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
****
भंडारा-गोंदिया
मतदारसंघाच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकी साठीचं फेरमतदान सुरू झालं आहे. सोमवारी
झालेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान या मतदार संघातल्या एकोणपन्नास मतदान केंद्रांतल्या
व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये तांत्रिक दोष दिसून
आल्यानं निवडणूक आयोगानं या केंद्रांवर पुनर्मतदान घेण्याचा आदेश काल दिला होता.
****
महाराष्ट्रात
मॉन्सूनचं आगमन अजून झालेलं नाही, आणि ते झाल्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई
करू नये, असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. येत्या एक तारखेनंतर विदर्भ,
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असा अंदाज असून, या कालावधीत
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि विजांपासून संरक्षण होण्यासाठी नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी, असं आवाहनही शासनानं
केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment