Monday, 28 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 May 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø पर्यावरणास घातक प्लास्टिक पिशव्या तसंच निम्न दर्जाच्या प्लास्टिक वस्तू न वापरण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

Ø पालघर तसंच भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

Ø नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल

Ø चेन्नई सुपर किंग्ज संघानं पटकावलं आयपीएलच्या अकराव्या हंगामाचं विजेतेपद          

आणि


Ø नि:स्वार्थ भावनेनं कार्य केल्यास सहकार क्षेत्र अधिक सक्षम होईल -  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना विश्वास

****



 पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्या तसंच निम्न प्रतीच्या प्लास्टिक वस्तू वापरू नयेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीच्या  मन की बात या कार्यक्रमाच्या ४४ व्या भागात ते काल बोलत होते. पृथ्वी स्वच्छ आणि हरित बनवण्यासाठी वृक्षारोपणासह विविध उपाययोजनांची गरज त्यांनी व्यक्त केली. येत्या पाच जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याचं यजमानपद भारत भूषवणार असून, प्लास्टिक पासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर मात, ही यंदाची या दिनाची संकल्पना असल्याचं ते म्हणाले.



२१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनाची तयारी सुरू झाली असल्याचं सांगतानाच, योगाचा वारसा पुढे नेऊन एक आरोग्यशाली राष्ट्र निर्माण करु या, असं ते म्हणाले. मुलांना, विविध मैदानी, तसंच पारंपरिक खेळांबद्दल माहिती देऊन, या खेळांना प्रोत्साहन देण्याचं आवाहनही त्यांनी केलं.



 देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती या निमित्त पंतप्रधानांनी राष्ट्रपुरुषांचं स्मरण केलं.



 आयएनएसव्ही तारिणी या जहाजातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या सहा महिला अधिकारी, तसंच चंद्रपूरच्या आश्रम शाळेतले एव्हरेस्ट वीर आदिवासी मुलं, यांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. रमजानचा महिन्यानिमित्त, आगामी रमजान ईदच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

****



केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्या निमित्त पंतप्रधानांनी 'नमो अॅप' वर एक सर्वेक्षण सुरु करून सरकारसह खासदार आणि आमदारांच्या कामाचं मूल्यांकन करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आलं होतं. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. सरकारचं कामकाज आणि विकास कामांवर नागरिकांनी आपल्या भावना आणि मत व्यक्त करावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

****



 भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी सरकार देण्यासह गेल्या चार वर्षात केंद्र सरकारनं विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं काल मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या चार वर्षात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं, कृषी क्षेत्रासह सिंचन, रस्ते बांधणी, रेल्वे तसंच उपनगरी रेल्वेसेवा, आदी क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं नियोजित स्मारक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल इथल्या नियोजित स्मारकासाठी केंद्र सरकारकडून पाठबळ मिळाल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.



 दरम्यान, केंद्र सरकारनं गेल्या चार वर्षांच्या काळात घेतलेल्या भरीव आणि धडक निर्णयांमुळे देशाची विकास प्रक्रिया अधिक गतिमान झाली असल्याचं, राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी म्हटलं आहे. ते काल बुलडाणा इथं पत्रकारांशी बोलत होते.

****



शेतकऱ्यांनी फळे, भाजीपाल्यावर कीटकनाशकाचा अनावश्यक वापर टाळावा, असं आवाहन फुंडकर यांनी केलं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं. कीटकनाशकाच्या अति वापरामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो आणि कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे टाळण्यासाठी तसंच निर्यातक्षम फळे, भाजीपाला यांचा योग्य दर्जा राखणं आवश्यक आहे, अन्यथा आयात करणाऱ्या देशांकडून प्रतिबंध लादले जातात, असंही फुंडकर यांनी सांगितलं.

****



पालघर तसंच भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. पालघरमध्ये शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना, तर भाजपनं राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. भंडारा-गोंदियामधून भाजपचे हेमंत पटले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे यांच्यात लढत होणार आहे. या दोन्ही मतदार संघात, मतमोजणी ३१ मे रोजी होणार आहे.



 दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात येईल, असं परीक्षा नियंत्रकांकडून सांगण्यात आलं आहे.

****

 पालघर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूक कामात हलगर्जीपणा केल्यामुळे डहाणूचे नायब तहसीलदार संजय नागावकर यांना निलंबित करण्यात आलं आहे.  निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ही कारवाई केली. लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या १३४ व्या कलमानुसार ही कारवाई करण्यात आली.

****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडूतल्या काही भागात मोसमी पाऊस पोचण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत दक्षिण कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****



 हिंगोली जिल्ह्यांत परवा शनिवारी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. काही भागात महसूल पथकानं नुकसानाची पाहणी केली. हिंगोलीसह परभणी, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना परवा शनिवारी वादळी वार्यासह पावसाचा जोरदार फटका बसला. या पावसामुळे ठिकठिकाणच्या बागायती पिकांचं नुकसान झालं, घरांवरील पत्रे उडून गेले, झाडांसह विजेचे खांब उन्मळून पडल्याचं  वृत्त आहे.

 रम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात काल रविवारीही काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. सातारा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



इंडीयन प्रीमिअर लीग - आयपीएल स्पर्धेच्या अकराव्या हंगामाचं  विजेतेपद चेन्नई सुपर किंग्ज संघानं पटकावलं. काल मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई संघानं सलामीवीर शेन वॉटसनच्या नाबाद शतकाच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८ गड्यांनी पराभव केला. त्यापूर्वी फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या, चेन्नई संघानं एकोणिसाव्या षटकांतच हे लक्ष्य साध्य केलं. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जस संघ तिसऱ्यांदा विजेता ठरला आहे 

****



 सहकार क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेनं आणि चिकाटीनं सेवा केल्यास सहकार क्षेत्र अधिक सक्षम होईल, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या २२व्या शाखेचं उद्घाटन काल बागडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सहकारी बँकांनी कर्ज देतांना काही महत्वाची पथ्यं पाळावीत, तसंच कर्जदारांची पात्रता पाहूनच कर्जाचं वितरण केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

****



 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं, औरंगाबाद इथं काल या अनुषंगानं व्याख्यानं, मुलाखतींसह विविध कार्यक्रम घेण्यात आले.



औरंगाबाद शहरात जालना रस्त्यावर सिडको चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं नाव देण्यात आलं आहे. काल सावरकरांच्या जयंतीदिनी, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचं नामकरण करण्यात आलं.



दरम्यान, राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या उड्डाणपुलाला, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव देण्याची मागणी करत, या कार्यक्रमात निदर्शनं केली. यावेळी पोलिसांनी तीसहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

****



लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या इंद्रप्रस्थ भूमी अभियानांतर्गत काल रेणापूर तालुक्यात विविध ठिकाणी श्रमदान करण्यात आलं. रेणापूरसह दर्जी बोरगाव, आरजखेडा इथं जलसंधारणासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आल्याचं वृत्त आहे.

****

 यवतमाळ जिल्ह्यात कळंब राळेगाव मार्गावर तिहेरी अपघातात चार जण ठार झाले. भरधाव कार, मोटरसायकलला धडकून, ट्रकवर आदळल्यानं हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरच्या एका बालिकेसह कारमधल्या तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


 परभणी जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या बस चालकांनी, येत्या ३१ मे पर्यंत आपल्या वाहनांची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. जून महिन्यात सुरू होत असलेल्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही वाहन तपासणी केली जात आहे.

*****

***

No comments: