Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे २०१८ दुपारी १.०० वा.
****
पदवी
हे विद्यार्थ्यांच्या कामाचं आणि प्रतिभेचं प्रमाण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान आज पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दौऱ्यावर असून, शांतीनिकेतन
इथं विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. बांग्लादेशच्या पंतप्रधान
शेख हसीना याचंही पंतप्रधानांनी या कार्यक्रमात स्वागत केलं. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर
यांचंही त्यांनी यावेळी स्मरण केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान हसीना यांनी
बांग्लादेश भवनचं उद्घाटन केलं.
****
बिहारमधल्या
बोधगया इथं २०१३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी पाटणातल्या राष्ट्रीय तपास
यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं पाच इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना दोषी ठरवलं
आहे. इम्तियाज अन्सारी, हैदर अली, मुजीब उल्लाह, ओमेर सिद्दीकी आणि अझहरुद्दीन कुरेशी
अशी या पाच जणांची नावं असून, त्यांना येत्या ३१ तारखेला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
****
आंतरराज्य
मालवाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणालीची अंमलबजावणी आजपासून महाराष्ट्र, मणिपूर, चंदीगढ,
अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप या आणखी सात
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधे केली जाणार आहे. यामुळे या प्रणालीची अंमलबजावणी
करणाऱ्या राज्यांची संख्या २७ वर पोहोचली आहे. ई-वे बिल प्रणाली यशस्वीपणे सुरु असून,
२३ मे पर्यंत पाच कोटी ३० लाखांहून अधिक बिलांची नोंद झाली असून, यात आंतरराज्य मालवाहतुकीच्या
एक कोटी ६० लाख ई-वे बिलांचा समावेश आहे.
****
केंद्र
सरकारनं गहू, बदाम, आक्रोड आणि प्रोटीन पदार्थांसह पाच उत्पादनांवरचं आयात शुल्क वाढवलं
आहे. सीमा शुल्क कायद्याअंतर्गत असलेल्या आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत अर्थ मंत्रालयानं
ही कारवाई केली. त्यानुसार कवचासह अक्रोडवरच सीमाशुल्क शंभर टक्के, कवचासह बदामावरचं
सीमाशुल्क प्रतिकिलो शंभर रुपये, गव्हावरचं शुल्क ३० टक्के, तर प्रोटीन पदार्थांवरचं
शुल्क ४० टक्के होणार आहे.
****
विद्यापीठांचे
ऑनलाईन अभ्यासक्रम संचालित करण्यासाठीच्या नियमांना विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्यता
दिली आहे. या शैक्षणिक वर्षापासून पदवी, पदव्यूत्तर आणि पदविका स्तरावरचे ऑनलाईन अभ्यासक्रम
उच्च शिक्षण संस्थांना संचालित करता येतील, असा निर्णय आयोगानं कालच्या बैठकीत घेतला.
या निर्णयामुळे विद्यापीठांना आपले नियमित अभ्यासक्रम ऑनलाईन चालवता येतील, मात्र ज्या
अभ्यासक्रमांमध्ये प्रयोगशाळा किंवा प्रायोगिक अभ्यास आवश्यक असतो ते अभ्यासक्रम ऑनलाईन
चालवता येणार नाही असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
कोल्हापूरच्या
महापौरपदी काँग्रेस पक्षाच्या शोभा बोंद्रे यांची आज बहुमतानं निवड झाली. बोंद्रे यांनी
ताराराणी आघाडीच्या रुपराणी निकम यांचा पराभव केला. शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी
महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.
****
वैद्यकीय
शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे मेडिकल विभागाचे सहसंचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी
आज औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय-घाटीच्या पाहणीला सुरुवात
केली. दुपारी ते कॉलेज कौन्सिलची बैठक घेणार असल्याचं घाटी प्रशासनानं सांगितलं आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्यातल्या तीन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात एका महिलेचा समावेश
आहे. या तिघांवर एकूण आठ लाख रुपयांचं बक्षिस होतं. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीच्या
सहा घटनांमध्ये या तिघांचा समावेश होता, तसंच यांच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल असल्याचं
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नंदुरबार
जिल्ह्यातल्या शहादा शहरातल्या एका घरातून कल्याण आणि मुबंईत सट्टा चालवणाऱ्या टोळीला
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या नाशिक पथकानं छापा टाकून अटक केली. या छाप्यात राज्यातल्या
विविध जिल्ह्यांसह परराज्यातल्या तब्बल ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांकडून
मोबाईल फोन, कागदांचा संच, हेडफोन, लॅपटॉप आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. या आरोपींविरुद्ध
महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
मराठवाड्यात
यावर्षी चार कोटी वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट असून, सर्व यंत्रणांनी ते साध्य करावं असे
निर्देश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत. वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात
औरंगाबाद इथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गेल्यावर्षी राज्यातला पहिला वृक्षसंवर्धन
कक्ष मराठवाडा विभागात स्थापन करण्यात आला असून, ‘माझी शाळा - माझी टेकडी’ उपक्रमाद्वारे
४२ लाख शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागानं १२ लाख ३९ हजार वृक्ष लागवड करण्यात आल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं. चार कोटी वृक्षलागवडीसाठी आवश्यक असलेल्या रोपांची उपलब्धता
वनीकरण विभागाकडून पूरेशा प्रमाणात करण्यात आलेली असून, एकूण आठ कोटी ६० लाख रोपं सध्या
उपलब्ध असल्याचं भापकर यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment